चिपळुणात ३० ला
हाफ मॅरेथॉन स्पर्धा
चिपळूणः संघर्ष क्रीडा मंडळातर्फे रविवारी (ता. ३०) हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमधून या स्पर्धेसाठी २१ किलोमीटर आणि दहा किलोमीटर साठी सुमारे २५० स्पर्धकांनी आपली नोंदणी केली आहे. तसेच शालेय गटात पाच किलोमीटर साठी सुमारे बाराशे स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी एअर मार्शल हेमंत भागवत, प्रसाद देवस्थळी रत्नागिरी, संध्या दाभोळकर यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक केली आहे. स्पर्धेला कॅप्टन म्हणून डॉक्टर मनीषा वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धेत वयांचे पाच ग्रुप करण्यात आल्या असून पुरुष व महिला या विभागात येतात. २१ किलोमीटरसाठी पुरुष व महिला गटात ओपन गट, ३१ ते ४० वय, ४१ ते ५० वय, ५१ ते ६० वय, आणि साठ वर्षावरील असे गट आहेत. तसेच १० किलोमीटर व ५ किलोमीटरसाठी हीच वयोमर्यादा आहे. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी शालेय गट ठेवण्यात आला आहे.
-----
सुगम गायन स्पर्धेत
सुरेश तांबे प्रथम
चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने यावर्षी प्रथमच शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत कमी कालावधीत व अल्प नियोजनात या स्पर्धा होत असल्या तरी शिक्षकांसाठी याचे आयोजन करण्यात आले असल्याने याचा आनंद शिक्षकांमध्ये दिसत होता. शिक्षकांच्या सर्वगुणांना स्पर्श करणा-या अशा एकूण ४५ स्पर्धा घेतल्या जात आहेत. अशा स्पर्धेपैकी खेड तालुक्यातील शिक्षकांसाठीच्या तालुकास्तरीय सुगम गायन स्पर्धेत १८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुसाड शाळेचे मुख्याध्यापक सुरेश तांबे यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले. प्रथम क्रमांक प्राप्त गायक सुरेश तांबे यांचे खेडचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, शिक्षण विस्तार अधिकारी विद्या गुजर, केंद्रप्रमुख आदींनी अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
----------
जिजाऊ ब्रिगेडतर्फे
आश्रमशाळेस किट
चिपळूण ः बालदिनानिमित्त चिपळूण येथील भारतीय समाज सेवा केंद्र या आश्रमशाळेत चिपळूण शहर जिजाऊ ब्रिगेडतर्फे ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना उपयुक्त वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. आश्रमात प्रवेश करताच येथील स्वच्छता, सुंदर नियोजनबद्ध व्यवस्था आणि तिथे कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे जबाबदारीने काम करताना दिसणारे वातावरण पाहून जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना समाधान मिळाले. आश्रमातील सौ. हर्षदा विरकर, नंदिनी पालकर आणि सौ. समिक्षा उतेकर यांनी संस्थेबाबत माहिती दिली. सध्या संस्थेमार्फत ४१७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जात आहे. जिजाऊ ब्रिगेडतर्फे आणलेल्या किटचे वाटप आश्रमातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाला आश्रमातील राजकुमार सासपाडे, सतीश कांबळे, रंजित शिंदे, हर्षदा विरकर, समिक्षा उतेकर आणि नंदिनी पालकर, जिजाऊ ब्रिगेडतर्फे रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा सौ. स्नेहल चव्हाण, चिपळूण उपशहराध्यक्षा अपूर्वा गायकवाड आणि चिपळूण शहराध्यक्षा वर्षा खटके-पाटील उपस्थित होते.