कोनाळकट्टा प्रशालेत
९ पासून विज्ञान प्रदर्शन
दोडामार्ग ः जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि दोडामार्ग पंचायत समितीतर्फे ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ९ व १० डिसेंबरला तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एम. आर. नाईक विद्यालय, कोनाळकट्टा येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश दळवी व उद्घाटक म्हणून आमदार दीपक केसरकर यांची खास उपस्थिती असेल. प्रमुख पाहुणे म्हणून तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश दळवी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) गणपती करमळकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक कविता शिंपी, प्रा. राजेंद्र कांबळे, तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, कोनाळ सरपंच अस्मिता गवस आदी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी उद्घाटन व वक्तृत्व, निबंध स्पर्धा होणार असून दुसऱ्या दिवशी प्रदर्शन परीक्षण, प्रश्नमंजूषा, पारितोषिक वितरण व समारोह होणार आहे. कार्यक्रमाचा विज्ञानप्रेमी, शिक्षणप्रेमी, तसेच पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक विश्वनाथ सावंत व गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी केले आहे.
---
जिल्हा कराटे स्पर्धेत
सान्वी गवसचे यश
दोडामार्ग ः ट्रॅडिशनल कराटे असोसिएशन, गोवा आयोजित ‘टीकेएजी’ जिल्हा कराटे स्पर्धेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलची पाचवीतील विद्यार्थिनी सान्वी गवस हिने उज्ज्वल यश प्राप्त करत दहा वर्षांखालील मुलींच्या ३५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. ही स्पर्धा म्हापसा (गोवा) येथे झाली. सान्वीच्या या उत्तुंग कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या विजयाबद्दल संस्थाध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, मुख्याध्यापक संजय पाटील आदींनी तिचे अभिनंदन केले.
...................
वेंगुर्ले हायस्कूलमध्ये
‘ओपन हाऊस’ उपक्रम
वेंगुर्ले ः शहरातील वेंगुर्ले हायस्कूलला यावर्षी ११३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘ओपन हाऊस’ हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. या ओपन हाऊसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांना देण्यात आली. शिक्षक व पालक यांच्यातील संवादातून विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धती व प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापक एस. ए. बीडकर यांनी शाळेच्या ११३ वर्षांच्या उज्ज्वल परंपरेचा आढावा घेत शाळा, विद्यार्थी व पालक यांच्यातील नाते दृढ करण्यासाठी ‘ओपन हाऊस’ उपयुक्त ठरतो, असे मत व्यक्त केले. या उपक्रमावेळी सुमारे ३७५ पालक उपस्थित होते.
....................
हरकुळ बुद्रुकला
उद्या रक्तदान
कनेडी ः हरकुळ बुद्रुक कावलेवाडी (ता. कणकवली) येथील कोटेश्वर मंदिर येथे रविवारी (ता.७) सकाळी ९ ते १ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यावेळी रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन कोटेश्वर मित्रमंडळाने केले आहे.