swt1326.jpg
04212
वेंगुर्ले नगरपालिका
वेंगुर्लेत उमेदवार चाचपणी, बैठकांचे सत्र
नगरपालिका निवडणूकः युती-आघाडीबाबत मात्र संभ्रम कायम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १३ः पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सर्वच पक्ष व इच्छुक उमेदवार चाचपणी आणि बैठकांमध्ये गुंतले आहेत. मात्र, युती आणि आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट नसल्याने राजकीय गणिते अजूनही बदलत्या स्थितीत आहेत. पूर्वीच्या १७ नगरसेवकांऐवजी यावर्षी पालिकेत ३ नवीन जागांची भर पडून एकूण २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे २१ जण शहराचा कारभार पाहणार आहेत. तसेच २०१६च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे हजार मतदारांनी वाढ नोंदवली आहे.
खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात युती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील उमेदवारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. पक्षनेते युतीसाठी तयार असले तरी स्थानिक पातळीवर अनेक पदाधिकारी आणि इच्छुक स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता, यावरून उमेदवार निवडीतील गोंधळ स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी विलास गावडे यांचे नाव जाहीर केले असून काही नगरसेवक पदांसाठीही उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. मागील कौन्सिलमध्ये काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश डिचोलकर विरोधी पक्षनेते होते, तसेच काँग्रेसचे ५ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसची शहरात चांगली ताकद मानली जाते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर केले असून त्यांचा शहरात मोठा संपर्क आहे. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.
येथे सर्वाधिक संघटनशक्ती असलेल्या भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप (राजन) गिरप हे प्रमुख दावेदार मानले जात असले तरी पक्षातील माजी नगरसेवक सुहास गवंडळकर यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यातच भाजप युवा मोर्चाचे भूषण आंगचेकर यांनीही नगराध्यक्ष पदासाठी तिकीट मिळावे म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपचा अधिकृत उमेदवार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहराची लोकसंख्या १२,३९२ (२००१ च्या जनगणनेनुसार) असून, यंदा शहराची विभागणी १० प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे एकूण २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे मिळून २१ लोकप्रतिनिधी शहराचा कारभार सांभाळणार आहेत. या निवडणुकीत पुरुष मतदार ४,८७१ आणि स्त्री मतदार ५,२४४ असून, स्त्री मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा ३७३ ने अधिक आहे. नगराध्यक्षपदासाठी २०१६ मध्ये ८ उमेदवार मैदानात उतरले होते, तर नगरसेवक पदांसाठी ६९ उमेदवार रिंगणात होते. ९,०९८ पैकी ७,११२ मतदारांनी मतदान केला होता. त्यावेळी भाजपचे ६, काँग्रेसचे ७, राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक, तर दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपद भाजपच्या उमेदवाराने जिंकले होते.
चौकट
प्रभाग रचनेतील बदलांचा फटका
यावर्षीच्या प्रभाग रचनेत काही मतदारांची अदलाबदल झाल्याने मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काहींची नावे वर्षानुवर्षे असलेल्या वॉर्डातून हलवली गेल्याने ‘हक्काचे मत’ दुसऱ्या प्रभागात गेल्याची खंत व्यक्त केली जात आहे. संभाव्य उमेदवार आता मतदार यादी चाळून संबंधितांना ‘आपण आमचे मतदार आहात’ असे सांगत संपर्क साधत आहेत. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक ठरते, त्यामुळे या बदलांचा फटका कोणाला बसतो हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.