चिपळूण नगरपालिका---------लोगो
नेत्यांचे डावपेच अन् कार्यकर्त्यांची दमछाक
शिंदे शिवसेना-भाजप युती ; अजित पवारांची राष्ट्रवादी एकाकी
नागेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः नऊ वर्षानंतर होत असलेल्या चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष ताकदीनिशी सरसावलेले आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे शिवसेनेने नगराध्यक्षपदासह शहरातील सर्व २८ जागांवर उमेदवार देऊन चिपळूणच्या राजकीय आखाड्यात रंगत आणली आहे. यामधूनच नेत्यांमधील राजकीय डावपेचदेखील उघड होऊ लागले आहेत; मात्र या राजकीय खेळीत उमेदवारांची मोठी दमछाक आत्तापासूनच होत आहे.
जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या चिपळूणच्या राजकारणाकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे. या निवडणुकीची चाहूल लागताच माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनी दिलजमाई करून उमेदवारी व मतांची गणिते आधीच बांधली. त्यातून रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी काही जागांवर दावा केला तर आमदार जाधव यांनीही मैत्रीपूर्ण लढतीसाठी काही जागांसाठी समझोता केला. एकीकडे या दोन नेत्यांमधील मैत्री घट्ट होत असताना उद्धव सेनेतील काहींना ती पचनी पडली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाधव दौऱ्यावर जाताच उद्धव सेनेला पक्ष सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत शहरातील सर्व २८ जागांवर उमेदवार देण्याचा आदेश आला. अर्थात यामध्ये आमदार जाधव यांनी निश्चित केलेल्या जागांचा समावेश असला तरीही दुसरीकडे मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रमेश कदम यांच्याशी एकाअर्थी दगाफटका झाल्याचाच प्रकार घडला. अगदी अशीच काहीशी राजकीय परिस्थिती महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बाबतीत निर्माण झाली. शहरातील प्रभाग क्र. ९ मधील महिला शहराध्यक्षा आदिती देशपांडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. ऐनवेळी भाजपच्या यादीत अंजली कदम यांना तेथून उमेदवारी जाहीर झाली. याशिवाय अन्य एका प्रभागातही राष्ट्रवादीत अजित पवार गटाचा उमेदवार निश्चित झालेला असताना तिथे भाजपने उमेदवार रिंगणात उतरवत राष्ट्रवादीची कोंडी केली. या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या असून, त्या कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, अशी भूमिका आमदार शेखर निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर महायुतीची एकत्रितपणे बैठक अथवा चर्चा न करताच भाजप व शिंदेसेनेने परस्पर शहरातील सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती अडचणीत आली.
पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण व भाजपचे नेते प्रशांत यादव यांच्या युतीमुळे आमदार निकम हे एकाकी पडले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीसह महाविकास आघाडी टिकवण्याच्यादृष्टीने नेत्यामार्फत कोणती पावले उचलली जातात, याकडे उमेदवारांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे.
चौकट
काँग्रेसची साथ कोणाला?
गेल्या चार दिवसातील घडामोडीत काँग्रेस पक्ष पूर्णपणे अलिप्त राहिला आहे. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. यापूर्वी शहरात काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले होते. अजूनही शहरातील काही भागात काँग्रेस प्रभाव राहिला आहे; मात्र आता महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याने काँग्रेस उद्धव सेनेला की, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला साथ देणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.