rat19p15.jpg
रत्नागिरी ः शिकारीसाठी भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकवेळा बिबट्या विहिरीत पडतात.
-------
लोकवस्तीच्या उंबरठ्यावर बिबट्याची दहशत
सात वर्षात ४६ जणांवर हल्ला; चौघांचा मृत्यू, एक कोटीपर्यंत भरपाई वाटप
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ : जिल्ह्यातील मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढत चालला असल्याने अनेक गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. बिबट्या दिवसाही माणसावर हल्ला करत आहे. काही ठिकाणी तर बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर, तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांसह जखमींना आतापर्यंत १ कोटी ०९ लाख ४० हजार १६३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
बिबट्या विहिरीत पडणे, तारेच्या जाळ्यात अडकणे, मृत पिल्ले सापडणे आणि नागरी वस्तीत फिरताना दिसणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्त्यांच्या दिशेने जाणाऱ्या बिबट्यांच्या अपघाती मृत्यूच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत मृत पावणाऱ्या बिबट्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. काही दिवसापूर्वी तालुक्यातील कळंबट येथे रस्त्याने चालणाऱ्या दुचाकीस्वरावर बिबट्याने हल्ला केला होता. तत्पूर्वी मार्च २०२५ मध्ये स्व-संरक्षणार्थ बिबट्याला ठार करण्याची वेळ चिपळूण तालुक्यातील तोंडली गावात शेतकऱ्यावर आली होती. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील हा संघर्ष अधिक तीव्र होत आहे.
चौकट
भक्ष्याच्या शोधात बिबट्याचा नागरिवस्तीत वावर
समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावांमध्येही आता बिबट्याचे वास्तव्य दिसू लागले आहे. त्याच्यासाठी जंगलात रानडुक्कर, ससा व इतर प्राणी खाद्य म्हणून उपलब्ध आहे. परंतू बिबट्या आता दिवसाही मनुष्यवस्तीतील कुत्र्यांना लक्ष्य करू लागला आहे. गोठ्यातील पाळीव जनावरांवरही तो हल्ला चढवू लागला आहे. कारण हे भक्ष्य त्याला अगदी सहज मिळते आहे. जंगलांची बेसुमार तोड आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या विकासकामांमुळे वन्यप्राण्यांनी आपले हक्काचे अधिवास गमावले आहे.
--------
चौकट
३४ बिबट्यांचा मृत्यू, ३२ बिबट्यांची सुटका
रत्नागिरी जिल्ह्यात २०२२ ते २०२५ या कालावधीत ३४ बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद आहे. दुसरीकडे विविध घटनांमध्ये अडकलेल्या ३२ बिबट्यांची सुटका करण्याच्या मोहिमाही यशस्वी झाल्या आहेत. २०२२ मध्ये ३, २०२३ मध्ये १३, २०२४ मध्ये १४ तसेच २०२५ मध्ये १७ मृत बिबट्यांची नोंद झाली आहे. याचा अर्थ मृत बिबट्यांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. ती थांबलेली नाही. बिबट्यांची मृत्यूंची संख्या निश्चितच काळजीत टाकणारी असली तरी त्यापेक्षा काळजीची बाब म्हणजे मृत्यूची कारणे. निम्म्यापेक्षा अधिक मृत्यू हे नैसर्गिक नाहीत, ही चिंतेची गोष्ट आहे.
-----------
चौकट
फासकीचे प्रमाण कमी, विहिरीत पडण्याचे प्रमाण वाढते
रत्नागिरी जिल्ह्यात फासकीत अडकलेल्या तसेच विहिरीत पडलेल्या बिबट्यांची नोंद लक्षणीय आहे. त्याचबरोबर अज्ञात वाहनांच्या धडकेत, विहिरीत कोसळल्याने तसेच उपासमारीमुळे बिबट्यांचे मृत्यू वाढत चालले आहेत. मध्यंतरी फासकीत अडकून मृत्यूमुखी पडणाऱ्या बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर पोलिस आणि वनविभागाने फासकीविरोधात कडक धोरण अवलंबले. त्यामुळे त्यामध्ये घट दिसून येत असली तरी आता हळूहळू फासकी डोके वर काढत असल्याचे अधूनमधून घडत असलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. भक्ष्याचा पाठलाग करत असताना बरेच बिबटे उघड्या विहिरींमध्ये पडतात. बिबट्यांचा वावर असलेल्या गावांची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही. जंगल क्षेत्र असलेल्या गावांमध्ये बिबट्या अधिक प्रमाणात असतो.
------------
चौकट
बिबट्याचे पांढरे पिल्लू
रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावात प्रथमच महाराष्ट्रात बिबट्याचे दुर्मिळ पांढरे पिल्लू (अल्बिनो किंवा ल्युसिस्टिक) आढळून आले. ही वन्यजीव अभ्यासकांसाठी एक महत्त्वाची घटना होती.
-----------
चौकट
बिबट्याला पकडण्याच्या साहित्यासाठी निधी
मानवी वस्तीमध्ये आढळणाऱ्या बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाला जिल्हा नियोजन मंडळातून अधिकचा निधी देण्यात आला आहे. त्यातून पिंजरे, कॅमेरा ट्रॅप, वाहने आणि ड्रोन पुरवण्यात आले आहे.
----------
कोट
बिबट्याचा वावर असलेल्या भागात एआय-आधारित अलर्ट प्रणाली बसवण्याची योजना आहे, जेणेकरून बिबट्या गावात शिरल्यास पूर्वसूचना मिळेल. बट्यांचे स्थलांतर आणि नस बंदी यांसारख्या दीर्घकालीन उपायांवरही विचार सुरू आहे.
- सर्वर खान, परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण