swt137.jpg व swt138.jpg
O04124, O04125
दोडामार्ग ः तालुक्यात हत्तींनी माड, केळी बागायतींचे केलेले नुकसान.
swt139.jpg
O04126
दोडामार्ग ः तालुक्यात हत्तींच्या कळपाचा वावर पाहायला मिळत आहे.
swt1310.jpg
O04115
बांदा ः परिसरात सध्या ओंकार या हत्तीचा वावर सुरु आहे. (सर्व संग्रहीत छायाचित्रे.)
काहीही करा; पण हत्तींना रोखा !
हत्तीबाधित शेतकऱ्यांचा आक्रोश; एका रात्रीत उत्पन्नाचे साधन होते नेस्तानाबुत
संदेश देसाई ः सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १३ ः जिल्ह्यात दिर्घकाळ वास्तव्य असलेल्या हत्तींमुळे शेकडो शेतकरी देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली. हत्ती हल्ल्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले. आतापर्यत या हत्तींच्या उपद्रवापासून सुटका व्हावी म्हणून अनेक आंदोलने, उपोषणे झाली.
हत्ती पकड मोहीम पुन्हा एकदा राबवण्याच्या हालचालीही सुरु झाल्या; मात्र हत्तींना तिलारी जंगलात सोडावे, असा नवा विचार पर्यावरणप्रेमींकडून पुढे येऊ लागला आहे. तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांचा त्रागा मात्र या सगळ्याहून वेगळा आहे. कुटुंबाच्या उत्पन्नाचे पिढ्यानपिढ्याचे साधन असलेल्या बागायती एका रात्रीत नेस्तानाबुत करणाऱ्या हत्तींना वस्ती आणि बागायतींपासून कायमचे दूर ठेवणारे ठोस उपाय योजा अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.
तिलारी खोऱ्यासह तालुक्याच्या हत्तींच्या मार्गात येणाऱ्या गावांमधील शेतकरी हत्तींच्या दहशतीखाली आहेत. हत्तींचा कळप तालुका हद्दीत पहिल्यांदा ७ ऑक्टोबर २००२ मध्ये दिसला. कर्नाटकातून मांगेलीमार्गे ते दोडामार्ग तालुक्यात उतरले. गेली तेवीस वर्षे या ठिकाणी हत्तींचा वावर आहे. आतापर्यतचा आढावा घेतल्यास हत्तींमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यांना रोखण्यासाठी पकड मोहीमांसह इतर कारणांसाठी वनविभागाने खूप मोठा खर्च केला; मात्र हे उपाय अयशस्वीच ठरले. शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून उभ्या केलेल्या शेकडो एकरवरील बागा जमिनदोस्त झाल्या. सुरवातीला तिलारी खोऱ्यात स्थिरावलेले हत्ती हळूहळू तालुकाभर पसरले. ते अगदी वस्तीपर्यत पोहचले. एकाच वेळी चार ते पाच हत्तींचा कळप नारळ, सुपारीच्या बागेत घुसतो तेव्हा तो काही तासात तेथील झाडे जमिनदोस्त करतो. ही बाग म्हणजे त्या कुटुंबाच्या अर्थाजनाचे पिढ्यानपिढ्याचे साधन असते. गेल्या २३ वर्षात अशी अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उध्दवस्त झाली आहेत. या सगळ्या परिस्थितीतून गेलेल्या कुटुंबांना हत्तींपासून संरक्षण हवे असल्याचा सूर त्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील हत्तीबाधीत क्षेत्रातील शेतकऱ्यांचा कानोसा घेतला असता हे चित्र समोर आले.
अशा शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया जोडून समोर आलेले चित्र वेगळे आहे. हत्तींचा मुक्तसंचार असाच वाडी-वस्त्यांवर राहीला तर
भविष्यात तालुक्यातील बागायती आणि शेती कागदावरच ऊरेल अशी भिती या शेतकऱ्यांना वाटत आहे. बऱ्याच भागात हत्तींच्या भीतीपोटी शेती करणे देखील सोडून दिले आहे. त्यातील काहींकडे शेतीशिवाय अन्य दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे ते जीव धोक्यात घालून आणि नुकसान सहन करुन शेतात राबराब राबत आहेत. ही जोखीम उचलली नाही तर आपल्या कुटुंबातील मुले, वृद्ध आई- वडील, पत्नी यांना उपासमारीला सामोरे जावे लागेल, म्हणून ते हे धाडस करत आहेत. हत्तींचा मुक्तसंचार कायम राहिल्यास आम्ही जगायचे कसे असा त्यांचा सवाल आहे. शेतकऱ्यांनी करावे तरी काय? आपल्या मुला-बाळांच्या उज्वल भविष्याची स्वप्ने कशी साकारावी? या त्यांच्या प्रश्नाची त्यांना उत्तपरे हवी आहेत.
जंगलातील अन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान होत असले तरी हत्तीच्या तुलनेत ते कमी असते. ते सोसता येणेजोगे असते; मात्र हत्ती आला तर ही शेती भूईसपाट करुन जातो. हत्ती २३ वर्षापूर्वी तालु्क्यात आले मात्र येथील शेती, बागयती अनेक पिढ्यानपासून आहे. त्यामुळे हत्तींबाबत काहीही निर्णय घेतला तरी त्यांच्या उपद्रवापासून कायमची सुटका करा, अशी आर्त हाक हत्तीबाधीत क्षेत्रातील शेतकऱ्यांची आहे. कर्नाटकातून मांगेलीमार्गे दोडामार्ग तालुक्यात उतरलेल्या हत्तींनी त्यावेळी तिलारीच्या खोऱ्यात जी भयावह स्थिती निर्माण झाली, त्याहीपेक्षा अधिक पटीने आताची परिस्थिती आहे. त्यावेळी वर्षाला एक किंवा दोन वेळा हजेरी लावून हत्ती माघारी फिरत असत. त्यांना तिलारीत येण्यापासून परावृत्त करण्यासाठी वनविभागाने अनेक उपाययोजना केल्या; मात्र त्या सगळ्या अपयशी ठरल्या. त्यांच्या येण्याच्या मार्गावर मिरचीचे दोरखंड लावले, काही ठिकाणी तर जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खंदक खोदले. हत्तींना घाबरवण्यासाठी फटाके-अॅटमबॉम्ब फोडून लाखों रुपयांची राखरांगोळी केली. सौरकुंपणाचे धोरण राबवून गावाच्या वेशीबाहेर रोखून धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्तींना जंगलातच रोखण्यासाठी रसद पोहोचविण्याचा देखील घाट घालण्यात आला. हत्ती गवताची लागवड करण्यात आली. एवढेच नाही तर, तत्कालीन आमदार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून ''हनी बी'' प्रोजेक्टचा सुध्दा प्रयोग करण्यात आला. हत्तींपासून लोकांना सावध करण्यासाठी सायरनसारखी सिस्टिम राबविण्यात आली. एवढे सगळे उपद्व्याप करून शेवटी वनविभाच्या हाती आले केवळ अपयश आणि मनस्ताप. वेळोवेळी शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसान झालेल्या पंचनाम्याच्या आकड्यात वाढ करण्यासाठी राजकियांचा धाक, हत्तींच्या मागून पळापळ या साऱ्या गोष्टींना वनविभाग देखील अक्षरशः वैतागला आहे. जंगली प्राण्यांच्या संवर्धनाचा भार त्यांच्यावर असला तरी, जंगली प्राण्याला काही विशिष्ट जागेत रोखून धरण्याचा चमत्कार त्यांच्या हाती नाही. त्यामुळे एकीकडे हत्तींना थोपवायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे शिव्याशाप घ्यायचे, अशी गोची या विभागाची झाली आहे.
तिलारीच्या जंगलातील जैवविविधतेत भर पडत असली तरी, येथील शेती धोक्यात आली आहे. सहाजिकच शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात डोंगरांच्या कुशीत शेकडो वर्षांपासून अनेक गावे वसले आहेत. कित्येक पिढ्यांनी येथील निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन व्यतीत केले आहे. डोंगर कपाऱ्यांत शेती पिकवून कुटुंब पोसले आहे. शेकडो एकर जमिनीत उभी केलेल्या वडिलोपार्जित बागायतीचे जतन करून उदरनिर्वाह करीत आहेत. शेती हे येथील लोकांच्या उपजीविकेचे एकमात्र साधन आहे; मात्र याला धक्का पोहोचत आहे तो उभ्या ठाकलेल्या हत्तीरुपी संकटामुळे. त्यामुळे हत्तींच्या अधिवासाबाबत काहीही निर्णय घ्यायचा असला तरी त्यांना तालुक्यातील ६६ययगाव, वस्ती आणि शेती, बागायतीपासून कायमचे दूर ठेवले जाईल अशी ठोस योजना आखावी, अशी अपेक्षा हत्तीबाधित शेतकरी व्यक्त करत आहेत.
.......................
चौकट
...तर स्थलांतराची वेळ येईल
हत्ती हा येथील पूर्व परंपरागत विषय नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून उद्भवलेली ही समस्या आहे. सद्यस्थितीत या समस्येने उग्ररुप धारण केले आहे. हत्तींना तिलारीच्या जंगलात थारा दिल्यास त्यांच्या संख्येत अजून वाढ होईल. यापुढे असेच चालू राहिले तर, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावातील लोकांवर घरे, शेती, वडिलोपार्जित मालमत्ता सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याची नामुष्की भविष्यात ओढवेल. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागायला वेळ लागणार नाही. शेती व शेतकऱ्याला वाचवायचे असेल तर हत्ती पकड मोहीम राबविणे अनिवार्य आहे. अशी प्रतिक्रिया हत्ती बाधित हेवाळे गावातील शेतकरी रवींद्र गवस, विठ्ठल गवस, प्रवीण देसाई, समीर देसाई, तुकाराम गावडे, वृषभ देसाई, तातोबा देसाई, नीतेश गवस, बुवासाहेब देसाई, संजय गवस, मनोहर गवस आदींनी दिली आहे.
.....................
swt1311.jpg
04116
रवींद्र गवस
swt1312.jpg
04117
पंकज गवस
swt1313.jpg
04135
तुषार देसाई
swt1314.jpg
04136
सुरेंद्र सावंत
कोट
हत्ती हा आपल्या भागातील प्राणी नाही. त्याला तिलारीतच संवर्धित करा, असा अट्टहास धरणे योग्य नाही. हत्तींना तिलारीच्या राखीव क्षेत्रात ठेवण्यात आले तर, ते आजूबाजूच्या गावात फिरून नुकसान करतील. एकतर हत्तींना त्यांच्या मूळ अधिवासात (कर्नाटक) पाठवा किंवा नाहीतर अन्य कुठेही. आजपर्यंत उद्ध्वस्त झालेली शेती-बागायती पुन्हा नव्याने उभी करणे सोपे काम नाही. त्यासाठी अर्धेअधिक आयुष्य खर्ची घालावी लागते. हत्तींनी एका रात्रीत वीस नारळाची झाडे उखडून टाकली. असे प्रकार गेली कित्येक वर्षे चालू आहे. शेतकरी संपला तरी चालेल पण, हत्ती तिलारीतच पाहिजे, ही धारणा चुकीची आहे.
- रवींद्र गवस, शेतकरी, हेवाळे.
......................
कोट
माझी पाच एकर क्षेत्रातील ३० वर्षांची एकूण ८५ नारळाची झाडे तीन वर्षांत हत्तींनी जमीनदोस्त केली. तसेच शेताला असलेले सोलर फेंन्सिंग व कंपाउंड जमीनदोस्त केल्याने गवे, डुक्कर व अन्य प्राण्यांचाही हस्तक्षेप वाढला आहे. सुमारे १०० च्या वर काजूची झाडे तसेच अन्य झाडे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. या झाडांपासून मला वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळत होते; मात्र केवळ हत्तींच्या वावरामुळे आज बंद झाले आहे. जोपर्यंत हत्तींचा वावर चालू राहील, तोपर्यंत भविष्यात मी नव्याने कुठलीही लागवड करून उत्पन्न घेऊ शकत नाही.
- पंकज गवस, शेतकरी, मोर्ले
........................
कोट
मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आई-बाबांना शेतात राबताना पाहिले आहे. त्यांची अपार मेहनत जीव पिळवटून टाकणारी आहे. आता त्याच मेहनतीवर हत्तींच्या रुपाने बुलडोझर फिरत आहे. अनेक माड-पोफळी, काजूची झाडे हत्तींनी उद्ध्वस्त केली. आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून जी बागायत उभी केली, ती हत्तींच्या पायदळी तुडविण्यासाठी का0 गावाला लागून असलेल्या ८०० एकर डोंगर भागात हत्ती स्थिरावला नाही, कारण त्या जंगलात त्यांच्यासाठी खाद्यच उपलब्ध नाही. भूक भागविण्यासाठी ते शेतीवर तुटून पडतात. तिलारी खोऱ्यात हत्ती राहिल्यास शेतीबरोबरच शेतकरी सुद्धा त्यांचया पायदळी तुडवला जाईल.
- तुषार देसाई, शेतकरी, मोर्ले
..................
कोट
दोडामार्गमध्ये जे हत्ती संकट उभे आहे, त्यामुळे हत्तींना पकडणे खूप गरजेचे आहे. हत्तींमुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. हत्तींच्या हल्ल्यात घरातील कर्त्या व्यक्तींनी जीव गमावला. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काहींचा आधार हरपला आहे. शेतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. शासन जरी नुकसानभरपाई देत असले तरी, ती तुटपुंजी आणि कधीही भरून न निघणारी आहे. त्यामुळे हत्तीपकड मोहीम राबवून येथील शेतकऱ्यांना अभयदान द्यावे.
- सुरेंद्र सावंत, सरपंच, तळकट
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.