03353
‘भाव तोची देव’ नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध
‘केपीएल २०२५’; दशावतार लोककलेला व्यासपीठ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित ‘केपीएल २०२५’ सांस्कृतिक क्रीडा महोत्सवात समाजाच्या कलावंतांनी सादर केलेल्या ‘भाव तोची देव’ या पौराणिक संयुक्त दशावतारी नाट्य प्रयोगाने हजारो समाज बांधवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या नाट्यप्रयोगाने रसिकवर्ग मंत्रमुग्ध झाला.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सांस्कृतिक चळवळीची खाण म्हणून ओळखला जातो. अनेक कला या ठिकाणी असून या कलेचा प्रचार प्रसार होण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार कार्यरत आहेत. येथील कला, नाट्य, नृत्य, अभिनय अशा विविधांगी कलांनी सिंधुदुर्ग हा सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू ठरला आहे. या अनेक कलांमध्ये सातासमुद्रापलीकडे गेलेली कोकणची दशावतार लोककला निश्चितच प्रत्येकाला अभिमानास्पदच अशी म्हणावी लागेल. गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळदेशकर आद्य गौड प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित ‘केपीएल २०२५’ कला, क्रीडा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत समाजातील कलावंतांनी दशावतार लोककला सादर केली. कुडाळदेशकर ज्ञाती बांधव समाजातील दशावतारी क्षेत्रात कार्यरत असणारे दिग्गज कलाकार एकत्रित येऊन ‘भाव तोची देव’ हा पौराणिक संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला. कथा संकल्पना दशावतारी नटसम्राट आनंद दाभोलकर आणि दिलीप सामंत यांची होती. यामध्ये कलाकार भाई सामंत, दिलीप सामंत, रामदास सामंत, आनंद दाभोलकर, संजय पाटील, नाना प्रभू, संतोष सामंत, सुयश ठाकूर यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांना संगीत साथ ज्येष्ठ हार्मोनियम वादक भाऊ देसाई, मृदंग-यतीन सामंत, तालरक्षक-समीर तेंडोलकर यांनी दिली. ही लोककला पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांतील समाजाचे ज्ञाती बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पु. ल. देशपांडे रंगमंचावर ही दशावतार लोककला कलावंतांनी साकारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.