(टीप- ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)
-rat११p३२.jpg-
P२५O०९९८७
चिपळूण ः पिंपळी येथे रस्त्याच्या दुतर्फा अशी वाहने लावली जातात. त्यामुळे वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांना मोकळा मार्ग मिळत नसल्याने अपघात होतो.
-rat११p३३.jpg-
२५O०९९८८
चिपळूण ः रस्त्याशेजारीच उभ्या असणाऱ्या दुचाकींमुळे एसटी रस्त्यावरच उभी करावी लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
---
काँक्रीटीकरणानंतर वाहनांचा वेग जीवघेणा
चिपळूण-पिंपळी रस्त्यावर वाढले अपघात ; १६ ठार, बाजारपेठ, आयटीआयमुळे वर्दळ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : चिपळूण ते पिंपळी रस्त्याच्या रुंदीकरणानंतर तेथील वाहनांचा वेग सुसाट झाला आहे. वाहनांच्या वेगामुळे त्या रस्त्यावर वर्षभरात दुचाकींचे अपघात वाढले आहेत. रुंदीकरणानंतरचा रस्ता मोठा झाल्याने वाहने सुसाट अन् बेदरकार झाली आहेत. वर्षभरात ११ अपघातांत १६ लोकांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावर बेदरकार वाहनांचा सुसाटपणच स्थानिक गावांना धोक्याचा ठरत आहे.
बहादूरशेख नाका ते पिंपळी मोहल्ल्यापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. बारा किमीच्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी जोडरस्ते आहेत. पेढांबे फाटा, पिंपळीफाटा, आयटीआय येथून येणारा रस्ता, वेहळे गावातून येणारा रस्ता मुख्य रस्त्याला जोडला जातो. गावातून येणाऱ्या वाहनाला मुख्य मार्गावरील सुसाट वाहनाशी सामना करावा लागतो. अनेकवेळा या चौकातच अपघात होतात. रस्त्याच्या काही ठिकाणी तीव्र उतार आहे; मात्र, हे उतार लक्षात येत नाहीत. परिणामी, वाहने वेगात जातात अन् अपघात होतो. त्यामुळे उतार, सखल भाग, वळणाच्या ठिकाणी फलक गरजेचे आहेत. वर्षभरात त्या रस्त्यावर जेवढे अपघात झाले आहेत त्यातील अनेक अपघात वाहनाच्या वेगामुळे व चालकाच्या चुकीमुळे झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. या मार्गावर खेर्डीची मोठी बाजारपेठ आहे. खेर्डीतील कोकण रेल्वेच्या पुलाखालील परिसर ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच आहे. दत्तमंदिरपासून पुढे रेल्वेपुलापर्यंतचा रस्ता मोकळा असतो. त्यामुळे येथे दुचाकी सुसाट चालवली जाते; मात्र अचानक समोरून वाहन आले तर येथे अपघात ठरलेला असतो. खेर्डीतील रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने उभी असतात. या वाहनांच्या आडून एखादी दुचाकी आली तर अपघात होतो. सती येथील नाक्यात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांची संख्या खूप असते. येथे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.
*अवजड वाहनांमुळे धोका
वाशिष्ठी डेअरी ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा आहे. तेथे खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीतील साहित्याची वाहतूक करणारी वाहने उभी केली जातात. एका ठिकाणी सिमेंटचे गोडाऊन आहे. तिथेही अवजड वाहने उभी केली जातात. त्या ठिकाणी अपघात होत आहेत.
*पिंपळीखुर्द नाक्यावर विद्यार्थ्यांची गर्दी
पिंपळीखुर्द येथील नाक्यावर आयटीआयचे विद्यार्थी सुटल्यानंतर रस्त्यावर गर्दी असते. या वेळी दुचाकी चालक अत्यंत वेगाने ये-जा करत असतात. वाशिष्ठी डेअरी समोरच्या रस्त्यावरही दुचाकीसह चारचाकी चालकांचा वेग सुसाट असतो. येथील कालव्यावर असलेल्या अरुंद पूल अपघाताचे मोठे कारण आहे. चार महिन्यापूर्वी येथे मोटार, रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत पाचजणांचा जीव गेला होता. बहुतांशी दुचाकींचे अपघात या ठिकाणी झाले आहेत. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने सौरऊर्जेवर चालणारे छोटे सिग्नल लाईट बसवले आहेत; परंतु अपघात रोखण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळतात आणि अपघात होतो. हे खड्डे चक्क मातीने बुजवले जात आहेत.
*उपाययोजनांची आवश्यकता
रस्त्यावर वाहनांचा वेग व वाढती रहदारी लक्षात घेऊन तेथे उपाययोजना होण्याची गरज आहे. तसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्या रस्त्यावर सावधानतेचे अथवा बचावाचे फलक किंवा अपघातांची पूर्वसूचना देणारे फलक नाहीत. काँक्रिटच्या रस्त्यामुळे वाहनचालक वेगमर्यादेचे पालन होत नाही. प्रशस्त रस्त्यामुळे चालकांना लेनचेही भान राहात नाही.
---
कोट
सती चौकातील रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. लहान अपघात नित्याचेच आहेत. त्यामुळे चिपळूणहून येणाऱ्या आणि पोफळीकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या लेनवर रम्बलर लावल्यास वाहनांचा वेग आटोक्यात येऊ शकतो.
- शरद चाळके, सती, चिपळूण
-----
कोट
चिपळूण-पिंपळी मार्ग सिमेंट काँक्रिटचा झाला, रस्त्याचे रुंदीकरण झाले. वाहनांचा वेगही वाढला; परंतु रस्त्यालगत असलेल्या गावांना अपघाताचा प्रचंड धोका आहे. प्रामुख्याने खेर्डी आणि सती चिंचघरी या भागात होणारे अपघात थांबवण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जी वाहने कायमस्वरूपी रस्त्यावर उभी असतात त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो त्या वाहनमालकांना समज दिली पाहिजे.
- अभिजित खताते, ग्रामपंचायत सदस्य, खेर्डी