rat2p15.jpg-
07980
रत्नागिरी : मारूती मंदिर येथील दामले विद्यालय मतदान केंद्रावर मतदानासाठी लागलेली रांग.
rat2p22.jpg-
07987
रत्नागिरी : ९२व्या वर्षी मतदान करणाऱ्या प्रमिला वैद्य यांच्यासोबत सूनबाई राधिका वैद्य.
रत्नागिरीत सकाळी निरूत्साह, दुपारनंतर गर्दी
मतदान यंत्रणेतील बिघाडामुळे विलंब : ज्येष्ठांनी केले उत्साहाने मतदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेली मतदान प्रक्रिया अतिशय धीम्यागतीने झाली. सकाळी थंडी व नंतर मळभी वातावरणामुळे मतदारांमध्ये निरूत्साह दिसत होता. काही अपवादात्मक मतदान केंद्रांवरील गर्दी सोडली तर अनेक केंद्रावर गर्दी दिसत नव्हती. मतदान केंद्राच्या बाहेर महायुती व महाविकास आघाडीच्या बूथवर प्रतिनिधी, कार्यकर्ते दिसत होते; परंतु मतदारांची गर्दी दिसत नव्हती. त्यात कोकणनगर, दामले हायस्कूल, पेठकिल्ला आदी ठिकाणी मतदान यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने काहीचा गोंधळ आणि विलंब होत होता. निवडणूक विभागाने तत्काळ दखल घेऊन दुरूस्ती केल्याने प्रक्रिया सुरळीत झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले होते.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल व निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. अनेक केंद्रामध्ये मतदान केल्यानंतर मतदारांसाठी सेल्फी पॉईंट ठेवला होता. त्याचा लाभ मतदारांनी घेतला व काही ठिकाणी स्वाक्षरीसाठी फलक ठेवण्यात आला होता. प्रभाग ३ मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे धीम्या गतीने मतदान सुरू होते. सकाळी कामाला व व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडणारे मतदार स्वतःहून मतदानाला बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळाले.
रत्नागिरीच्या १६ प्रभागांसाठी व ३० नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी आज मतदान सुरू होते. फक्त प्रभाग क्र. १० मधील दोन नगरसेवकपदांसाठी २० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. रत्नागिरी नगरपालिकेसाठी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत १०.५ टक्के मतदान झाले. ११.३० पर्यंत २१.९३ टक्के व दुपारी १.३० वाजेपर्यंत ३४.२५ टक्के मतदान झाले. एकूण २२ हजार १७३ मतदारांनी मतदान केले आहे.
जिल्ह्यातील पालिकांचा विचार करता रत्नागिरीत सर्वाधिक कमी मतदान झाल्याचे दिसून आले. लग्नसराई व नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील खड्डे, गटारे, पार्किंगचा प्रश्न व अन्य विकासकामांच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीने वातावरण तापवले. महायुतीने त्याला प्रत्युत्तर देत केलेले विकासकाम दाखवून नियोजनत्मक प्रचारावर भर दिला. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची अपेक्षा युती व आघाडीकडून व्यक्त करण्यात आली होती; परंतु सकाळी तेवढी गर्दी दिसली नाही. दुपारच्या वेळेत पेठकिल्ला भागातील मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मशिन बंद पडत असल्यामुळे मतदानाला विलंब झाल्याची घटना घडली. जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी पालिकेच्या मतदानाची टक्केवारी सर्वांत कमी होती.
चौकट...
तीन मते देताना मतदारांचा गोंधळ
यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र जोपर्यंत बीप वाजत नाही तोपर्यंत बटन दाबून धरावे लागत होते; परंतु आता एका मतदाराला एकदम तीन मते द्यावी लागत आहेत. त्यासाठी जोवर तुमची तीन मते देऊन पूर्ण होत नाहीत तोवर बीप वाजत नसल्याने अनेक ठिकाणी मतदारांचा गोंधळ झाला. काही ठिकाणी बटण जास्त वेळा दाबून धरल्याने मशिन हॅंग होणे किंवा बिघाड होण्याचे प्रकार घडले; परंतु त्यावर तत्काळ उपाय करून मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवण्यात आली.
चौकट
वयोवृद्धांचे मतदान
रत्नागिरी शहरामध्ये दिव्यांग मतदार तसेच ९० वर्षांवरील मतदारांनीही मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. माळनाका येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला पांडुरंग वैद्य या ९२ वर्षीय आजींनी केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. १९५३ मध्ये विवाह झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपालिका या सर्व निवडणुकीत मतदान केल्याचे वैद्य आजींनी सांगितले.
चौकट
नवरी, नवरदेव मतदानाला
लांजात लग्नाला निघालेली माळनाका येथील समृद्धी सुर्वे हिने अ. के. देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. पारंपरिक वेशात आलेल्या समृद्धीने आधी मतदान केले आणि नंतरच ती लग्नसमारंभासाठी रवाना झाली. अशाच प्रकारे साळवीस्टॉप येथील केंद्रावर राहुल शिवलकर या नवरदेवाने मतदान केले व तो पुढे लग्नासाठी रवाना झाला. योग्य मतदान करा व आपला लोकप्रतिनिधी नगरपालिकेत पाठवा व आपल्या प्रभागाचा विकास करून घ्या, मतदानाला वेळ लागत नाही, असे आवाहन त्याने केले.
चौकट
रत्नागिरी नगरपालिका मतदारांची संख्या
पुरुष- ३१ हजार ३२४
महिला- ३३ हजार ४२१
इतर- १
----------------
एकूण- ६४ हजार ७४६
कोट
प्रभाग १० मध्ये फक्त नगरसेवकपदाची निवडणूक २० तारखेला होणार आहे. त्यामुळे आज फक्त नगराध्यक्षपदासाठी मतदान असले तरी मतदारांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. पहिल्या दोन तासांत येथे उत्स्फूर्तपणे मतदान झाले असून, संध्याकाळपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान होईल.
- सचिन वहाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.