rat19p10.jpg
05379
रत्नागिरी : व्याख्यान देताना मधुमेहतज्ज्ञ आशिष डॉ. सरवटे.
----------
नियमित व्यायाम, तपासणीने मधुमेह नियंत्रित करा
मधुमेहतज्ज्ञ डॉ. सरवटे ; जागतिक मधुमेह दिनानिमित्त व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : मधुमेहामुळे जगभरात सध्या दर अर्ध्या मिनिटाला एका व्यक्तीचा पाय मधुमेहामुळे कापावा लागतो. हे टाळण्यासाठी रुग्णांनी वर्षातून एकदा सर्व तपासण्या करून घ्याव्या. आवश्यकतेनुसार आणि वैद्यकीय सल्ल्याने इन्सुलिनसह योग्य औषधोपचार, वय, वजन, उंची यांच्या अनुषंगाने योग्य, वैविध्यपूर्ण आहार, सॅलड्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश आणि नियमित व्यायाम करावा, नियमित तपासणी, उपचाराने ८० टक्के जणांचे पाय वाचवणे शक्य आहे, असे प्रतिपादन मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांनी केले.
जागतिक मधुमेहदिनाच्या निमित्ताने मधुमेहींनी घ्यायची पायाची काळजी यावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी निष्कर्ष डायग्नॉस्टिक सेंटरचे डॉ. नीलेश नाफडे, डॉ. निनाद नाफडे उपस्थित होते.
डॉ. सरवटे यांनी सांगितले की, १९२१ मध्ये चार्ल्स बेस्ट आणि फ्रेड्रिक बँटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला. डॉ. बँटिंग यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. मात्र तीन हजार वर्षांपूर्वी भारतात महान आयुर्वेदाचार्य चरक आणि सुश्रुत यांनी मधुमेहाचा शोध लावला होता. मधुमेहाची राजधानी म्हणून भारताची ओळख झाली आहे, याची खंत वाटते. मधुमेह (डायबेटीस) हा स्वादुपिंडाचा असा विकार आहे, की ज्यामुळे शरीराच्या सर्वच अवयवांवर विपरित परिणाम होतो; मात्र पायांच्या नसांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पाय कापण्यासारखी वेळ येते.
चौकट
हे करा
मधुमेही व्यक्तींनी आपल्या पायांची विशेष काळजी घ्यावी. दररोज रात्री झोपताना आपल्या पायांचे तळवे तपासावेत. त्यांना तेल लावावे, जेणेकरून त्यांचा मऊपणा कायम राहील. अनवाणी चालू नये. घराबाहेर पडताना नेहमी पायात बंदिस्त सँडल किंवा शूज घालावेत आणि ते योग्य मापाचे असावेत. पायाची सर्व बोटे त्यात व्यवस्थित राहत आहेत याची खात्री करावी. आवश्यकता भासल्यास आपल्या मापाच्या चपला तयार करून घ्याव्यात किंवा डायबेटिक फूटवेअर वापरावेत. पायाला किरकोळ जखम झाली, तरी दुर्लक्ष करू नये. नखे वेळेवर आणि सरळ कापावीत, असा सल्ला डॉ. सरवटे यांनी दिला.