मुंबईत रविवारी
सन्मान सोहळा
कुडाळः श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीच्या वतीने यंदाच्या दिवाळीत छत्रपती शिवरायांच्या आणि पराक्रमी वीरांच्या शौर्याची प्रतीके असणाऱ्या गड-दुर्गांना साकारणाऱ्या मावळ्यांचा सन्मान करण्यासाठी ''जागर गडदुर्गांचा, दीप दुर्गोत्सव सोहळा २०२५ सन्मान गड-दुर्ग साकारणाऱ्या मावळ्यांचा'' हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांना ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा रविवारी (ता. १६) सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, दादर (प.) येथे होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राहुल, सर्वेश यांच्याशी संपर्क करावा.
.....................
गावराई येथे रविवारी
सांस्कृतिक कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरीः गावराई महिला मंडळ आयोजित व सुप्रिया वालावलकर पुरस्कृत श्री देव गिरोबा मंदिर येथे रविवारी (ता. १६) रोंबाट उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये सायंकाळी ५ ते ६ पर्यंत खाऊगल्ली कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम, ६ ते ७ पर्यंत ''होममिनिस्टर'', ७ ते ८ वाजेपर्यंत मुलांचे रेकॉर्ड डान्स, रात्री ८ ते १० या वेळेत मांडेश्वर ग्रुप नेरुर यांचे पारंपरिक रोंबाट लोककला नृत्य व हलते देखावे प्रदर्शन, ८.३० वाजता उपस्थितांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम होणार आहे. गावराई सरपंच सोनल शिरोडकर, माजी सरपंच जयमाला वेंगुर्लेकर, मनोरमा परब, महिला मंडळाच्या प्रणिता मेस्त्री, नेहा आयरे, रेश्मा भोगले, लक्ष्मी सावंत, कुंदा कदम, अश्विनी परब, अन्वी राऊत, मनीषा गावडे यांच्यासह गावातील महिलांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावराई महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
.....................
आंदुर्लेत रविवारी
धार्मिक कार्यक्रम
कुडाळः भगवद्भक्ती प्रबोधिनी, सिंधुदुर्ग व प. पू. गिरीशनाथ आंबिये महाराज सेवा ट्रस्ट, आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा संजीवन समाधी सोहळा रविवारी (ता. १६) आंदुर्ले-कुंभारभाटले येथील श्री दत्त मंदिर (प. पू. गिरीशनाथ महाराज समाधी मंदिर) येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित सकाळी ७.३० वाजता नारदमूर्ती व ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन, ७.३० वाजता विलास रेवंडकर प्रस्तुत हरिपाठ, ९ ते दुपारी १ वा. पर्यंत चक्रीकीर्तन, दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत चक्रीकीर्तन व त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने सादर होणार आहेत. त्यांना प्रसिद्ध वादकांची संगीत साथ लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भगवद्भक्ती प्रबोधिनी, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय पुनाळेकर व प. पू गिरीशनाथ आंबिये महाराज सेवा ट्रस्ट, आंदुर्लच्या वतीने करण्यात आले आहे.
.....................
शिरोडा माऊली
जत्रोत्सव रविवारी
वेंगुर्लेः शिरोडा ग्रामदैवत देवी माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी (ता. १६) उत्साहात साजरा होणार आहे. केळी ठेवणे, ओटी भरणे, दुपारपासून महाप्रसाद, रात्री पालखी प्रदक्षिणा, वालावलकर दशावतार कंपनीचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. माऊली पंचयातन देवस्थानचे विश्वस्त, गावकर मंडळी, ग्रामस्थांच्या सभेत नियोजन करण्यात आले.
....................
त्रिंबक येथे उद्या
हरिनाम सप्ताह
आचराः त्रिंबक बगाडवाडी येथील जागृत देवस्थान देव महापुरुष मंदिर येथे सात प्रहरांचा वार्षिक हरिनाम सप्ताह शनिवारी (ता. १५) होणार आहे. यानिमित्त सकाळी देव महापुरुष पाषाणाकडे अभिषेक, विधीवत पूजा, १० वाजता हरिनाम सप्ताहाला सुरुवात, रविवारी (ता. १६) दुपारी महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता होईल. यावेळी दशक्रोशीतील भजनी मंडळे आपली भजनकला सादर करणार आहेत. देव महापुरुषाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नवस फेडण्यासाठी केळी अर्पण केली जातात. भाविकांनी हरिनाम सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, त्रिंबक बगाडवाडी यांनी केले आहे.
..................
कुडाळात धोकादायक
वीज खांब बदलले
कुडाळः अभिनवनगर व विठ्ठलवाडी येथील धोकादायक स्थितीत असलेले लोखंडी वीज खांब नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून बदलण्यात आले. अभिनवनगर व विठ्ठलवाडी येथील विद्युत खांब गंजले होते. त्यामुळे ते कधीही तुटून पडण्याची शक्यता होती. यासंदर्भात नागरिकांनी शिरसाट यांना माहिती दिली. याची दखल घेत शिरसाट यांनी महावितरणला सांगून हे वीज खांब बदलून घेतले. कमी उंचीवर असलेल्या वाहिन्याही योग्य उंचीवर नेण्यात आल्या. नागरिकांनी शिरसाट यांचे आभार मानले. धोकादायक स्थितीत असलेले विद्युत खांब वा वाहिन्या खाली आल्या असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिरसाट यांनी केले आहे
.......................