11835
‘समृध्द पंचायत’ देणार ग्रामविकासाला बळ
सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद ः ४३३ ग्रामपंचायतींचा सहभाग
विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात सिंधुदुर्गातील सगळ्या म्हणजे ४३३ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला आहे. ३१ डिसेंबरपर्यत चालणाऱ्या या मोहीमेत सर्व ४३३ ग्रामपंचायतींनी आवश्यक असलेली माहिती ऑनलाईन पद्धतीने शासनाला सादर केलेली आहे. त्यामुळे ग्रामविकासाला चळवळीचे रूप देणाऱ्या या अभियानाला पहिल्याच वर्षी जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद लाभला आहे.
राज्याने ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी १७ सप्टेंबरला करण्यात आला. हे अभियान स्पर्धात्मक राहणार असले तरी ग्रामविकास अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणारे ठरणार आहे. भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे. त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. हा शाश्वत विकास साधताना सध्याच्या पिढीच्या गरजा भागविल्या गेल्या पाहिजेत. परंतु, पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे गावांचा शाश्वत विकास हा आपल्या राज्याच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
सध्या अनेक गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा या मूलभूत गरजांसह रोजगार, माहिती तंत्रज्ञान, शाळांमध्ये शिक्षणाचा उच्च दर्जा, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रे तेथे औषधांची उपलब्धता, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा अशा प्राथमिक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करते. याच पार्श्वभूमीवर राज्याने ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ''मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींना १७ सप्टेंबरला खास ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार ४२१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा पूर्ण झाल्या होत्या. केवळ १२ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा पूर्ण होऊ शकलेल्या नव्हत्या. यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील ८ तर कुडाळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर प्रचार प्रसिद्धीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरावर एक स्वतंत्र विभाग प्रमुख नियुक्त करून त्यांच्याजवळ प्रत्येक तालुक्याच्या संपर्काची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर पंचायत समिती स्तरावर तालुकास्तरीय विभाग प्रमुखांची प्रत्येकी २० गावांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामसभा पूर्ण झाल्यानंतर या अभियानात सहभागी होणाऱ्या ग्राम पंचायतींना अभियानाच्या उद्देशातील निकष पूर्ण करणारी सध्याची स्थिती दर्शविणारी माहिती शासनाला ऑनलाईन सादर करणे गरजेचे होते. त्यात ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सोयीसुविधा, नावीन्यपूर्ण उपक्रम याची परिपूर्ण माहिती भरायची होती. ग्रामपंचायत ई-मेल, गावची लोकसंख्या, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची नावे, अशी एकूण ४४ प्रश्नांची प्रश्नावली होती. त्याला पर्याय देण्यात आले होते. ती सर्व प्रश्नावली भरायची होती. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ४३३ ग्रामपंचायतींनी शासनाला ऑनलाईन माहिती सादर केलेली आहे. अभियानाची मुदत ३१ डिसेंबरला संपणार आहे. ही मुदत संपल्यानंतर भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मूल्यमापन केले जाणार आहे. ऑनलाईन भरलेल्या माहितीत अभियान कालावधीत झालेला बदल, ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे झालेले काम याबाबत मूल्यमापन केले जाणार आहे. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा स्तरावर लाखोंनी रुपयांची बक्षिसे यासाठी शासनाने निश्चित केली आहेत. त्यामुळे या अभियानाला १०० टक्के प्रतिसाद पहिल्याच वर्षी लाभला आहे.
...................
चौकट
सायबर गुन्हेगारीचा धुमाकूळ
मागील १५ दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन धुमाकूळ घातला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर गुन्हे प्रकारात तब्बल ३ गुन्हे नोंद झाले आहेत. यात सावंतवाडीमध्ये ९७ लाख, कणकवलीमध्ये १२ लाख आणि दोडामार्गमध्ये ५ लाख अशी आर्थिक फसवणूक झाली आहे. या तिन्ही नोंदीत गुन्ह्यात १ कोटी ११ लाखांची एकूण आर्थिक फसवणूक झालेली आहे. यातील दोन गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात यश आले असून अन्य गुन्हेगार शोधण्यात यश आले आहे. तीन गुन्हे नोंद झाले असले तरी अजून अनेकजण फसले गेले असतील. केवळ समाजात आपला हसा होऊ नये, म्हणून तक्रार दाखल केलेली नसेल; परंतु सायबर क्राईममधील या विषारी फसवणुकीने आपल्या जिल्ह्यात जोर धरला आहे. जिल्ह्यातील नागरिकही फसत आहेत. त्यामुळे याबाबत सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे.
कोट
ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभियान यशस्वी करणारा जिल्हा म्हणून पाहिले जाते. केंद्र, राज्य शासनाच्या प्रत्येक अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याने वारंवार यश मिळविले आहे. त्याप्रमाणे या अभियानात सुध्दा जिल्ह्याने १०० टक्के सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी होण्यासाठी तसेच कोकण विभाग, राज्यात जिल्ह्याला यश मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. विविध मुद्दे घेऊन काम केले जात आहे.
- जयप्रकाश परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
तक्ता
तालुका*ग्रामपंचायत संख्या*माहिती भरलेली संख्या
देवगड*७२*७२
दोडामार्ग*३६*३६
कणकवली*६४*६४
कुडाळ*६८*६८
मालवण*६५*६५
सावंतवाडी*६३*६३
वैभववाडी*३५*३५
वेंगुर्ले*३०*३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.