शेतकऱ्यांनी खचून न जाता वाटचाल करा
मनोज गांधी ः पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : तालुक्यातील अनेक भागांमध्ये भातकापणीच्या काळातच झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी भाताच्या लोंबीतील दाण्यालाच रुजवा आला आहे. दाणा झोडून घेतला तरीही भरलेला व दर्जेदार भात मिळणे कठीण झाले आहे. या अनपेक्षित परिस्थितीने शेतकऱ्यांचे मनोबल खचले असले तरीही हीच वेळ पुढील वाटचाल ठरवण्याची आहे, असे मत मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांना सूचना देताना गांधी म्हणाले, शासनाकडून नुकसानभरपाई मिळेलच; मात्र तिची वाट पाहात बसण्याऐवजी पडलेल्या ओलिताचा योग्य फायदा घेऊन कमी कालावधीची कडधान्य पिके घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात उत्पन्न मिळेलच शिवाय जमिनीचा कस सुधारेल आणि पुढील खरीप हंगामासाठी जमीन अधिक सुपीक बनेल. भातकापणीनंतर ओलीत जमिनीवर मूग, कुळीथ, पावटा आणि चवळी ही पिके घेता येतात. मूगपिक ७५ ते ८० दिवसांत येणारे, ओल्या जमिनीत उत्तम उगवणारे पीक आहे. कुळीथ अतिशय सहनशील, कमी खर्चिक व जमिनीचा कस राखणारे आहे. चवळी पीक कमी ओलावा, कमी वेळ आणि उच्च पोषणमूल्य असलेले पीक आहे. पावटा हा शेंगवर्गीय असून, स्थानिक बाजारात चांगली मागणी असणारे पीक आहे. बियाण्यांवर रायझोबियम व फॉस्फेट सॉल्व्हलाईझिंग बॅक्टेरिया उपचार केल्यास पिकांची वाढ अधिक चांगली होते, असेही गांधी यांनी सांगितले. पाऊस आपल्याला थांबवू शकत नाही. आज पीक गेले तरी उद्याचे शेत पुन्हा फुलणार आहे. फक्त आपण न थांबता नवी दिशा घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
------
चौकट
कमी खर्चात अधिक उत्पन्न
शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन कडधान्यांची पेरणी करावी. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळेल. जमिनीतील नायट्रोजन व सूक्ष्म अन्नद्रव्ये वाढतील आणि आगामी खरीप हंगामासाठी जमीन अधिक सक्षम बनेल, अशी माहिती गांधी यांनी दिली.