10271
स्वयंभू श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, कुलस्वामिनी आदिमाया भवानी यांची मूर्ती.
श्री देव रामेश्वर-शिवरायांची २३ जानेवारीला भेट
त्रैवार्षिक उत्सव ः किल्ले सिंधुदुर्गवर रंगणार सोहळा
मालवण, ता. १२ ः कोकणातील प्रसिद्ध देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी किल्ले सिंधुदुर्ग येथे २३ ते २५ जानेवारीला रवाना होणार आहेत. या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यास भाविकांनी सहभागी होऊन पारंपरिक शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.
कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिरात देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त मंडळ, मालवण व्यापारी, किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशी, जोशी मांड, रामेश्वर मांड, महान, न्हिवे, कोळंब तसेच कांदळगाव रामेश्वर देवस्थानच्या मानकऱ्यांची बैठक झाली. यावेळी किल्ले सिंधुदुर्गवर होणाऱ्या श्री देव रामेश्वर व शिवराय यांच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्याबाबत नियोजन व चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत २३ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत श्री देव रामेश्वर आपल्या रयत लवाजम्यासह किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवराय व आदिमाया कुलस्वामिनी भवानी मातेच्या त्रैवार्षिक भेटीसाठी जाणार असल्याचे ठरविण्यात आले.
श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी सकपाळ कुटुंबिय यांच्याकडून स्वागत केले जाते. त्यानंतर छत्रपतींकडून शेले-पागोटे देऊन श्री देव रामेश्वराला नजराणा दिला जातो. याप्रसंगी सर्व वारेसुत्रांचाही सन्मान केला जातो. देव रामेश्वर आपल्यावतीने छत्रपतींना शेले-पागोटे देऊन सन्मानित करतात. नंतर देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र व भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद आदान-प्रदान करतात. या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यात कांदळगावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. देव रामेश्वर जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी सडारांगोळी, तोरणे, स्वागत कमानी, आकर्षक देखावे साकारले जातात. हा भेट सोहळा म्हणजे मालवण तालुक्याच्या दृष्टीने एक सणच असतो.