08628
आंदगाव ‘विद्या विकास’मध्ये
सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः आधुनिक तंत्रयुगात पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज ओळखून डेटा एक्सेल इंडिया कंपनीने आपल्या सीएसआर निधीतून विद्या विकास मंदिर, आंदगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारला. सौर प्रकल्पाचे उद्घाटन शार्दुल जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे सीटीओ व एमडी विशाल भसीन, दिव्यानी भसीन, अतिश बुधे, ऐश्वर्या पोकळे उपस्थित होते.
मुख्याध्यापक सतीश सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. या उपक्रमात कोकण कला व शिक्षण विकास संस्था तसेच प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे, कोऑर्डिनेटर निकिता कंटाळे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू ठाकरे यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी कोकण एनजीओचे अजिंक्य शिंदे यांनी आभार मानत हा प्रकल्प ग्रामीण शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
..................
08629
सातोसे माऊली देवीचा
उद्या वार्षिक जत्रोत्सव
बांदा, ता. ५ ः सातोसे येथील श्री देवी माऊली पंचायत देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी (ता. ७) होणार आहे. सकाळी ९ वाजता पूजाअर्चा व दर्शनाला सुरुवात, ओट्या भरणे, नवस बोलणे व फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री १२ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, १.३० वाजता आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. दहिकाला करून जत्रोत्सवाची सांगता होईल. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी माऊली पंचायत देवस्थान सल्लागार उपसमिती आणि सातोसे ग्रामस्थांनी केले आहे.