बिग स्टोरी
rat16p2.jpg-
04663
लोटे एमआयडीसीतील कारखानदार रात्री हवेत घातक रसायन सोडतात.
rat16p3.jpg-
04664
कोतवलीमध्ये सोडलेल्या सांडपाण्याचे नमुने घेताना एमपीसीबीचे अधिकारी.
rat16p4.jpg-
04665
नाल्यातून येणारे केमिकलचे पाणी.
rat16p5.jpg-
04666
रसायन मिश्रीत पाण्यामुळे कोतवलीतील नदीला पांढऱ्या रंगाचा फेस येते आहे.
rat16p6.jpg-
O04667
सीईटीपीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतरच ते पाणी खाडीत सोडले जाते.
--------------------------------
इंट्रो
लोटे-परशुराम एमआयडीसीने खेड आणि चिपळूण तालुक्यातील नागरिकांना रोजगार दिला. एमआयडीसीमुळे लोटे परिसरातील गावे विस्तारली; परंतु एमआयडीसीतील कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनांमुळे या परिसरातील नद्या आणि सभोवतीचे आकाश काळवंडले, त्यांचा श्वास कोंडू लागलाय. प्रदुषणाचा मुद्दा केवळ नदीतील पाण्याशी, आजारांशी निगडित नाही तर जलचर आणि शेतजमिनीदेखील प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत लोटेतील जीवनदायी जलस्रोतांच्याच अस्तित्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. प्रदुषित पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प लोटेत उभारलेला असतानाही जलस्रोतांचे कंपन्यांकडून नुकसान केले जातेय हे धक्कायदायकच आहे. कारखान्यांना दिलेल्या नोटिसा, दंड हे केवळ दिखाऊ आहे कि काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नागरिकांमधूनही त्यांच्याविरोधात ओरड सुरू आहेच. या गोंधळात पर्यावरणप्रेमींच्या चळवळी थंडावलेल्या आहेत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा, असा येथील ग्रामस्थांचा प्रश्न आहे...!
- मुझफ्फर खान, चिपळूण
--------
हवा अन् जल प्रदुषणाने
काळवंडले लोटे
कारखान्यांकडून प्रक्रियाविनाच सांडपाणी; जलस्रोत, खाडी प्रदूषित
लोटे एमआयडीसीतून प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या घातक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीकिनारी वसलेल्या काही गावांतील जलस्रोत दूषित झाले आहेत; मात्र प्रत्यक्षात प्रदूषणकारी घटकांविरोधात सबळ पुरावे मिळत नाहीत. जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे ठोस कारवाई करणे अडचणीचे होते. प्रत्येक वर्षी पावसाच्या सुरवातीच्या आणि शेवटच्या हंगामात दाभोळ खाडीतील मासे मृत होतात. कारखान्यांमधील उत्पादनासाठी उद्योजकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही नियम आखवून दिले आहेत; मात्र लोटेतील कारखानदार अतिरिक्त उत्पादन घेताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेले नियम धाब्यावर बसवतात. सीईटीपीमध्ये कोणत्या कंपनीचे किती पाणी आले त्याचे मोजमाप करण्यासाठी मीटरची यंत्रणा बसवण्यात आली आहे. जेवढे सांडपाणी येते त्यानुसार संबंधित कंपनीकडून सीईटीपी कर घेते; मात्र अनेक कारखानदारांकडून पाण्याचा वापर वाढला आहे. त्यांनी उत्पादनासाठी लागणारे पाणी साठवण्यासाठी शेकडो लिटरच्या टाक्या बांधल्या आहेत. त्यांच्या कारखान्यांमधून उत्सर्जित पाण्याची क्षमताही वाढली आहे; मात्र हे घातक सांडपाणी सीईटीपीमध्ये सोडले जात नाही. ते कोणत्याही प्रक्रियेविना टँकरमध्ये भरून मध्यरात्रीच्या अंधारात नदीनाल्यात तसेच मोकळ्या जागेत सोडले जाते. अनेकवेळा कारखानदार पावसाच्या पाण्याचा गैरफायदा घेऊन रसायनमिश्रित पाणी नदीनाल्यात सोडतात. यावर्षी पावसाचा कालावधी वाढला. त्याचा गैरफायदा घेत लोटेतील कारखानदारांनी त्यांचे सांडपाणी कोतवलीच्या नाल्यात सोडून दिले. त्यामुळे कोतवली गावासह परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित झाले. दूषित पाणी सोडल्यानंतर पाण्याचा रंग बदलला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर कोतवली गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.
-----------------
सीईटीपीत प्रक्रिया झालेले पाणी खोल समुद्रात
एमआयडीसीकडून लोटेतील कारखानदारांना दिवसा पाच लाख लिटरहून अधिक पाणी पुरवले जाते. यातील 80 टक्के पाणी उत्पादनासाठी वापरले जाते नंतर हे पाणी सीईटीपीमध्ये सोडले जाते. पूर्वी हे पाणी थेट दाभोळ खाडीत सोडले जात होते. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता. राष्ट्रीत हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर काही वर्षांपूर्वी कारखानदारांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योजकांनी सांडपाणी उदंचन केंद्र (सीईटीपी) उभारले. त्यासाठी माजी मंत्री रामदास कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या केंद्राद्वारे बीओडी आणि सीओडी नियंत्रणात आणून हे सांडपाणी बंदिस्त वाहिनीद्वारे खोल खाडीत सोडले जाते. कारखानदारांचे सांडपाणी प्रथम सीईटीपी मध्ये आणले जाते. सीईटीपीत पाण्यावर प्रक्रिया करून हे सांडपाणी खोल समुद्रात सोडले जाते. सुरवातीला ४.५ एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प नंतर १० एमएलडी क्षमतेपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि त्याचे आधुनिकीकरणदेखील करण्यात आले आहे. सीईटीपीमध्ये प्राथमिक, विस्तारित वातन आणि तृतीयक प्रक्रियांचा समावेश आहे, जेणेकरून औद्योगिक सांडपाणी पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशा पद्धतीने शुद्ध केले जाते. शुद्धीकरणानंतरचे पाणी खोल समुद्रात वाहून नेणारी पाईपलाईन कुठेही फुटणार नाही किंवा चेंबरला गळती लागणार नाही, याची काळजी सीईटीपी आणि एमआयडीसीकडून घेतली जात आहे. सीईटीपीचा विस्तार झाल्यामुळे आता सीईटीपीत येणारे पाणी प्रक्रिया करूनच खाडीत सोडले जाते. त्यामुळे काही गावांमध्ये दुर्मिळ मासे पुन्हा मिळण्यास सुरवात झाली होती; मात्र अलिकडे कारखानदार थेट पाणी सोडत असल्यामुळे या परिरातील खाड्यांमध्ये मासे पुन्हा दुर्मिळ झाले आहेत.
-------------
वायू, जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्या मोकाट
लोटे एमआयडीसीमध्ये जवळपास ९० रासायनिक कारखाने कार्यरत आहेत. कारखानदारांमुळे हा परिसर विस्तारत असताना एमआयडीसीच्या परिसरात अनेक गृहप्रकल्प उभे राहिले. त्यांना रासायनिक प्रदुषणाच्या त्रासाची समस्याही अधिक जाणवत आहे तसेच अनेक रासायनिक कंपन्यांमध्ये उत्पादनावर प्रक्रिया करण्याचे निकष पाळण्यासाठी लागणारी महत्त्वाची यंत्रणाच कार्यान्वित नसल्याची बाब अनेकवेळा प्रदूषण मंडळाच्या निदर्शनास आली. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पायदळी तुडवत रासायनिक वायू सोडण्याचे प्रमाणही कित्येक पटींनी वाढले आहे. कोरोनानंतर काही कारखानदाराचे उत्पादन थांबले आहेत. ते आठवड्यातून काही दिवस उत्पादन घेतात आणि त्यातून तयार होणारे सांडपाणी मिळेल त्या जागेत सोडून देतात तर काही जमिनीत जिरवतात. प्रदूषण वाढल्याची तक्रार झाली तर कंपन्यांना एमपीसीबीकडून नोटिसा बजावल्या जातात, तात्पुरते कंपनीचे काम बंद केले जाते; मात्र कुठल्याही रासायनिक कंपनीवर ठोस कारवाई झाल्याचे आजतागायत निदर्शनास आलेले नाही. लोटेतील कारखानदारांचे घातक रसायन खेड व चिपळूण तालुक्यातील चिरेखाणीमध्ये पुरलेले आढळले. मुंबई - गोवा महामार्गालगत पाण्याच्या वाहत्या प्रवाहात रसायन आढळले; मात्र कुठल्याही रासायनिक कंपन्यांची कठोर चौकशी, त्याचा अहवाल तसेच कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही. वायू तसेच जलप्रदुषणाचा साठा टाकणाऱ्या कंपन्या अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे.
----------------
परिसर काळवंडला
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांतून सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे परिसरातील गावांमध्ये वायूप्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. कारखान्यातून चोरून सोडल्या जाणाऱ्या घातक नैसर्गिक रसायनांसह येथील जलस्रोत व खाड्याही पूर्णतः प्रदूषित झाल्या आहेत. प्रदूषण करणाऱ्या काही कारखान्यांवर कायमस्वरूबी बंदीची शिफारस राष्ट्रीय हरित लवादाने केली आहे त्याचे भय प्रदूषणकारी कारखान्यांना अजिबात नाही. या परिसरात दिवस असो किंवा रात्र, शुद्ध हवा कधीच मिळत नाही. कधी रस्त्यावर उडणारी धूळ तर रात्रीच्यावेळी हवेत पसरलेला रासायनिक वायू याचा त्रास नागरिकांना करावा लागतो. आता भरदिवसाही वायूप्रदूषण जाणवते. येथील अनेक कारखाना दिवसरात्र पांढऱ्या रंगाचे धूर ओकत असतात. प्रक्रिया करताना निघणारी रसायने व धुलीकण असलेला वायू संपूर्ण आकाश व्यापून टाकतो. रासायनिक कारखान्यातून रात्री मोठ्या प्रमाणात वायू जातो. कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषण होऊ नये यासाठी स्क्रबर सिस्टिमचा वापर गरजेचा असतो; परंतु ही प्रक्रिया खर्चिक असल्याने कारखान्यांकडून तिचा वापर केला जात नाही. यामुळे लोटे, कोतवली, असगिनी, घाणेखुंटसह १२ गावांतील रहिवाशांना रात्रीच्या वेळी वायूप्रदुषणाचा कमालीचा त्रास होतो. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. या कारखान्यांवरील कारवाईची मागणी मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. कंपन्यामधील बॉयलरमध्ये कोळसा तसेच लाकडाचा वापर केला जातो. मोठ्या कारखानदारांचे कोळशावर चालणारे वीजप्रकल्प आहेत. अनेक कंपन्यामधील चिमण्यांची उंची कमी असल्यामुळे कार्बन डायऑक्साइड वायू भूभागाच्या क्षेत्रात पसरतो. त्यामुळे वायूप्रदूषणात वाढ होत असून, प्रदुषणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. अनेक कारखान्यांतून रात्रीच्या वेळी विषारी वायू सोडले जातात. त्यामुळे महामार्गावरून रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, वाहनचालकांना हा त्रास सहन करूनच पुढे जावे लागते. थंडीच्या दिवसात तर हा त्रास अधिक जाणवतो.
---------
मासेमारी संकटात
औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत मासे मरण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. अनेक उद्योगांतील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जात असल्याने खाडीतील मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खाडीतील मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या ८६ गावातील शेकडो कुटुंबांवर मोठे संकट उभे राहिले आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कारखाने बंद-सुरू करण्याचा खेळ सुरूच आहे. एखाद्या कारखान्याला प्रदूषण केले म्हणून कारखाना बंद करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतर कारखान्याचे ७२ तासांनंतर वीज व पाणी बंद करून कारखाना बंद केला जातो; मात्र याच वेळेत कारखानदार कायद्याची पळवाट शोधून बँकेची हमी देऊन प्रादेशिक अधिकारी यांच्याकडून कारखाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश घेऊन येतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही नोटिसा बजावण्याचा कांगावा केला असला तरी लोटेमधील प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढतोच आहे.
----------
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
एकीकडे डोंगराचा एमआयडीसीचा भाग, त्याला लागून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि या मार्गाला लागून एमआयडीसी आहे. दुसऱ्या बाजूला खाडी परिसर आहे. एमआयडीसीतील सांडपाण्याचे नाले थेट खाडीला मिळत असल्याने खाडीतील पाण्यातही या कारखान्यांचे प्रदूषण पसरते. त्यामुळे खाडीतील मासे मरण पावल्याच्या घटना वरचेवर घडतात. या नाल्यांलगत राहाणाऱ्या नागरिकांना नेहमी दुर्गंधी, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, मळमळ असे त्रास होतात.
-------------
खेर्डी, खडपोलीतही तोच प्रकार
रसायनमिश्रित सांडपाणी नाल्यात सोडण्याचा प्रकार केवळ लोटेमध्येच होतो असे नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात कापसाळ येथील नाल्यात गाने खडपोली एमआयडीसीतील एका कंपनीचे सांडपाण्याने भरलेले टॅंकर खाली करताना ग्रामस्थांना आढळून आले होते. या कंपनीवर तात्पुरती कारवाई करण्यात आली. पंधरा दिवसात पुन्हा कंपनी सुरू झाली. खेर्डीतील काही कारखानदारांचे रसायनमिश्रित पाणीसुद्धा वाशिष्ठी नदीत सोडले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
----------------
प्रदूषणाचे परिणाम
लोटे, घाणेखुंट, असगणी आदी १२ गावांत प्रदूषण
८६ गावातील मासेमारी संकटात
शेकडो हेक्टर आंबा-काजूंना फळेच येत नाहीत
ग्रामस्थांचे गाव सोडून शहराकडे स्थलांतर
नद्या, नाले, ओढे दूषित,परिणामी जलप्रदूषण
नागरिकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा परिणाम
-----------------
दृष्टिक्षेपात...
लोटे परशुराम एमआयडीसी
क्षेत्रफळ : अंदाजे २७०० एकर
भूखंडांची संख्या : ४६० हून अधिक औद्योगिक भूखंड
चालू कारखाने : ८२
झिरो डिस्चार्ज असलेले कारखाने ः ८
सीईटीपीमध्ये प्रक्रियेसाठी येणारे पाणी ः ३.५ एमएलडी
रासायनिक औद्योगिक पार्क म्हणून ओळख
२५ हजार रोजगार देणारी सर्वात मोठी एमआयडीसी
------------------------
चौकट
खर्च वाचवण्यासाठी पाणी नदीत...!
एमआयडीसीकडून कारखानदारांना दिवसा ५ लाख लिटर पाणी पुरवले जाते. त्यातील २० टक्के पाणी गार्डन आणि पिण्यासह इतर कामासाठी वापरले जाते. उर्वरित पाण्याचा वापर उत्पादनासाठी होतो. सीईटीपीकडे १० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सहकारी तत्त्वावर सीईटीपी प्रकल्प चालवला जातो. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लहान कारखानदारांकडून हजार लिटर मागे 38 रुपये आणि मोठ्या कारखानदारांकडून 74 रुपये दर सीईटीपी आकारते. कोणत्या कारखान्याचे किती पाणी आले हे तपासण्यासाठी मीटर लावण्यात आले आहेत. सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी होणारा खर्च वाचवण्यासाठी कारखानदार सांडपाणी नदी नाल्यात चोरीने सोडतात.
-------
कोट १
रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभारला गेला आहे. कारखानदारांनी त्यात पाणी सोडले पाहिजे. चोरीने नदी-नाल्यात पाणी सोडणाऱ्या कारखानदारांची बाजू आम्ही घेणार नाही. उत्पादन घेत असताना प्रदूषण होणार नाही याची जबाबदारी कंपनीने घेतली पाहिजे.
- सतीश वाघ, अध्यक्ष, सीईटीपी
-----
कोट २
लोटे एमआयडीसीतून चोरीने सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी नाल्यातील मासे संपुष्टात आले आहेत. मासेमारीवर अवलंबून असलेले तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे शासनाने लोटे परिसरातील शेतकऱ्यांना अनुदान द्यावे.
- संदीप आंब्रे, सदस्य, कोतवली, ग्रामपंचायत
------
कोट ३
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम मोडणाऱ्या कारखानदारांवर आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत. नागरिकांच्या तक्रारी आल्यावर चौकशी करून महिन्यात ८ कारखानदारांवर कारवाई केली आहे.
- उत्कष शिंगारे, क्षेत्रीय अधिकारी, एमपीसीबी
-----
कोट ४
आम्ही कारखानदारीच्या विरोधात नाही. कारखानदारी जगली तर रोजगार निर्माण होणार आहे. परिसराचा विकास होणार आहे. पण स्थानिकांना त्रास देऊन कारखानदारांना जगवणे योग्य नाही. कारखानदारांनी नियमात राहून उत्पादन घेतले पाहिजे.
- प्रथमेश तांबे, नागरिक, कोतवली
-----
कोट ५
प्रदूषणामुळे लोटे परिसरात आजार वाढले आहेत. पशुधन कमी झाले आहे. नोकऱ्या आहेत पण मर्यादित आहे. प्रदूषण बाधित गावे सरकारने दत्तक घ्यायला हवीत. मोठ्या कारखानदारांनी आमच्या गावाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
- आदिल मिठागरी, लोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.