पक्षी सप्ताहानिमित्त
‘जांभेकर’मध्ये जनजागृती
रत्नागिरी, ता. १७ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी यांच्या आयोजनाखाली पक्षी सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सामाजिक वनीकरण विभागाच्या काजल शुक्ल होत्या. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पक्ष्यांचा अधिवास, त्यांचा आकार, जीवनशैली आणि पर्यावरणातील पक्ष्यांचे महत्त्व या विषयांवर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या. राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख धनाजी वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. पक्षी संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला.