जायंट हर्नियाग्रस्त प्रौढावर रत्नागिरीत शस्त्रक्रिया
जिल्हा रूग्णालयाची कामगिरी ; अतिदुर्मिळ श्रेणीतील उपचार यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः वीस किलो वजनाच्या जायंट हर्नियाने (Giant Hernia) ग्रस्त प्रौढावर येथील रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अवघ्या एका तासात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अतिदुर्मिळ आणि अत्यंत जटिल अशी असून जिल्हा रूग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागाने वैद्यकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी अशी कामगिरी केली आहे.
चिपळूण येथील सुभाष विष्णू चव्हाण (वय ५८) यांच्यावर जायंट हर्निया या अतिदुर्मिळ आणि अत्यंत कठीण अवस्थेवरील शस्त्रक्रिया अवघ्या एका तासात पार पाडण्यात डॉक्टरांना यश आले. सुमारे २० किलोपर्यंत वाढलेल्या अंडाकोषातून रुग्णाला मुक्तता मिळवून दिली. गेल्या पाच वर्षांपासून रुग्णाच्या अंडाकोषाचा आकार सतत वाढत होता. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास जाणवत होता. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफी चाचणीत अंडाकोषात थेट मोठे आतडे व मूत्राशय सरकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. जांघेपासून अंडाकोषापर्यंत पसरलेल्या ‘जायंट हर्निया’चे निदान झाले. रुग्णाला नियंत्रणात नसलेला उच्च रक्तदाब असल्याने शस्त्रक्रियेला जीवघेणा धोका असल्याचे भूलतज्ज्ञांनी स्पष्ट केले. मोठे आतडे व मूत्राशय पोटात परत ढकलण्यासाठी आवश्यक जागा नसल्याने, ३१ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर रोजी ‘प्न्यूमोपरिटोनियम’ प्रक्रिया करून सीओटू गॅस भरून पोटातील जागा वाढवण्याचा अभिनव उपाय डॉक्टरांनी अवलंबला. ही तयारी नसल्यानंतर इतकी जटिल शस्त्रक्रिया करणे अशक्य होते; परंतु रत्नागिरीच्या शस्त्रक्रिया विभागाने ही जोखीम कुशलतेने स्विकारली. ७ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया विभागातील डॉ. जिज्ञासा भाटे (विभाग प्रमुख) व डॉ. मनोहर कदम (सहाय्यक प्राध्यापक) यांच्या नेतृत्वाखाली इंग्विनल मेशोप्लास्टी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली.
अतिदुर्मिळ श्रेणीतील या हर्नियाचे उपचार अतिशय छोट्या चिरांमधून, अवघ्या एका तासाच्या कार्यक्षमता व अचूकतेने पूर्ण करून विभागाने कौशल्याची कसोटी उत्तीर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसातच रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, त्यांचा त्रास पूर्णत: नाहीसा झाला आहे. अत्यंत मोठा झालेला अंडाकोष आता पुन्हा सामान्य स्थितीत आला आहे.
या शस्त्रक्रियेत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, तसेच भूलतज्ज्ञ डॉ. जमशेर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. अवघड परिस्थितीतही धैर्याने, नेमकेपणाने आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या जाणिवेने केलेली ही शस्त्रक्रिया रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय क्षमतेचा भक्कम पुरावा आहे, असे जिल्हा रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
चौकट
डॉ. कदम यांच्या मेहनतीचे यश
शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉ. मनोहर कदम यांची मेहनत आणि जिद्द महत्वाची ठरली आहे. उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य, विस्तृत अनुभव आणि नेमक्या निदान क्षमतेमुळे डॉ. कदम यांनी अनेक गुंतागुंतीच्या आणि अनेक जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यांचा शस्त्रक्रिया अनुभव व्यापक आहे.