rat2p23.jpg
07988
गुहागर ः नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक एकमध्ये एकमेकांसमोर उभे असलेले दोन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार एकाच बूथवर गप्पा मारत होते. बऱ्याच वर्षांनी असे संवादपूर्ण, सौहार्दपूर्ण राजकीय संस्कृतीचे दर्शन झाले.
-------------
गुहागरची निवडणूक सौहार्दपूर्ण वातावरणात
आरोप-प्रत्यारोपाला फाटा; बॅनरबाजीही नाही
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २ ः नगरपंचायतीच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. ही संपूर्ण मतदान प्रक्रिया राजकारणाशिवाय झाली. आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीदेखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे एकमेकांविरोधात उभे असलेले उमेदवार व कार्यकर्ते बूथवर एकत्र गप्पागोष्टी करताना दिसत होते. अनेक वर्षानंतर आज प्रथमच गुहागर शहराच्या निवडणुकीत सौहार्दपूर्ण राजकीय संस्कृतीचे दर्शन घडलं, याचं मतदारांनीही स्वागत केलं आहे
नगरपंचायतीच्या निवडणुका असोत किंवा गुहागर तालुक्यातील अन्य निवडणुका म्हणजे राजकीय टीका व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांविरोधात मन तुटण्याइतकी कटूता असेच चित्र काही वर्षात तयार झाले होते. यामधून गावागावात ही राजकीय गटांमध्ये मतभेदांबरोबरच मनभेदही झाले होते, हे सगळ्यांच्याच लक्षात येत होते; पण हे बदलणार कोण आणि कसं? असा एक प्रश्न सगळ्यांसमोर होता. किंबहुना कोणत्याही राजकीय पक्षांनी हे वातावरण बदलण्यासाठी कधी प्रयत्नही केले नव्हते; मात्र आज झालेल्या गुहागर नगरपंचायतीच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कुठेही अशा प्रकारचे मतभेद, राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत टीका दिसून आली नाही. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराचा प्रचार जोमाने करत होता. प्रचारादरम्यानही अनेक वेळेला विरोधी पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत होते; मात्र त्यामध्येही कुठेही दुरावा नव्हता, ही राजकीय प्रगल्भता अचानक कुठून आली, असाही प्रश्न सर्वांना पडला आहे.
गुहागरमध्ये प्रचारासाठी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव असे तीन नेते येऊन गेले. पैकी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या जाहीर सभेत त्यांच्यासह इतर कोणत्याही वक्त्याने दुसऱ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर कोणतीही टीका केली नाही. उदय सामंत त्यांच्या सभेनंतर काही कार्यकर्त्यांनी सभा फारच मुळमुळीत झाली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काहीजणांना प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप झालेच पाहिजेत, असेही वाटत होते; मात्र, असं काहीच घडलं नाही. आमदार भास्कर जाधव यांनी प्रचारामध्ये आक्रमक भाषण केले. काही मुद्दे खोडून काढले नाहीत; मात्र राजकीय नेत्यांवर टीका टाळली. खरंतर, गेल्या दोन निवडणुकांमध्ये आमदार जाधव यांनी प्रत्येक प्रभागात सभा घेतल्या होत्या; मात्र त्यांनी प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांजवळ व्यक्तीगत संवाद साधण्यावरच भर दिला होता.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर यापेक्षाही वेगळे वातावरण होते. मतदान केंद्राच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले वेगवेगळ्या पक्षांचे बूथवर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन हास्यविनोद करत होते. एखाद्या पक्षाच्या हक्काच्या उमेदवाराला दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराच्या व्यवस्थेतून मतदान केंद्रावर आणले म्हणून वादावादी होत नव्हती. काही ठिकाणी तर मतदार बाहेर काढण्यासाठी सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते एकत्र फिरत होते. गुहागर प्रभाग क्र. एकमधील बूथवर एकमेकांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह गप्पा मारत होते. स्थानिक पदाधिकारी या सगळ्यांकडून छान वातावरणाची निर्मिती झाली आणि म्हणूनच नगरपंचायतीची ही निवडणूक सौहार्दपूर्ण राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवून गेली.
चौकट
अनेक वादाचे मुद्दे
संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करण्याचे टाळले. वास्तविक किनाऱ्यावरून उठवलेली दुकाने असतील, गुहागर-विजापूर महामार्गाच्या कामासाठी दिवाळीनंतर लगेचच उठवण्यात आलेली दुकाने असतील, गुहागरची पाणीयोजना असेल, गुहागरचा विकास आराखडा असेल, सीआरझेडचा मुद्दा असेल हे सगळ्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी घडू शकल्या असत्या विकास आम्हीच केला आणि विकास झालाच नाही, हे मुद्दे वापरले गेले असते; मात्र स्थानिक पदाधिकारी असो, राजकीय नेतृत्वाने कुठेही वादाचे मुद्दे उपस्थित केले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.