rat12p19.jpg
10216
दापोली ः कोकण इतिहास परिषद कार्यकारिणी सदस्य प्रवीण कदम आणि वीरगळ संशोधक अनिल दुधाणे यांनी पन्हाळेकाजी येथील शिलालेखांची पाहाणी केली.
rat12p20.jpg
10217
दापोली ः पन्हाळेकाजी येथे आढळलेले हजार वर्षांपूर्वीचा शिलालेख.
-----------
पन्हाळेकाजीत आढळला हजार वर्षांपूर्वीचा शिलालेख
कोटजाई नदीच्या काठावर लेणी; मजकूर देवनागरीत, मंदिर बांधल्याचा उल्लेख
अशोक चव्हाण/सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १२ ः दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते शैव, बौद्ध आणि नागपंथी लेणीसाठी. येथेच मराठी भाषा आणि देवनागरी लिपीच्या प्राचीनत्वाचा आणखी एक ठोस पुरावा आढळला आहे. तज्ज्ञांकडून त्याचे प्राथमिक वाचनही झाले आहे. पन्हाळेकाजी गावाजवळील कोटजाई नदीकिनारी एका खासगी जागेत हा शिलालेख असून, तो इसवी सन १०५२ शके ९७४ सालातील आहे. येथे यापूर्वीही शिलालेख आढळले असून, उत्खनन केल्यास येथे प्राचीन इतिहासाचा उलगडा होऊ शकतो, असे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे.
दापोलीपासून २५ किमीवरील प्रणालक दुर्ग परिसरात हा शिलालेख आहे. कोकण प्रदेश आणि मराठी भाषेविषयी काही नव्या गोष्टी या शिलालेखामुळे प्रकाशझोतात येतील, असा अंदाज इतिहास तज्ञांनी व्यक्त केला आहे. दापोलीतील कोटजाई नदीच्या एका काठावर लेणी असून, दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उतेकर यांच्या जागेत हा शिलालेख आहे. इतिहासतज्ञ आणि लेखक प्रवीण कदम यांना दोन वर्षांपूर्वी स्थानिक रहिवासी आणि इतिहास संशोधक शशिकांत शेलार यांच्याकडून या शिलालेखाविषयी समजले. कदम यांनी शिलालेखतज्ञ अनिल दुधाणे, अथर्व पिंगळे यांनी या विषयी कळवले. त्यांनी त्याचे वाचन केले. शिलालेखातील मजकूर देवनागरी लिपीत असून, तो नव्वद टक्के वाचता येतो. काही शब्द आणि अक्षरे हजार वर्षांच्या काळात विरळ झाली आहेत. त्यांचा अर्थ लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही आमच्यापरीने या शिलालेखाचे वाचन केले. त्यातून अर्थबोध मांडले आहेत. अन्य तज्ञांनीही त्याचे वाचन करावे, असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे. कदम गेली काही वर्षे कोकणातील प्राचीन ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि दुर्गांविषयी अभ्यास आणि संशोधन करत आहेत. कोकण इतिहास परिषदेचे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत आहेत.
--------
चौकट
नैसर्गिक दगडाचाच वापर
दापोली तालुक्यामध्ये पन्हाळेकाजी लेणीसमुहाच्या बाजूला होळ (होलेश्वर) वाडी गावाच्या बाजूने कोटजाई नदीकिनारी एका खडकावर हा शिलालेख आहे. आठ ओळींचा देवनागरी लिपीतील हा मराठी भाषेतील मजकूर आहे. शिलालेखाची उंची १९ इंच असून, रूंदी १८ इंच आहे. शिलालेखाची अक्षरे अतिशय जुन्या वळणाची असून, सुंदर एकसारखी कोरलेली आहेत. जागेअभावी नदीच्या प्रवाहात सतत पाणी असल्याने खडकाचा काही भाग झिजला आहे. लेखाच्या वरील भागात सूर्यचंद्र असून, मध्यभागी मंगलकलश कोरला आहे.
------
चौकट
शिलालेखात काय ?
सिंघदेव राणक (स्थानिक राजा) यांच्या कारकीर्दीत सेठीदेऊ खै या सेनाधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली सिंघपे म्हल अर्थात् महल्ल म्हणजे अंतःपुरावरचा अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली श्री कपिलेश्वर महादेवाचे मंदिर बांधून पूर्ण केले आहे. यासाठी १०० गद्यान भूमी दानस्वरूपात दिली आहे. सेठीदेऊ याने हा शिलालेख कोरून लिहिल्याचा उल्लेख आहे. पन्हाळेकाजी गाव हे प्राचीन आणि सुंदर लेणीसमुहांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे शैव, बौद्ध आणि नाथपंथी संस्कृतीचे दर्शन घडते.
-------
चौकट
कपिलेश्वर मंदिराचे काही अवशेष शिल्लक
शिलालेखात कपिलेश्वराचे मंदिर बांधल्याचा उल्लेख असला तरी आता मात्र मंदिराचे किरकोळ अवशेष वगळता बाकीचे पूर्ण अवशेष गहाळ आहेत. शेजारी एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आहे. सध्या ते नदीपात्राशेजारी स्थापित केले आहे. पूर्वी हे शिवलिंग नदीपात्रात सापडले, असे ग्रामस्थ सांगतात. यावरून मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असावे.
-------
कोट
पन्हाळेकाजी लेणीसमूह केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या कक्षेत येतो. आता नव्याने सापडलेल्या शिलालेखाला राष्ट्रीय स्मारकाच्या सीमेमध्ये अंतर्भूत केल्यास त्याचे संरक्षण होईल.
--प्रवीण कदम, इतिहासतज्ञ