rat10p3.jpg-
09704
संगमेश्वर - एसटी बस
सकाळी सहाची संगमेश्वर–रत्नागिरी एसटी बंद
वाहतूक नियंत्रण कक्षात तक्रार; सुमारे पंधरा गावातील विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १०ः संगमेश्वरहून रत्नागिरीकडे जाणारी सकाळी सहा वाजताची एसटी बस गेल्या सहा–सात दिवसांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवासी त्रस्त झालेले आहेत. ही एसटी बंद करण्यापूर्वी संगमेश्वर आगारात एकही सूचनाफलक किंवा अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही. या निष्काळजी कारभारावर आता प्रश्नचिन्ह उभे राहत असून, विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
संगमेश्वर, तिवरे, डिंगणी, फुणगूस आणि आसपासच्या सुमारे पंधराहून अधिक गावातील विद्यार्थी रत्नागिरीतील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संगमेश्वर-रत्नागिरी एसटी बसने दररोज प्रवास करतात. सकाळची सहाची एसटी ही त्यांच्या शैक्षणिक दिनक्रमाची जीवनवाहिनीच होती. पहाटे ५ वाजता घर सोडून अनेक विद्यार्थी ही बस पकडण्यासाठी धडपड करतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून बसच येत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. पर्यायी वाहनांनी प्रवास करण्याचा अतिरिक्त खर्च, वेळेचा प्रचंड अपव्यय आणि असुरक्षित प्रवास यामुळे विद्यार्थ्यांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती असह्य झाल्यामुळे आज काही विद्यार्थ्यांनी संगमेश्वर वाहतूक नियंत्रण कक्षात प्रत्यक्ष जाऊन तक्रारवहीत आपली तक्रार अधिकृतपणे नोंदवली आहे.
या तक्रारीत विद्यार्थ्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, सकाळची सहा वाजताची रत्नागिरी एसटी अचानक बंद केल्याने आम्हाला कॉलेज प्रात्यक्षिके, व्याख्याने यांना वेळेत पोहोचता येत नाही. शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून, सातत्याने अनुपस्थिती लागत आहे. यासोबतच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने दखल घेऊन ही एसटी त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. एसटी बंद करताना आगारात नोटीस का लावली नाही? विद्यार्थ्यांचे नुकसान समजूनही प्रशासन शांत का? अन्य बसेसची व्यवस्था का केली नाही? अचानक बंद करण्यामागे नेमके कारण काय? विद्यार्थ्यांचे नुकसान कोण भरेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे एसटी प्रशासनाकडून अपेक्षित उत्तरांची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ही बस तत्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोट
संगमेश्वर-रत्नागिरी सकाळी सहा वाजता सोडण्यात येणारी बस विद्यार्थी आणि सकाळी रत्नागिरीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिक, पालक आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी ही बस कायम ठेवावी, अशी मागणी केली होती. आता हीच बस कोणतेही कारण न देता बंद केली असेल तर ते योग्य नाही. एसटी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे.
- संतोष थेराडे, संगमेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.