‘ग्रंथालय’ परीक्षेसाठी
३१ पर्यंत नोंदणी करा’
कुडाळ ः सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि कोकण विभाग ग्रंथालय संघाच्या शिफारशीने रावबहाद्दूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय) कुडाळ या संस्थेमार्फत गेली २५ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ग्रंथालय संचालनालयाच्या मान्यतेने ग्रंथालय परीक्षा प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत आहे. यावर्षीही हा वर्ग १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. वर्गाचा कालावधी सहा महिन्यांचा असून दर महिन्यातील शनिवारी व रविवारी असे आठवड्यातून दोन दिवस प्रशिक्षण होणार आहे. प्रत्यक्ष ग्रंथालयीन कामकाजाच्या प्रात्यक्षिकांचा त्यात समावेश राहील. तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून हे प्रशिक्षण देण्यात येते. वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी जिल्हा ग्रंथालयाशी संपर्क साधावा. प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल राजन पांचाळ यांच्याशी संपर्क साधावा.
...................
मराठा समाज संस्थेचे
जानेवारीत स्नेहसंमेलन
कुडाळ ः सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई संस्थेचे ३१ वे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा १८ जानेवारीला येथील मराठा समाज सभागृहामध्ये होणार आहे. स्नेहसंमेलनात शिष्यवृत्ती, दहावी, बारावी, पदवीमध्ये उच्च श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. दहावीमध्ये ८५ टक्के व बारावीमध्ये ७० टक्के गुण प्राप्त झालेल्या, शिष्यवृत्तीमध्ये उच्च श्रेणी, तसेच इतर शाखांमध्ये उच्च श्रेणी प्राप्त झालेल्या मुलांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स ३० डिसेंबरपर्यंत मराठा समाज हॉलमध्ये द्यावी. कुडाळ कार्यालय, तसेच सावंतवाडी येथील टी. व्ही. देसाई, वसतिगृह सालईवाडा, कृष्णाजी कोठावळे यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन स्थानिक समिती प्रमुख आर. एल. परब यांनी केले आहे.
....................
ओटवणेत उद्यापासून
गाव चव्हाटा महोत्सव
ओटवणे ः गावठणवाडी कला, क्रीडा व मित्रमंडळ, ओटवणे यांच्यावतीने ‘गाव चव्हाटा महोत्सव-२०२५’ या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सातला उद्घाटन सोहळा, रात्री आठला दशावतारी कलाकृती व कलाकारांचा इतिहास सांगणारी ‘मयूर स्वरांचा दशावतार’ ही संगीत मैफल होईल. यात गायक-बुवा मयूर गवळी, पखवाज कौशल मेस्त्री, तालरक्षक बाबाजी गावकर आणि निवेदन राजा सामंत करणार आहेत. शनिवारी (२०) रात्री आठला स्थानिक मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रविवारी (२१) सायंकाळी पाचला फनी गेम्स, रात्री आठला श्री दत्तमाऊली दशावतारी नाट्यमंडळ, सिंधुदुर्गनगरी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. हा महोत्सव गोविंद भोरू गावकर स्मृती रंगमंच, गावठणवाडी येथे होणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन गावठणवाडी कला, क्रीडा व मित्रमंडळ ओटवणे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.