04538
सैनिक स्कूलमुळे शौर्य परंपरेला नवा आयाम
नीतेश राणे ः भोसले सैनिक स्कूलचे सावंतवाडीत उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याला शौर्याचा व संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिले सैनिक स्कूल म्हणजे जिल्ह्यासाठी अभिमानाची व गर्वाची बाब आहे. ‘भोसले सैनिक स्कूल’मुळे जिल्ह्याच्या शौर्य परंपरेला नवा आयाम प्राप्त होणार आहे. या स्कूलची जबाबदारी अच्युत सावंत-भोसले यांच्यासारख्या कर्तबगार व्यक्तीच्या हातात दिली, हे गौरवास्पद असल्याचे उद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी काढले.
यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचालित केंद्रीय संरक्षण मंत्रालय भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त कोकणातील पहिले सैनिक स्कूल ‘भोसले सैनिक स्कूल’चे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. माजी शालेय शिक्षणमंत्री, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता भोसले, सचिव संजीव देसाई, भोसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, अभाविपचे कोकण प्रांत संघटन मंत्री नीरज चौधरकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद अध्यक्ष मेजर विनय देगावकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘अलीकडेच मालवण किनारपट्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘नौदल दिन’ साजरा झाला. तो सोहळा जिल्ह्यासाठी भूषणावह ठरला होता. अच्युत भोसले यांचा प्रवास योग्य दिशेने होत आहे. भविष्यात या सैनिक स्कूलमधून जेव्हा अधिकारी घडतील, तेव्हा मला पालकमंत्री म्हणून नव्हे, तर जिल्ह्याचा नागरिक म्हणून अभिमान वाटेल. जिल्ह्यातील शहीद सैनिकांसाठी ही खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.’
श्री. केसरकर म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात व विशेष करून सावंतवाडी तालुक्यात सैनिक स्कूल होत असल्याचा सार्थ अभिमान आहे. ‘परफेक्शन’ ही अच्युत सावंत यांची खासियत आहे. हा उपक्रम ते यशस्वी करतील, याचा निश्चितच विश्वास आहे.’ प्रास्ताविकेत भोसले यांनी, सैनिक स्कूल उभारायची संकल्पना खूप जुनी होती. त्यासाठी सातत्याने तीन वर्षे प्रयत्न सुरू होते. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून या सैनिक स्कूलला मान्यता प्राप्त झाली, याचा अभिमान आहे, असे सांगितले. प्रा. अमर प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. रत्नेश सिन्हा यांनी भोसले सैनिक स्कूल संदर्भात सर्वंकष माहिती सादर केली.
......................
अभिनव संकल्पनांना नेहमीच सहकार्य
माझ्या जिल्ह्यात कोणीही अशी अभिमानास्पद गोष्ट करीत असेल तर पालकमंत्री या नात्याने तुमच्या पाठीशी राहणे, हे माझे कर्तव्य आहे. केवळ उद्घाटनाचा प्रमुख अतिथी म्हणून नाही तर या जिल्ह्याचा पालक म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अशा प्रकल्पांमध्ये वाट रोखणारे अनेक असतील; मात्र मागे हटू नका. लागेल ती ताकद तुमच्या मागे उभी करू. या पूर्ण वाटचालीत तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही मंत्री राणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.