संताचे संगती ः पसायदान---------लोगो
(२७ नोव्हेंबर टुडे ३)
‘विश्व स्वधर्म सूर्यें पाहो’
श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील सर्व मागण्यांमधील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ‘विश्व स्वधर्म सूर्यें पाहो’. या ठिकाणी स्वधर्म या शब्दाचा अर्थ कोणत्याही लौकिक धर्माशी संबंधित नाही. जगण्याचे शास्त्र म्हणजे धर्म अर्थात कर्तव्यालाच धर्म अशी संज्ञा आहे. ज्याप्रमाणे आपले शेजारी आपल्याला मदत करतात. जेव्हा आपण त्यांना धन्यवाद देतो तेव्हा ते म्हणतात, आम्ही आमचा शेजारधर्म पाळला किंवा भगवान श्रीकृष्ण जेव्हा कर्णाला प्रश्न करतात, राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? तेव्हा या शब्दाचा अर्थ कर्तव्य असाच होतो. राजाकडून जसे राजधर्माचे पालन करणे अपेक्षित आहे तसे प्रजेकडून नागरिक कर्तव्य पूर्ण झाली पाहिजेत तरच ते सर्वांना सुखदायक होईल.
- rat३p४.jpg-
25O08188
- धनंजय चितळे
------
भारतातील आधुनिक संत जे. कृष्णमूर्ती यांना एका मुलाने प्रश्न विचारला, ‘आम्हाला शिकण्याचा आनंद कधी मिळेल ?’ तेव्हा ते म्हणाले ‘जेव्हा तुमच्या शिक्षकांना शिकवण्याचा आनंद मिळेल तेव्हाच तुम्हाला शिकण्याचा आनंद मिळेल’ म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपापली कर्तव्ये नीट पार पाडली तर ती उभयतांना आनंददायक होतील. आज दुर्दैवाने, माणसांमधील हक्काची जाणीव जितकी तीव्र झाली आहे तितकी कर्तव्यपालनाची तळमळ निर्माण झालेली दिसत नाही. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचे पठण करताना आपल्यामधील कर्तव्य पालनाची जागृती वृद्धिंगत व्हायला हवी. पसायदान म्हटले की, श्री ज्ञानेश्वर माऊलींनी यामध्ये ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे म्हटले आहे, हे जवळपास सगळ्यांना आठवते आणि आवडतेही. आम्ही याचा सरळ अर्थ असा घेतो की, आपल्याला जे जे हवे ते ते प्राप्त होणार आहे. या लेखमालेमध्ये पसायदानात एकूण ११ मागण्या आहेत, असे मी लिहिले होते. यातील पहिल्या पाच मागण्या पूर्ण झाल्यानंतर सहावी मागणी ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळावे, अशी आहे. पुन्हा एकदा पहिल्या पाच मागण्या आठवून पाहा.
* दुष्टांचा दुष्टपणा जाऊदे
* त्यांना चांगले काम करण्याची आवड निर्माण होऊदे
* सर्व प्राणिमात्रांना परस्परांबद्दल मैत्री वाटूदे
* पापाचा अंधकार दूर होऊदे
* सर्व प्राणिमात्रांकडून कर्तव्यांचे पालन होऊ दे. यानंतरची मागणी पूर्ण होण्यासाठी पहिल्या पाचांची पूर्तता होणे आवश्यक आहे. अर्थात, ज्याची मनोकामना पूर्ण करायची आहे त्याचे चराचर सृष्टीबरोबर मित्रत्वाचे संबंध असतील, त्याच्यामध्ये कोणताही दुष्टभाव नसेल आणि चांगली कामे करण्यामध्ये जर तो तत्पर असेल तर अशा कर्तव्यदक्ष व्यक्तीचे मागणे नेहमीच सर्वांच्या कल्याणाचे असेल! म्हणजेच त्याला तथास्तु म्हणण्यात कोणताच धोका नाही बरोबर ना? संतांच्या सर्व वाङ्मयाचा आपण अभ्यास केला तर ते जेव्हा एखादा शब्द देतात तेव्हा त्यामागे त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला असतो, हे आपल्या लक्षात येते. आपल्या शब्दांमुळे कोणाचेही अकल्याण होणार नाही, याची ते नेहमीच दक्षता घेतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली म्हणतो, मग ती माऊली आपल्या लेकरांचे अहित व्हावे असे कसे सांगेल? म्हणूनच जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, ही मागणी या जगाच्या वैयक्तिक स्वार्थपूर्तीची नाही तर विश्वकल्याणाची आहे.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.