कोकण

स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या मागण्यांकडे होतेय दुर्लक्ष

CD

वरिष्ठांच्या निर्णयाने भाजप कार्यकर्त्यांची कोंडी
कोकणात प्रभाव पडणार ; घटक पक्षांना सांभाळण्यावर भर, जागावाटपात असमतोल
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १८ ः महायुतीतील घटकपक्षांची नाराजी ओढवू नये आणि राज्य सरकार अस्थिर होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मागणीकडे प्रदेशस्तरावरून दुर्लक्ष केले जात आहे. याचा प्रत्यय नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमधील महायुतीच्या जागावाटपातून पुढे आलेले आहे. हेच चित्र आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही कोकणात दिसून येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाल्यावर भाजपने महायुतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, गुहागर, चिपळूण आणि देवरूख अशा चार ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष दिमाखात बसेल, अशी स्वप्ने भाजप कार्यकर्त्यांना पडू लागली. चिपळूणमध्ये भाजपच्या श्रीमती खेराडे थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. खेडमधील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केल्याने तेथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. देवरूखमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होता. गुहागर शहरात मागील निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष नसला तरीही त्या वेळी राष्ट्रवादीला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या शहरविकास आघाडीतही भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आत्ता समीकरणे बदलली असली तरीही भाजपने त्या पाच वर्षात गुहागरमध्ये सत्तेला गवसणी घालण्यासाठी भाजपला मजबूत केले होते. त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये महायुती झाली तर उत्तम अन्यथा स्वतंत्र लढून आपले अस्तित्व दाखवून देऊ, अशा मानसिकतेमध्ये भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी होते. खासदार नारायण राणेंचा अपवाद वगळता राज्यात आणि केंद्रात सत्ता असली तरीही जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही. याची खंत भाजप कार्यकर्त्यांना आहे. भाजपच्या नेत्यांनी महायुतीतील घटक पक्षांसोबत जुळवून घेण्याचा आदेशच दिला. महायुतीतील आमदारांचा निर्णय मानला पाहिजे, असा इशारा दिला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना बोलावून भाजप पदाधिकाऱ्यांची तोंडेच बंद केली. आमदार निरंजन डावखरे यांनी तर थेट अन्याय सहन करा, असे आवाहनच केले. प्रदेश भाजपने रत्नागिरी जिल्हा शिवसेनेला आंदण देऊन टाकला. त्यामुळे विजयासमीप जाणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे निवडणुकीपूर्वीच मानसिक खच्चीकरण झाले. निकाल लागल्यानंतर पराभवाची कारणे शोधण्यासाठी चिंतन बैठका होतील. त्या वेळी भाजपचे हेच शीर्षस्थ नेते महायुतीचा निर्णयच कसा योग्य होता, याचे बाळकडू द्यायलाही कमी करणार नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे भाजप त्यांचा हक्काचा मतदार मात्र गमावतो आहे, याचे भान राहिलेले नाही. हा मतदार आज केवळ केंद्रातील मोदी सरकारची कामगिरी आणि राष्ट्रीय समस्या व सुरक्षेसंदर्भात घेतले जाणारे ठोस निर्णय यामुळे भाजपसोबत आहे. राज्यातील राजकारणात भाजपकडूनच भाजपचा घेतला जाणारा बळी या मतदारांना नामंजूर आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपची दुरवस्था या मतदाराला सहन होत नाही.
---
चौकट
मंत्र्यांना खूष ठेवताना खच्चीकरण
भाजप, राष्ट्रवादी (अ. प.) आणि शिवसेना याच्या सरकारमध्ये सारे काही आलबेल आहे, असे नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष आहे. त्याचे प्रतिबिंब रायगड जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये उमटत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्येही पश्चिम महाराष्ट्रात संघर्ष आहे. भाजपचे दोन्ही मित्रपक्ष देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद अस्थिर ठेवण्यासाठी झगडत आहेत. अशावेळी दोघांना अंगावर घेण्यापेक्षा स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या मनाप्रमाणे वागून मुख्यमंत्रिपदासह सत्तेची खुर्ची स्थिर करण्याचा प्रयत्न प्रदेश भाजपकडून होत आहे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पालकमंत्री उदय सामंत यांना खूष ठेवण्याचे धोरण प्रदेश भाजप आखत असावे, असे भाजपच्या वर्तुळात चर्चिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT