rat12p8.jpg-
03904
रत्नागिरीः अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचारमंथन कार्यशाळेत सहभागी अधिकारी व सदस्य.
-------
अंबरग्रीसविषयी लोकाभिमुख धोरण हवे
डॉ. केतन चौधरी; जनजागृतीसाठी विचारमंथन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ः अंबरग्रीसबाबत कायद्याची भीती न दाखवता लोकांमध्ये त्या विषयी जनजागृती करण्याची गरज आहे. त्याकरिता ज्याला अंबरग्रीस मिळेल त्याला बक्षीसरूपात शासनाकडून काहीतरी मोबदला दिला गेला तर कायद्याची भीती न राहता कायद्याची उत्तम अंमलबजावणी होईल, असे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी सांगितले.
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त अंबरग्रीस जनजागृतीसाठी आयोजित विचारमंथन कार्यशाळेत ते बोलत होते. आसमंत फाउंडेशनच्या साह्याने ही सभा झाली. या सभेत सुमारे ४० शास्त्रज्ञ, मत्स्य व्यावसायिक, वनविभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, युएनडीपी प्रकल्पाचे अधिकारी व मान्यवर संस्थाचे अधिकारी सहभागी झाले होते.
स्पर्म व्हेलच्या उलटीला अंबरग्रीस असे म्हटले जाते. व्हेल (जलचर प्राणी) संरक्षित असल्याने त्याची उलटीसुद्धा भारतात संरक्षित मानली जाते. व्यावसायिक बाजारपेठेत या अंबरग्रीसला मोठी किंमत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत अंबरग्रीस संरक्षित असली तरीही इंग्लंड, न्यूझिलंड, फ्रान्स इत्यादी देशात व्हेल संरक्षित असला तरीही अंबरग्रीस संरक्षित नाही. कोकण किनाऱ्यावर अंबरग्रीस आढळून येण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे.
संशोधनाचे मुद्दे कोणते असावेत तसेच लोकाभिमुखी धोरण कसे असावे, यावर विचारमंथन करण्यात आले. या प्रसंगी अभिरक्षक डॉ. हरीश धमगये यांनी प्रस्तावना केली. प्रा. डॉ. आसिफ पागरकर यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा इतिहास आणि कार्याची माहिती दिली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी मत्स्य व्यावसायिकांमध्ये किनारपट्टी कार्यक्रमातून अंबरग्रीसबाबत जनजागृती निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली.
चौकट
अंबरग्रीसबाबत न घाबरता कळवा
कांदळवन अधिकारी किरण ठाकूर यांनी अंबरग्रीसबाबत भीती न बाळगता सापडल्यास १९२६ या हेल्पलाईन नंबरवर किंवा जलचर या मोबाईल ॲपवर कळवण्याचे आवाहन केले. ठाकूर यांनी वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अॅक्ट १९७२ मधील अंबरग्रीससंबंधी नोंदी आणि कायदेविषयक स्थिती याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर अंबरग्रीस पर्यावरणपूरक लोकोपयोगी शासन भूमिका यावर खुली चर्चा करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.