rat21p5.jpg
05788
जयंत फडके
बोल बळीराजाचे...लोगो
इंट्रो
खाड्या-नद्यांत जसा हा गाळ, माती तशीच समुद्रात किती माती जात्येय याचं खरंच संशोधन व्हायला हवं..कोकण रेल्वे आणि एकामागोमाग एक होत जात असलेले महामार्ग, मुंबई-गोवा, सागरी, ग्रीन, कॉरिडॉर कोकणच्या निसर्गाचा चिखल करतायंत..हा चिखलच कशी माझ्या बळीराजाची स्वप्नं खाडीच्या गाळात नेतोय, हे आपल्या मायबाप राज्यकर्त्यांना का दिसत नाही? ओहोटीला आता होड्या समुद्रात जाऊ शकत नाहीत इतक्या खाड्या गाळाने भरल्यात. नदीनाले, पर्ये माती-रेव्यांनी ओसंडून वहातायत.. ‘‘इथपर्यंत गलबतं येत होती,’’ असं सांगणारे आजोबा काही पांडवकालीन नाहीत. प्रचंड गतीनं आपण मातीची वाट लावतोय..!
- जयंत फडके.
जांभूळआड, पूर्णगड, रत्नागिरी
----------------
विकासाच्या पॅटर्नने वेगाने मातीची वाट लागतेय
यंदा न भुतो..अशा पावसानं काही विषय नव्याने प्राधान्याने पुढे आले. गेली काही वर्षे पावसाचा कोकण पॅटर्न बदलताना दिसतोय. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्याचं चक्र बदलत निघालंय. यावर्षी तर पावसाळा साडेपाच महिने होता, आता हिवाळ्यातले महिने कमी होतायंत की, उन्हाळ्यातले हेही समोर येईल; पण बदलत्या या निसर्गचक्रात माझा बळीराजा भरडला जातोय. काही वर्षापूर्वी कोकणात धो-धो कोसळधार तर घाटमाथ्यावर पिरपिरा पाऊस असायचा. इथे आठ-दहा दिवस पाऊस अविश्रांत कोसळायचा; पण त्याची चिरचिरी रड नव्हती. आताशा दोन-तीन तासात ढगफुटीसारखा कोसळतो आणि पुढे चार दिवस तोंड घेऊन नाहीसा होतो कुठेसा.. परत येतो मग सूड उगवल्यासारखा कोसळायला..! यातून नवे प्रश्न तयार होतायतं.. कोसळतोय म्हणून पावसावर विसंबून रोपं, दाढं काढावी तर चिखलवणीला पाणी मिळेल की, नाही ही चिंता.. पंप, पाट अशा व्यवस्था करून चिखलवावं तर लावणीला मळीत पाणी मावत नाही इतका कोसळत राहणार.. सगळंच बेभरवशी..! वृक्षतोडीनं पाऊस कमी नाही झाला; पण कमालीचा अनियमित झाला. ज्यामुळं ज्याच्याकडे पाण्याची पाऊस सोडून व्यवस्था त्याचीच शेती..धर पाण्यावरची शेती म्हणजे अळवावरचं पाणी..पोटरीवर येईपर्यंत चांदीपेक्षा जास्त चकाकेल हे खरं; पण आकडीवर येताना हा तोंड फोडील आणि कधी ती चांदी मातीमोल करील, याचा भरोसा नाही..
चार-पाच पिढ्या ज्या हर्ल्या-वहाळात पाणी पावसाळाभर मावत होतं ते हर्ले आता तासाभराच्या सरीत ओसंडून वाहतात..पर्ये तर हौरात आगरा कुर्याठात, मळ्यात शिरून पुरती वाट लावतात.. विकासाच्या खुळ्या कल्पनांनी यंत्राचा अक्षम्य वापर वाढवून आपण वाट लावल्येय. जी माझ्या बळीराजाची मुख्य ठेव "माती" तीच या बदलत्या पॅटर्नने पाण्याबरोबर हर्ले-वहाळ-पऱ्यातून नदीनाल्यातून खाडीची भर करत्येय.. शेकडो टन माती दरवर्षी अशी वाहून जात्येय आणि नवे प्रश्न तयार होतायंत.. ग्लोबल वॉर्मिंगनं म्हणे मोठ्या प्रमाणात बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढत्येय..उद्या मुंबईसारखी शहरेही पाण्याखाली जाऊ शकतात.
खाड्या-नद्यात जसा हा गाळ-माती तशीच समुद्रात किती माती जात्येय याचं खरंच संशोधन व्हायला हवं..कोकण रेल्वे आणि एकामागोमाग एक होत जात असलेले महामार्ग, मुंबई-गोवा, सागरी, ग्रीन, कॉरिडॉर कोकणच्या निसर्गाचा चिखल करतायंत..हा चिखलच कशी माझ्या बळीराजाची स्वप्नं खाडीच्या गाळात नेतोय हे आपल्या मायबाप राज्यकर्त्यांना का दिसत नाही? ओहोटीला आता होड्या समुद्रात जाऊ शकत नाहीत इतक्या खाड्या गाळाने भरल्यात. नदी, नाले, पर्ये माती-रेव्यांनी ओसंडून वहातायत.. ‘‘इथपर्यंत गलबतं येत होती" असं सांगणारे आजोबा काही पांडवकालीन नाहीत. प्रचंड गतीनं आपण मातीची वाट लावतोय..!
सरकारनं तर जलसंधारणासारखं मृदसंधारण आवश्यक असताना ती खाती अगदी खातीपिती असताना बंद करून टाकल्येत! अजून क्रूर चेष्टा म्हणजे नद्यातला गाळ काढायची कामं..नाम फाउंडेशन आणि शासकीय पातळीवर होणारी कामं जरूर प्रामाणिक प्रयत्न असतील; पण तो काढलेला गाळ नदीच्या कडेवरच पडत असेल तर तो दोन-चार कोसळधारात परत जाग्यावरच येतोय त्याचं काय? पाणी अडवा-जिरवाच्या नादात पक्की बिनखिडक्यांची धरणं, पर्ये, नद्या मातीनं भरतायंत हे कोण बघणार? ही ठेकेदार कल्याण योजना पाणी, माती कुठे काय अडवत्येय-जिरवत्येय आणि उपसत्येय हे ज्याचं त्यालाच माहीत..!
हा गाळ टाकायला उघडाबोडका कातळ आणि चिरा काढून नेलेल्या खाणी का नाही दिसत..? की प्रश्न पिढीजात तसेच राह्यले पाहिजेत हीच शासकीय नियोजनाची इतिकर्तव्यता..? या गाळातच उद्याच्या बागा, कमी जाडीच्या मातीची पिकं, अगदी गुरांचा चारा...अगदी टोकाचं म्हणजे मृदसंधारण..काही काहीच नाही का दिसत ? कोट्यांचे आकडे तोंडावर मारून प्रश्न सुटण्याऐवजी जटील बनत असतील तर हे कसले विकासाचे व्हीजन ?
माझा बळीराजा ही गाळाबरोबर वाहात जाणारी स्वप्नं उघड्या डोळ्यांनी पाहातोय. रेल्वे-हायवे कोकणातून माझ्या बळीराजाला शहरात लवकर नेण्यासाठी आहेत की, माझं कोकण जपून इथेच "सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्" करण्याचं स्वातंत्र्य देतायत, हेच कळेनासं झालंय..हा विकास नक्की कोणाचा, कोण आणि का करतोय..? अगदी या प्रश्नांचा गाळ मनामनात साठतोय..कधीतरी हे विकासाचं पाणीपात्र सोडून गावा -शहरात घुसणार हे नक्की !!
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.