‘ओंकार’ला इजा होईल
असे कृत्य करू नका
हत्तीप्रश्नी वनविभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः सावंतवाडी तालुक्यात सध्या ‘ओंकार’ हत्तीचा वावर सुरू आहे. सातोसे, कास, मडुरा, रोणापाल, ओटवणे, विलवडे, भालावल, तांबोळी, डेगवे, वाफोली, इन्सुली आणि बांदा या गावांच्या परिसरात हा वन्यहत्ती भातशेती, फळबागायती आणि लोकवस्तीच्या भागात दिसत आहे. त्याला मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक अधिवासात ठेवण्यासाठी वनकर्मचारी तसेच जलद बचाव कृती दलाकडून सतत देखरेख ठेवण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी वन परिक्षेत्र अधिकारी सु. बा. पाटील यांनी दिली.
सोशल मीडियावर तेरेखोल नदीपात्रात ओंकारचा वावर असताना फटाके फोडल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला. या प्रकरणाची चौकशी केली असता, २ नोव्हेंबरला दुपारी हत्तीने इन्सुली परिसरातील भातशेती आणि केळी बागायतीत नुकसान केल्याचे समोर आले. यानंतर हत्ती नदीपात्रात पाणी पिण्यास गेला असता, त्याने पाण्याजवळील विद्युत मोटरपंपाचा पाईप सोंडेने ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्युत प्रवाहामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली. अशा स्थितीत शेतकऱ्याने व वनकर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी वन्यहत्तीपासून काही अंतरावर फटाके वाजवले, जेणेकरून हत्तीला कोणतीही इजा न होता तो त्या भागातून निघून जाईल. या घटनेत हत्तीला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाली नाही, याची खात्री वनविभागाने केली आहे. अपवादात्मक परिस्थितीतच फटाक्यांचा वापर केला जातो, आणि तोही वन्यहत्तीच्या जीवितास कोणताही धोका होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाते, असे वन विभागाने स्पष्ट केले. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘ओंकार’ पाहण्यासाठी परिसरात गर्दी करू नये, हत्तीच्या हालचालींमध्ये अडथळा आणणारी किंवा त्याला इजा होईल अशी कोणतीही कृती करू नये, वन्य प्राण्यांचा आदर राखावा आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.