13759
घारपी जि.प.शाळेत ‘वीर बाल दिवस’
बांदा ः घारपी येथील जिल्हा परिषद शाळेत वीर बाल दिवस विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, त्याग व देशभक्तीची भावना रुजावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व सांगितले. अल्पवयातच धर्म व देशासाठी बलिदान देणाऱ्या साहिबजाद्यांचे शौर्य विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण म्हणून मांडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी कविता गायन स्पर्धा व वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. कविता गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध कविता सादर केल्या, तर वादविवाद स्पर्धेत मोबाईलचे फायदे व तोटे, शहर व खेड्यातील जीवन, योग्य आहार, मुलगा-मुलगी समानता अशा विषयांवर विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते, असे सांगितले. सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.