कणकवलीत सर्व उमेदवारांचे अर्ज वैध
दोन्ही पक्षांचे आक्षेप फेटाळले; २१ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १७ ः कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या भाजप, शहरविकास आघाडीचा ‘क्रांतिकारी विचार पक्ष यांचे रिंगणात असलेल्या सर्वांचे उमेदवारी अर्ज आज वैध ठरले. दोन्ही पक्षांकडून घेण्यात आलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी फेटाळले. आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी कालावधीही देण्यात आला होता.
आज तब्बल चार तास नगराध्यक्षपदाच्या ६ आणि १७ प्रभागांतील नगरसेवकपदांसाठीच्या दाखल झालेल्या ५६ अर्जांची छाननी झाली. यातील नगराध्यक्षपदासाठी ४ आणि १७ नगरसेवकपदाचे ४९ अर्ज वैध ठरले. यासाठी दोन्ही पक्षांकडून वकिलांचा फौजफाटा उभा करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली असून, नामनिर्देशन पत्र २१ नोव्हेंबरपर्यंत मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे.
कणकवली नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया यंदा चांगलीच गाजू लागली आहे. सत्ताधारी भाजप स्वतंत्र लढत असून केवळ एक जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिली आहे. शहर विकास आघाडी म्हणून क्रांतिकारी विचार पक्षाच्या नोंदणीकृत मान्यतेवर शहर विकास आघाडीचे अर्थात ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येऊन शहरविकास आघाडी असे चित्र उभे केले आहे. त्यामुळे येथील लढत अधिकच चुरशीची होणार असून उमेदवारी अर्जांच्या छाननीतच हे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
आज येथे निवडणूक निर्णय अधिकारी देशपांडे यांच्यासमोर झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांच्यावर क्रांतिकारी पक्ष आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी सुरुवातीलाच आक्षेप घेतला. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत आपली हरकत घेतली. यावर देशपांडे यांनी नमूद केले की, उमेदवाराकडून उच्च न्यायालयामध्ये शिक्षेची आणि दंडाची स्थगिती करण्यात आली आहे. या मुद्द्यावर ही हरकरत फेटाळण्यात आली. त्यानंतर प्रभाग ३ मध्ये सुमित राणे या आघाडीच्या उमेदवाराचे शपथपत्र परिपूर्ण नसल्याची हरकर भाजपचे उमेदवार स्वप्नील राणे यांच्या वतीने घेण्यात आली. या हरकतीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन तासांचा अवधी दिला. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उमेदवाराकडून हरकतीची पूर्तता करण्यात आल्याने तो अर्ज वैध असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रभाग ५ मध्ये स्नेहा वाळके या आघाडीच्या उमेदवारावर भाजपच्या मेघा गांगण यांनी हरकत घेतली. ती हरकत फेटाळण्यात आली. तसेच प्रभाग १६ मधील आघाडीचे उमेश वाळके यांच्या विरोधात भाजपचे संजय कामतेकर यांनी अवैध बांधकामाबाबत हरकत घेतली. याबाबतही ठोस असे पुरावे सादर न झाल्याने हरकत फेटाळण्यात आली. प्रामुख्याने शपथपत्रातील त्रुटी, गुन्हेगारी प्रवृत्ती, अनधिकृत बांधकाम अशा विविध मुद्द्यांवरील हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या सूचनांचे पालन करून फेटाळून लावल्या. याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा होती; मात्र त्याचे खंडन निवडणूक निर्णय अधिकारी देशपांडे यांनी केले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असे ः भाजप-समीर नलावडे, आघाडी-संदेश पारकर, अपक्ष-गणेशप्रसाद पारकर, सौरभ पारकर. प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार-तेजस राणे (आघाडी), राजेश राणे (अपक्ष), राकेश राणे (भाजप). प्रभाग क्रमांक २-साक्षी आमडोसकर (आघाडी), प्रतीक्षा सावंत (भाजप), रोहिणी पिळणकर (अपक्ष). प्रभाग क्रमांक ३- संजय पवार (अपक्ष), शिवम राणे (अपक्ष), सुमित राणे (आघाडी), स्वप्नील राणे (भाजप). प्रभाग क्रमांक ४-श्रेया पारकर (आघाडी), जाई मुरकर (अपक्ष), माधवी मुरकर (भाजप). प्रभाग क्रमांक ५-मेघा गांगण (भाजप), स्नेहा वाळके (आघाडी). प्रभाग क्रमांक ६-स्नेहा अंधारी (भाजप), सुमेधा अंधारी (आघाडी). प्रभाग क्रमांक ७-साक्षी अंधारी (आघाडी), सुप्रिया नलावडे (भाजप), सोनल कसालकर (अपक्ष). प्रभाग क्रमांक ८-गौतम खुडकर (भाजप), किशोर कांबळे (अपक्ष), लुकेश कांबळे (आघाडी), विठ्ठल कासले (अपक्ष). प्रभाग क्रमांक ९-मेघा सावंत (भाजप), रीना जोगळे (आघाडी), मधुरा मालांडकर (अपक्ष). प्रभाग क्रमांक १०-आर्या राणे (भाजप), शीतल मांजरेकर (आघाडी). प्रभाग क्रमांक ११-मयुरी चव्हाण (भाजप), दीपिका जाधव (आघाडी). प्रभाग क्रमांक १२-मनस्वी ठाणेकर (भाजप), साक्षी नेरकर (अपक्ष), प्रांजली आरोलकर (आघाडी). प्रभाग क्रमांक १३-जयेश धुमाळे (आघाडी), गणेश हर्णे (भाजप), प्रभाग क्रमांक १४- सुरेंद्र कोदे (भाजप), राधाकृष्ण नार्वेकर (आघाडी). प्रभाग क्रमांक १५-संकेत नाईक (आघाडी), विश्वजित रासम (भाजप), प्राजक्ता आळवे (अपक्ष), सुप्रिया नाईक (अपक्ष). प्रभाग क्रमांक १६-संजय कामतेकर (भाजप), उमेश वाळके (आघाडी), हिरेन कामतेकर (अपक्ष), सोहम वाळके (अपक्ष). प्रभाग क्रमांक १७-अबिद नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), सुशांत नाईक (आघाडी), मयुरी नाईक (अपक्ष). याखेरीज ज्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते, अशा उमेदवारांचे सूचक एकच असल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात नगरसेवकपदासाठी अवैध अर्जामध्ये प्रभाग १ मधून सखाराम राणे (भाजप), प्रभाग २-प्रगती सावंत (भाजप), प्रभाग ३-विराज राणे (भाजप), प्रभाग ९-मिलन सावंत (भाजप), प्रभाग १२-पूजा ठाणेकर (भाजप), प्रभाग १३-कल्याण पारकर (भाजप) हे पर्यायी उमेदवार असल्याने अवैध ठरले, तर प्रभाग १० मधून ज्योती देऊलकर (भाजप) यांचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.