03314
03315
03316
03317
03318
03319
बिगस्टोरी
इंट्रो
निसर्गसाखळी आणि जैवविविधता कायम राखण्यास इवल्याशा मधमाशीची भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे मधमाशीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी साऱ्यांनी सजग राहणे गरजेचे आहे. मधमाशीचे पालन वा संगोपन करणे आव्हानात्मक असले तरीही, मध संकलन, फलोत्पादन आदी दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेला शेतीपूरक व्यवसाय यामुळे मधमाशी पालन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या असे दोन्ही तऱ्हेने फायदेशीर आहे. कोकणातील वातावरणाला पूरक अशा मधमाशांच्या प्रजातीची निर्मिती केलेली आहे. त्यासाठी मधाचे गाव ही संकल्पना शासनाने राबविण्यास सुरवात केली आहे. तळवडे गावाची त्यासाठी निवड झाली आहे. रोजगारनिर्मितीसह फळबागांमधील उत्पादनाला चालना देणाऱ्या आणि पर्यायाने आर्थिक बळ देण्यात महत्वाची ठरेल अशा मधुमक्षिका पालनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहताना त्याला किफायतशीर व्यावसायिक आयाम मिळणे गरजेचे आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर
----------
डंखविरहीत ‘मधमाशी’शी मैत्रीचा अध्याय
तळवडे मधाचे गाव; परागीकरणाचा फायदा उत्पन्न वाढीसाठी
पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले राजापूरातील तळवडे गाव निसर्गसंपन्न असून पश्चिम घाटातील वनसंपदेचा वारसा या गावाला लाभलेला आहे. तळवडे आणि गुरववाडी अशा दोन महसूल गावांमध्ये विखुरलेल्या या गावाचे १९९५.३३ हेक्टर क्षेत्रफळ असून, गावाची २ हजार ८०० लोकसंख्या आहे. धरणाच्या माध्यमातून बारमाही पाणी उपलब्ध होत असून, येथील शेतकऱ्यांकडून भात, नाचणी आदी प्रमुख शेतीपिके घेतली जातात. तळवडेचे सुपुत्र आणि पितांबरी उद्योगसमुहाचे प्रमुख डॉ. रवींद्र प्रभूदेसाई यांचा पुढाकार अन् प्रयत्नातून तळवडे गावाची महाराष्ट्रातील मधाचे गाव म्हणून निवड झाली असून, त्याद्वारे तळवडे गाव जगाच्या नकाशावर आले आहे, शेती, फलोत्पादन, पर्यटन यांना सहाय्यभूत ठरताना रोजगार निर्मिती करणारा मधुमक्षिका पालन हा महत्वाकांक्षी प्रकल्प पितांबरी उद्योगसमूह, ग्रामपंचायत तळवडे आणि सुगंधी व समृद्ध कोकण विकासमंच तळवडे यांच्यावतीने तळवडे येथे राबवण्यात येत आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे त्यांना मार्गदर्शन आणि खादी ग्रामोद्योग विभाग, जिल्हा परिषद कृषी विभागाचे सहाय्य मिळत आहे. डॉ. रवींद्र प्रभूदेसाई, सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी, पितांबरी उद्योग समूह, सुगंधी व समृद्ध कोकण विकासमंच तळवडेचे पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थांच्या साथीने मधुमक्षिका पालन प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
--------
मधमाशींच्या प्रजाती
मधमाशीच्या शरीराचा रंग काळा किंवा तपकिरी असून, शरीर केसाळ असते. शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोके त्रिकोणी असून वक्षाइतकेच रूंद असते. डोक्यावर शृंगिका, दोन संयुक्त नेत्र, तीन साधे नेत्र आणि मुखांगे असतात. डोके लवचिक मानेने वक्षाशी जुळलेले असते. वक्ष तीन खंडांचे बनलेले असून, प्रत्येक खंडावर पायाची एक जोडी असते. पाय बळकट असतात. पंखांच्या दोन जोड्या असतात. उदर सहा खंडांचे असते. ते रूंद टोक असलेले असून लांबोळके दिसते. उदराचा सहावा खंड इतर खंडांच्या मानाने पुढे आलेला दिसतो. उदराच्या शेवटी काटेरी आणि वाकडी नांगी असते. पोळ्यामध्ये कामाच्या वर्गीकरणानुसार कामकरी माशी, राणीमाशी आणि नरमाशी अशा मधमाशा असतात. इटालियन मधमाशी, आग्या मधमाशी, सातेरी मधमाशी, फुलोरी मधमाशी व पोयाची मधमाशी अशा मधमाशीच्या प्रमुख प्रजाती आहेत. मधमाशांना जास्त प्रमाणात आकर्षित करणाऱ्या फुलांमध्ये झेंडू, जांभूळ, लिंबूवर्गीय फुले, सूर्यफूल, मोहरी, तीळ यांचा समावेश आहे.
-----
चौकट
मधाचे गाव संकल्पना
प्रवेशद्वारावर मधाचे गाव अशी कमान व फलक
जंगलातील, लगतचे गाववाडीतील जागेत मधपेट्या
मध संकलन माहिती व मधविक्री दालन
शास्त्रोक्त मधसंकलन व वर्गीकरण पॅकेजिंग सुविधा
मधमाशा पालनाचे प्रशिक्षण घेतलेले रोजगारकर्ते
जतन-संवर्धनातून मधमाशांची संख्या वाढवली जाते
------
कोकणात आढळणारी प्रजाती
वाढत्या जंगलतोडीध्ये मधमाशांना फुलोऱ्याच्या माध्यमातून मधपुरवठा करणारी झाडे कमी होऊ लागली आहेत. त्याचवेळी कीड-रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागायतींमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रकारची फवारणी केली जात आहे. त्याच्यातून, परागीकरणात महत्वाची भूमिका बजावणारी मधमाशी अडचणीत आली आहे. अशा स्थितीतही कोकणामध्ये वर्षभर डंखविरहित (स्टिंगलेस बी) मधमाशी आढळून येते. त्यामध्ये डंखविरहित मधमाशीच्या ‘टेट्रागोनुला एनआर. पागडेनी’ या प्रजातीने कोकणातील अतिपाऊस, अति आर्द्रता आणि खारे हवामान या प्रतिकूल स्थितीमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कोकणामध्ये पिकणाऱ्या आंबा, काजू, नारळ, फणस, चिकू यासह अनेक पिकांच्या परागीकरणात ही मधमाशी महत्वाची भूमिका निभावते. डंखविरहित मधमाशीचा नैसर्गिक अधिवास प्रामुख्याने झाडांची पोकळी किंवा बीली, घराच्या तडा गेलेल्या भिंती, खिडक्यांमधील फटी, इलेक्ट्रिक पाइप, नळाचे पाइप, दगड खाचा या ठिकाणी केलेल्या वसाहतीमध्ये आढळून येतो.
---------
डंखविरहित मधमाशीची वसाहत पकडण्याचे विकसित तंत्रज्ञान
मध उत्पादक म्हणून नावलौकीक आणि फलोत्पादनात विशेषतः कोकणातील फलोत्पादनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डंखविरहित मधमाशीच्या प्रजातीच्या वसाहतीचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रजातीच्या वसाहती नैसर्गिक अधिवासातून अजिबात विस्कळीत न करता सुखरूप आणि सुरक्षितपणे काढण्याचे खास तंत्र दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीच्या भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील किटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी मागील १० वर्षांपासून या डंखविरहित मधमाशीपालन या विषयावर सातत्यपूर्ण संशोधन करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे तसेच यासोबतच कीटकनाशकांचा मधमाशीवर परिणाम, उत्पन्नवाढ, वसाहतीची दिशा व उंची, जीवनक्रम इत्यादी विषयांवर संशोधन केले आहे. यासोबतच सातेरी मधमाशीवरसुद्धा वसाहत टिकून राहण्यासाठी संशोधन कार्य सुरू आहे. केंद्रामध्ये पन्नास वसाहतींचे संवर्धन करून वेगवेगळे सापळे संशोधकांनी विकसित केले आहेत. त्यामध्ये नैसर्गिक अधिवासातून वसाहती बाहेर काढणेसाठी पावसाळा संपल्यानंतर पीव्हीसी पाइप सापळा दोन कप्प्यामध्ये (३-२० सेमी आणि २.५-१८ सेमी) तयार करावा. त्याच्या पुढे व खालील बाजूस ५ मिमी आकाराचे मधमाशीला प्रवेश करण्यासाठी छिद्र करावे. पाच इंच लांबीचा आणि २५ मिमी व्यासाचा छोटा पाइप घ्यावा. तो पाईप सापळ्याच्या मागील बाजूने व घट्ट बसवावा. दुसरे टोक डंखविरहित मधमाशीच्या नैसर्गिक अधिवासाच्या प्रवेशद्वारामध्ये घट्ट बनवावा. चिकट किंवा सिमेंट घटकाने इतरत्र असलेल्या भेगा व छिद्रे बंद करावीत. वसाहत पकडण्यासाठी हा सापळा चार महिने तसाच ठेवावा.
------
परागीकरणासह उत्पादन वाढीसाठी उपयुक्त
मधमाशी परागीकरण आणि त्याद्वारे उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरते. मधमाशा मध गोळा करण्यासाठी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असताना त्या फुलामधील परागकण त्यांच्या शरीराला चिकटतात आणि एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाताना परागकणांचे हस्तांतरण होते. यामुळे परागीभवन होण्यास मदत होते. मधमाशांच्या माध्यमातून होणारे परागीभवन हे जैविक विविधतेसाठी उपयुक्त ठरत आहे. त्याचवेळी मधमाशांच्या माध्यमातून होणाऱ्या परागीभवनामुळे पिकाचे उत्पादनातही वाढ होण्याच्यादृष्टीने उपयुक्त ठरते.
------
रासायनिक फवारणीचा परिणाम
उत्पादन वाढवण्याचा हव्यास आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक औषधांची सातत्याने शेतशिवारामध्ये फवारणी केली जाते. विशेषतः हापूस-काजू आंबाबागांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते; मात्र, रासायनिक फवारणीचा मधमाशांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होताना दिसतो. रासायनिक फवारणी केलेल्या बागेमध्ये मधसंकलन पेटी बसवलेली असल्यास फवारणीमुळे होणाऱ्या त्रासातून मधाचे पेटी वा वसाहत सोडून मधमाशी निघून जाते. त्या भागातील मधमाशांच्या वसाहती नष्ट होतात. या साऱ्याचा फवारणी होत असलेल्या हापूस आंबा-काजूबागांमध्ये मधमाशांच्या माध्यमातून अपेक्षित असलेले परागीकरण होत नसल्याने त्याचा त्या बागांमधील उत्पादनासाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही. अशावेळी ज्या बागेमध्ये फवारणी करायची आहे त्या बागेपासून सुमारे तीनशे मीटरवरच्या दुसऱ्या बागेमध्ये मधमाशी वसाहत वा पेटी हलविल्यास मधमाशी वसाहत सोडून जाण्याचा वा वसाहत नष्ट होण्याचा धोका टाळला जातो.
------
मधमाशी वसाहत व्यवस्थापनाचे कौशल्य
मधमाशी पेटी वा वसाहतीचे दैनंदिन निरीक्षण, पेटीची साफसफाई, कीड-मुंग्यांचा शिरकाव झाला आहे का? याची पाहणी नियमित करावी लागते. धोकादायक मुंगी पेटीमध्ये जाऊ नये म्हणून पेटीच्या खाली उन्हाळ्यामध्ये ऑईल, पावसाळ्यामध्ये पाणी ठेवणे आदी योग्य त्या उपाययोजनाही कराव्या लागतात. पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मध मिळतो; मात्र, उन्हाळ्यामध्ये फुलोरा नसलेल्या कालावधीमध्ये मध मिळणे अवघड असते. या वेळीही मधमाशी आणि पेटीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागते. पेटी वा वसाहतीमध्ये राणीमाशीची भूमिका महत्वाची असते. एका पेटीमध्ये एकाचवेळी दोन राणीमाशी राहत नाहीत. त्यामुळे वसाहतीतील राणीमाशी ओळखणे कौशल्यपूर्ण असते. त्याचवेळी नवीन राणी माशीचा जन्म कधी होणार यावर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे असते. नवीन राणीमाशी जन्मल्यानंतर ती राणीमाशी जुन्या पेटीतून अन्य नव्या पेटीमध्ये काळजीपूर्वक हलवावी लागते अन्यथा, ती राणीमाशी उडून जाते. एकंदरीत, मधुमक्षिका पालन शेतीमध्ये मधमाशांच्या पोळे वा वसाहतीचे व्यवस्थापन करणे कौशल्याचे असते. योग्यपद्धतीने व्यवस्थापन न झाल्यास त्यातून नुकसानीचा फटका बसतो.
---------
उलाढाल वाढीसाठी पोषक
मधमाशीच्या माध्यमातून परागीभवानाद्वारे एक हेक्टर आंबाबागेमध्ये सुमारे ५० हजार रुपयांची उत्पादनवाढ होते. आंब्यासोबत त्या बागेमध्ये अन्य झाडांची लागवड केलेली असल्यास त्यांच्याही उत्पादनामध्ये वाढ होते याशिवाय पेटीद्वारे संकलित होणाऱ्या मधाची विक्री, एका पेटीपासून जादा पेट्या आणि वसाहती निर्मिती आणि विक्रीतूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते. मधमाशी पेटी आणि मशमाशी वसाहती यांच्या खरेदीसाठी सर्वसाधारणतः ६ हजार रुपये खर्च येतो. मधमाशी पेटीच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या अन्य साहित्य खरेदीसाठी १ हजार रुपये असे मिळून एका मधमाशी पेटी आणि व्यवस्थापनासाठी ७ हजार रूपये खर्च येतो. हापूस आंब्याच्या बागेचा विचार करता एका झाडाला हंगामामध्ये सर्वसाधारणतः २०० फळे लागतात. मधमाशीच्या माध्यमातून झालेल्या परागीभवनातून १० टक्के उत्पादनात वाढ झाल्यास एका झाडावर २० फळे म्हणजे दीड डझन फळांची वाढ होते. एका डझनाचा साधारणतः ३०० रूपये दर असला तरी, दीड डझनाला पाचशे रुपये उत्पन्न मिळते.
--------
चौकट
मधुमक्षिका पालनाचे फायदे
शेतीपूरक जोडव्यवसाय
कमी गुंतवणुकीतून जादा उत्पन्न
परागीकरणाने फलोत्पादनासाठी उपयुक्त
पर्यटनवृद्धी आणि रोजगार निर्मिती
मधामध्ये औषधी आणि पौष्टिक गुणधर्म
------------------------
मधुमक्षिका पालनासमोरील आव्हाने
कीटकनाशकांचा अतिरेकी वापर
रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश
वृक्षतोडीमुळे नैसर्गिक अधिवासाचा अभाव
फुलांसह वनस्पतींच्या प्रजाती कमी झाल्या
परागकणांची भासणारी कमतरता
जास्त उन्हाळा, थंडीचा जीवनमानावर परिणाम
योग्य प्रशिक्षण आणि संसाधनांचा अभाव
पारंपरिक पद्धतीमुळे वसाहती नष्ट होण्याचा धोका
-----
चौकट
मधमाशी पालनावर संशोधनः डॉ. वानखेडे
जगभरामध्ये मधमाशांच्या २० हजार ९२ प्रजाती असून त्यापैकी भारतामध्ये सातेरी (एपिस मेरेना इंडिका) आणि इटालियन (एपिस मेलिफेरा) या मधमाशा मध आणि परागीकरणासाठी पाळल्या जातात. या दोन्ही मधमाशा डंख मारणाऱ्या आहेत; मात्र, कोकणामध्ये डंखविरहित मधमाशी (स्टिंगलेस बी) ती केस, डोळे आणि कानावर हल्ला करत असली तरीही डंख नसल्यामुळे फारशी इजा (वेदना) होत नाहीत. नैसगिक वनस्पती आणि कृषी पिकांमध्ये उत्कृष्टपणे परागीकरण करतात. त्यांच्या वसाहतीतून कमी मध मिळत असला तरी, त्यातील औषधी गुणधर्म आणि पौष्टिक, त्यासोबत या मधमाशांची परागीकरणातील महत्वाची भूमिका यांमुळे त्यांच्या पालनासंबंधित संशोधन केले जात आहे. या प्रजातीच्या वसाहती नैसर्गिक अधिवासातून अजिबात विस्कळीत न करता सुखरूप आणि सुरक्षितपणे काढण्याचे खास तंत्र विकसित करण्यात आले आहे. हे संशोधन मधमाशा पालनासाठी निश्चितच उपयुक्त आहे, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी सांगितले.
--------
कोट १
शेती, बागायतीच्या जोडीला जोडव्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाय उपयुक्त आहे; मात्र, मधमाशांचे पोळे वा वसाहतीचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे लागते. वसाहतीचे व्यवस्थापन योग्यरीत्या न झाल्यास त्याचा फटका बसतो. मधुमक्षिका पालनाचा बागेतील नारळाचे उत्पादनवाढीसाठी चांगला उपयोग झाला. उत्पादनही वाढले; मात्र, आंबाबागेतील उत्पादनवाढीसाठी त्याचा उपयोग झालेला नाही. कीडरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागांमध्ये होणाऱ्या फवारणीचा मधमाशांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने मधमाशांच्या माध्यमातून परागीभवन होऊन उत्पादन वाढवायचे असेल तर फवारणी टाळणे गरजेचे आहे.
- ओंकार रानडे, गावखडी
------
कोट २
शेती, बागायतीच्या जोडीला जोडव्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाय फायदेशीर आहे. मधविक्रीतून होणाऱ्या उलाढालीतून चांगले अर्थार्जन होते. त्याचवेळी परागीभवनाच्या माध्यमातून बागांमधील उत्पादनवाढीलाही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून मधुमक्षिका पालन व्यवसायाकडे पाहणे गरजेचे आहे.
- अनिल कांबळे, मधुमक्षिका पालन प्रकल्प समन्वयक देवडे, संगमेश्वर
-------
कोट ३
तळवडे गावाची महाराष्ट्रातील मधाचे गाव म्हणून निवड झाली आहे. पितांबरी उद्योग समूह, तळवडे ग्रामपंचायत आणि सुगंधी व समृद्ध कोकण विकासमंच तळवडे यांच्यावतीने तळवडे येथे मधुमक्षिका पालन हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. शेती, फलोत्पादन, पर्यटन यांना सहाय्यभूत ठरताना रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चितच तळवडे गावविकासाला चालना मिळणार असून, हा प्रकल्प स्वागतार्ह आहे.
- कुंजन साळवी, मधाचे गाव-तळवडे
.....
कोट
शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे तळवडे हे ‘मधाचं गाव’ म्हणून जाहीर झालेले आहे. त्यासाठी ५४ लाखांचा निधी मंजूर आहे. मधकेंद्र विकसित योजना अंतर्गत गावात १०० पेट्या देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ५० टक्के अनुदान वस्तुरूपात आहे. त्यात मधमाशांसह, मधयंत्र आणि अन्य आवश्यक साहित्य दिले आहे. मधाचं गाव विकसित करण्यासाठी गावात मधपाळ तयार करण्यात येणार आहेत. तसं झालं तर परागीभवन वाढेल, गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावांतील शेतीचं उत्पन्न वाढेल आणि मधाच्या व्यवसायातून उत्पन्नात वाढ होईल.
– अमित इंदुलकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी
----------
कोट
तळवडे ग्रामपंचायत, पितांबरी उद्योग समूह आणि समृद्ध कोकण विकास मंच यांच्यावतीने तळवडे येथे मधुमक्षिका पालन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत मधसंकलन, चित्रसंग्रहालय, सेल्फी पॉईंट उभारणी यांसारखे वेगवेगळे उपक्रम गावात राबविले जाणार आहेत. त्याद्वारे शेतकरी आणि ग्रामस्थांना या प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. शेती, फलोत्पादन आणि पर्यटन यांना सहाय्यभूत रोजगारनिर्मितीला या प्रकल्पातून चालना मिळणार आहे.
– गायत्री साळवी, सरपंच, तळवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.