कळणेत अनोळखी
व्यक्तींचा वावर
दोडामार्ग ः तालुक्यातील विविध भागांत अलीकडेच चोरी, तसेच छोटी दुकाने फोडण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, कळणे-डबीवाडी परिसरातही शुक्रवारी (ता. ५) मध्यरात्रीनंतर अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. घटनेची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याचे अंमलदार श्री. केरकर यांना देण्यात आली. पोलिसांनी त्वरित नोंद घेऊन परिसरात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. अलीकडच्या काळात तालुक्यातील इतर भागांत दुकानफोडी, तसेच चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरपंच अजित देसाई, तसेच कळणे ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनास रात्रीच्या वेळेस नियमित व वाढीव गस्त ठेवण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी सावध राहून संशयित हालचाली तत्काळ पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
------
मळगाव येथे शुक्रवारी
सांस्कृतिक कार्यक्रम
सावंतवाडी : प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगावच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उदय खानोलकर यांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १२) दुपारी चारला ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात होणार आहे. कार्यक्रमात दिवंगत उदय खानोलकर यांच्या ‘कोकणातील दशावतार’ या पहिल्या ग्रंथाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम आयोजित केला आहे. मळगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलावंत नारायण आसयेकर हे दशावतार कलेविषयी विवेचन व सादरीकरण करणार आहेत.
कार्यक्रमाला मळगावचे सुपुत्र डॉ. एम. के. ऊर्फ आबा गावकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नाट्यप्रेमी, वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानोलकर वाचन मंदिरतर्फे केले आहे.
.....................
वेंगुर्ले वाचनालयातर्फे
२१ ला वक्तृत्व स्पर्धा
वेंगुर्ले ः येथील नगर वाचनालय संस्थेतर्फे दरवर्षी स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्पर्धा आठवी ते बारावी गटामध्ये आयोजित करण्यात येतात. स्पर्धा केवळ वेंगुर्ले तालुका मर्यादित आहे. दोन्ही वक्तृत्व स्पर्धा २१ डिसेंबरला दुपारी साडेतीनला आयोजित केल्या आहेत. स्वामी विवेकानंद वक्तृत्व स्पर्धेचे हे चौदावे वर्ष असून ‘आजही स्वामी विवेकानंदांचे विचार उपयुक्त आहेत’ या विषयावर विद्यार्थ्यांनी १० मिनिटांमध्ये विचार सादर करावेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर वक्तृत्व स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून ‘सामाजिक समरसता-सावरकरांचा दृष्टिकोन’ या विषयावर आठवी ते बारावीतील विद्यार्थिनींनी विचार १० मिनिटे वेळेत सादर करावेत. प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३००, २५०, १५०, १०० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
............................
वेंगुर्ले वाचनालयातर्फे
२८ ला गायन स्पर्धा
वेंगुर्ले ः येथील नगर वाचनालय संस्थेतर्फे भालचंद्र शंकरराव कर्पे स्मृती गायन स्पर्धा २८ तारखेला दुपारी साडेतीनला संस्थेच्या कोरगावकर सभागृहात आयोजित केली आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटांत होईल. नाट्यगीत गायन पाचवी ते सातवी गट, आठवी ते दहावी गटासाठी गीतगायन स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणतेही एक गीत म्हणावयाचे आहे. दोन्ही गटातील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे २५०, २००, १५०, १००, १०० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा वेंगुर्ले तालुका मर्यादित आहे. स्पर्धकांची नावे २३ पर्यंत कार्यालयीन वेळेत मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात द्यावीत. नावनोंदणी, तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
---
कांदळगाव येथे
क्रिकेटची स्पर्धा
मालवण ः लॉर्ड सीमा चषक संयोजन समिती, कांदळगाव यांच्यावतीने भव्य इंटरवाडा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २५ ते २८ दरम्यान कांदळगाव येथे होणार आहे. विजेत्या संघास रोख रुपये २०,०३७ आणि लॉर्ड सीमा चषक, उपविजेत्या संघास रोख रुपये १०,०३७ आणि चषक, तसेच विविध वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सतीश कदम, पराग कदम, मैथिलेश कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
---
मालवण वाचनालयात
राष्ट्रीय संविधान दिन
मालवण ः येथील नगर वाचन मंदिर येथे राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमापूजन करून दीपप्रज्वलनाने आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच ‘संविधाना’चे पूजन करण्यात आले. नगर वाचन मंदिराचे ग्रंथपाल संजय शिंदे, ज्येष्ठ लेखक, मुद्रित शोधक दिलीप रेडकर, श्रेया चव्हाण, रमाकांत जाधव, यशराज मोरे, उमेश नाटेकर व इतर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.