जिल्हा साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
२२ ला एकदिवसीय संमेलन; ग्रंथदिंडीत साकारणार साहित्यिकांचे चित्ररथ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन २२ नोव्हेंबरला चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरी येथे रंगणार आहे. हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
यानिमित्ताने विविध परिसंवाद, काव्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा जागर असणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस अध्यक्षपद भूषवणार असून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. यानिमित्ताने सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडी जे. के. फाईल्स ते नवनिर्माण कॉलेजपर्यंत काढण्यात येणार आहे. ग्रंथदिंडीमध्ये कवी केशवसुत, लोकमान्य टिळक, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, साने गुरुजी, स्वामी स्वरुपानंद, कुसुमताई अभ्यंकर, विं. दा. करंदीकर, गझलकार बढीउज्जमा खावर यांच्या कार्याला अभिवादन करणारे चित्ररथ साकारण्यात येणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी दिली.
संमेलनपूर्व कार्यक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या साहित्य संमेलनामध्ये युवकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. एकदिवसीय साहित्य समेलनाची सुरुवात ‘उषःकाल’ काव्य मैफलीने होणार आहे. ‘खल्वायन’ संस्थेच्या माध्यमातून ही मैफल सकाळी ६ वाजता रंगणार आहे. यानंतर रत्नागिरी शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी काढण्यात येईल.