जय हनुमान मंदिराचे
आकले येथे उद्घाटन
चिपळूण : आकले (जुनावडे) येथील जय हनुमान मंदिराचे उद्घाटन नुकतेच विशिष्ठी डेअरीचे चेअरमन व भाजप नेते प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. वाडीतील ग्रामस्थांची एकी, चिकाटी आणि भक्तीभावामुळे हे दिमाखदार मंदिर उभे राहू शकले. मंदिर उभारणीसाठी मदत करणाऱ्या देणगीदार आणि जमीनमालकांचे यादव यांनी आभार मानले. माजी सभापती विनोद झगडे, गावचे अध्यक्ष अनंत कदम, पुणे मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम तसेच सुरेश शिगवण, रामचंद्र मनवल, रामचंद्र शिगवण, संदीप मनवल, संतोष शिंदे, रवींद्र कदम, मंगेश कदम, संजय कदम आदी उपस्थित होते.
------
उद्यमी श्रीफळ सेमिनार
११ रोजी रत्नागिरीत
रत्नागिरी : स्वराज्य अॅग्रो अँड अलाईड सर्विसेसच्या नारळ काढण्याच्या सेवेला ११ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने ११ डिसेंबरला जयस्तंभ येथील दी महिला मंडळाच्या सांस्कृतिक सभागृह येथे दुपारी ३ वा. ‘उद्यमी श्रीफळ’ सेमिनारचे आयोजन केले आहे. या सेमिनारमध्ये कंपनी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा करणार आहे, ज्यात महाराष्ट्रातील पहिले नारळावर आधारित वस्तू व खाद्यपदार्थ विक्री केंद्र सुरू करण्याची घोषणा तसेच ठराविक नारळ झाडांचेच नारळ ३२ रुपये या हमीभावात विकत घेण्याची योजना समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त, कंपनी निवडक ग्राहकांना विक्रीकेंद्राच्या नफ्यात भागीदारी मिळण्याची संधी तसेच तरुणांना स्वयंरोजगार मिळण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. या कार्यक्रमाला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, रत्नागिरी जिल्ह्याचे कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले उपस्थित राहणार आहेत.
--------------
देवरूख शिक्षण संस्थेला
उत्कृष्ट संस्था पुरस्कार
साडवली ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला तितक्याच जुन्या आणि प्रसिद्ध अशा महाराष्ट्र सेवा संघ (मुलुंड) या संस्थेकडून ‘उत्कृष्ट संस्था’ पुरस्कार पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते ७ डिसेंबरला मुलुंड येथे प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप एक लाख आणि सन्मानचिन्ह असे आहे. डॉ. निरगुडकर यांनी देवरूखसारख्या छोट्या गावातील संस्थेने केलेल्या कार्याची प्रशंसा करून संस्था करत असलेले कार्य हे देशविकासासाठी असलेले कार्य आहे व हा पुरस्कार एका सतशील संस्थेने दुसऱ्या एका सतपात्री संस्थेला दिलेला पुरस्कार आहे, असे सांगितले.