13757
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय द्या
शिष्टमंडळाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, उद्या बैठक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २९) विशेष बैठक बोलावली असून, प्रलंबित असलेल्या १७ वारसांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र नगरपालिका एम्प्लॉईज युनियनचे कोकण अध्यक्ष संतोष पवार, सुनील परब, गोपाल सावंत, संदीप पाटील, नितीन कदम, नारायण राऊळ आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. चर्चेदरम्यान नगर विकास सहआयुक्त विनायक औधकर हे देखील उपस्थित होते.
सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला समाज कल्याण सहआयुक्त, नगर विकास सहआयुक्त आणि सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत १७ वारसांना न्याय देण्याबाबत ठोस निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबातून समाधान व्यक्त होत आहे.