rat26p11.jpg-
06750
धनंजय चितळे
लोगो..............संतांचे संगती (पसायदान)
इंट्रो
संतांची मैत्री आहे. आपण अन्य माणसांबरोबर जी मैत्री करतो ती व्यावहारिक असते. त्यामुळे स्वार्थ पूर्ण झाला की, मैत्री विसरली जाते; पण परमार्थिक मैत्री ही अखेरपर्यंत टिकते. ”बुडते हे जन देखवेना। डोळा येतसे कळवळा म्हणूनिया।“ या उक्तीप्रमाणे सर्वांशी मैत्रभाव जपणारे संत आपल्याकडूनही असेच आचरण व्हावे, अशी भावना व्यक्त करतात.
- धनंजय चितळे
----
पर्यावरणाबरोबर मैत्री करा!
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।
भुतां परस्परे जडो। मैत्र जिवांचे।।
श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या प्रारंभी तोषोनि मज द्यावे पसायदान हे । असं जरी म्हटले असले तरी त्यातील एकही मागणी त्यांनी स्वतःसाठी केलेली नाही. सर्व मागण्या या विश्वाच्या कल्याणासाठीच आहेत. कारण, श्रीमाऊली म्हणतात त्याप्रमाणे श्री माऊलींसारख्या परब्रह्माच्या सगुण अवताराची स्थिती
हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर। आपण जाहला।। अशीच असते. म्हणजेच ते सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वतःलाच पाहतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील पैठणचा प्रसंग आठवला तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. त्या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा आणि मी एकच आहे, हे कृतीने सिद्ध केले होते. अशा परिस्थितीमुळेच त्यांचे मागणे हे वैयक्तीक न राहता सामुदायिक, विश्वकल्याणाचे होते आणि म्हणूनच पसायदान हे प्रत्येक वाचकाला एका वेगळ्या अलौकिक पातळीवरती घेऊन जाते. दुष्टांचा दुष्टावा गेला, त्याला चांगल्या कामाची आवड वाटू लागली एवढ्यावर पसायदान थांबत नाही तर त्या जीवाची सर्व प्राणीमात्रांबरोबर मैत्री व्हावी, अशीच प्रार्थना ते करतात. मित्रता हे असे एक निरपेक्ष नाते आहे की, ज्यात अनेक रहस्ये एकमेकांना सांगितली जातात. मित्रासाठी निःस्वार्थ भावाने कष्ट केले जातात. हेच आपण सर्व चराचर सृष्टीबाबतीत करावे, असे मागणे पसायदान मागते. समर्थ श्री रामदास स्वामींनी दासबोधामध्ये एक सुंदर ओवी लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, जर आपणच आपल्याला चिमटा काढला तरी आपल्याला दुखते, आपला जीव कळवळतो. मग आपण दुसऱ्याला चिमटा काढला तर त्याचे काय होईल, याची जाणीव नेहमी ठेवावी.
आपणास चिमोटा काढीला। तेणे कासावीस झाला। आपल्यावरून दुसऱ्याला। राखीत जावे।। मित्रत्वामध्ये दुसऱ्याच्या हिताला अधिक प्राधान्य असते आणि त्यासाठी स्वतःला त्रास झाला तरी कष्ट करणे हे मित्राचे कर्तव्य असते. आपणही केवळ मानव समाजासाठी नाही तर, निसर्गासाठी हा नियम लक्षात ठेवायला हवा. आपल्या सुखासाठी म्हणून प्राण्यांचा, पर्यावरणाचा बळी देणे म्हणजे निसर्गाची मैत्री नाही तर स्वतःला होणारा त्रास सहन करूनसुद्धा पर्यावरणाचं जतन करणे, हीच खरी मैत्री होय. आज हेच भान विसरल्यामुळे संपूर्ण मानवसमाज एका अवघड वळणावर येऊन उभा आहे. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. पूर, भूकंप, ज्वालामुखी यांचेही प्रमाण वाढत आहे.
गेल्या काही वर्षातील आपल्या कोकणचा अनुभव पाहिला तरी आपल्याकडील पावसाचे प्रमाण आणि पावसाळ्याचा कालावधी हे बदलल्याचे आपल्या लक्षात येईल. मुंबई-गोवा महामार्गाच्या निर्माणामध्ये किती झाडे तुटली, किती लावली, किती ठिकाणी डोंगरांचे उत्खनन झाले याचाही गांभीर्याने विचार करायला हवा..बरोबर ना0 या पर्यावरणीय ऱ्हासाला माणूसच जबाबदार आहे ना0 म्हणून थोड्याच दिवसात नवीन वर्षात प्रवेश करताना समाजात पर्यावरण रक्षणाबद्दलची जागृती कशी निर्माण होईल, याचा विचार करावयास हवा. केवळ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे म्हणून भागणार नाही तर तशी कृती आपल्याला करावीच लागेल. पसायदानाच्या चिंतनातून पर्यावरणाची मैत्री एवढा जरी भाग आचरणात आला तरी खूप काही साध्य होईल.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.