राज्य नाट्य स्पर्धा---लोगो
पाच नाटकांतून ३३ हजार ८५० रुपयांचा महसूल
९ डिसेंबरपर्यंत १८ नाटकांचा समावेश ; नाट्यप्रेमींची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ः ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात सुरू आहे. शनिवारी -रविवार वगळून ही स्पर्धा ९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील १८ नाट्य संस्थांचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या पाच नाटकांमधून शासनाला तिकीटाच्या माध्यमातून ३३ हजार ८५० रुपयांचा महसूल मिळाला असून राज्य नाट्य स्पर्धेलाही रसिकांची गर्दीही पाहायला मिळत आहे.
गतवर्षी आठ नाटकांमधून ७० हजार १२५ रुपयांचा महसूल मिळाला होता. यावर्षी नाटकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामीण व शहरी भागातील स्पर्धेत १८ नाट्य संस्थांनी सहभाग नोंदवला होता. विविध विषयांच्या संहितांचे सादरीकरण रसिकांना पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या झालेल्या नाटकांमध्ये रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांसह तंत्रज्ञांचे स्वागत केले आहे.
राज्य नाट्य स्पर्धेत नाटकाच्या तिकीट विक्रीतून येणाऱ्या रक्कमेपैकी निम्मी रक्कम ही नाटक सादर करणाऱ्या संस्थेला दिली जाते. शासनाकडून नाटकाला प्रेक्षक लाभावा यासाठी केवळ १० आणि १५ अशा अत्यल्प दारातील तिकिटांची विक्री केली जाते. काही नाट्य संस्था तिकीटांचे अॅडव्हॉन्स बुकींगही करतात. रत्नागिरी केंद्रावर सादर झालेल्या पाच नाटकांमध्ये एका नाटकाला प्रेक्षकांची भरपूर गर्दी झाली.