13774
राणेंचा फोटो हटविल्याचा आरोप खोटा
पारकर ः मनमानीमुळेच नलावडेंचा पराभव
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २७ : कणकवली नगराध्यक्षांच्या दालनातील खासदार नारायण राणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकण्यात आल्याचा आरोप समीर नलावडे यांनी केला आहे. मात्र, ते आरोप खोटा आहे असा दावा ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी आज केला. तर मनमानीपणामुळेच समीर नलावडेंचा नगराध्यक्ष निवडणुकीत पराभव झाला असल्याचे ते म्हणाले.
येथील शासकीय विश्रामगृहात श्री.पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘कणकवली नगराध्यक्षांच्या दालनातील नारायण राणे यांचा फोटो शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकल्याचा समीर नलावडे यांनी केलेला आरोप पूर्णतः खोटा आहे. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनानेच हे फोटो काढून ठेवले होते. त्याबाबत अधिक माहिती नगरपंचायत प्रशासन देऊ शकते. दरम्यान, शहर विकास आघाडीने ही निवडणूक भाजपच्या विरोधात लढवली असली, तरी नारायण राणे हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि स्थानिक खासदार आहेत. त्यांची हरकत नसेल तर त्यांचा फोटो नगराध्यक्षांच्या दालनात लावण्यात काहीही समस्या नाही.’
पारकर म्हणाले, की ‘सन २०१५ मध्ये आम्ही नारायण राणेंच्या विचारधारेपासून बाजूला होतो. त्यावेळी कणकवली नगरपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर त्यांचा फोटो काढला होता, ही बाब खरी आहे. मात्र, यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दालनात प्रथम प्रवेश केला, तेव्हा तेथे कोणतेही फोटो नव्हते. त्यामुळे यासंदर्भात केलेले आरोप निराधार आहेत. नलावडे यांच्या मनमानीपणामुळेच कणकवलीतील ज्येष्ठ नागरिकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, पालकमंत्री राणे यांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली. याउलट आमदार नीलेश राणे यांनी शहर विकास आघाडीच्या रथाचे श्रीकृष्णाप्रमाणे सारथ्य केले. संदेश पारकर विजयी होत नाहीत तोपर्यंत शांत बसू नका, असेही त्यांनी आवाहन केले. याचाच परिणाम म्हणजे भाजपचा पराभव आणि शहर विकास आघाडीचा विजय झाला.’
------
पटवर्धन यांचा पुतळा कुठे आहे?
‘समीर नलावडे हे आता फोटोंचे राजकारण करत आहेत. मात्र, आपल्या पराभवानंतर त्यांनी नरेंद्र मोदी, फडणवीस, रवींद्र चव्हाण एवढेच नव्हे तर भाजपचे कमळ चिन्ह देखील काढून टाकले आहे. त्यामुळे राजकारण कोण करतंय हे कणकवलीकरांना माहिती आहे. चार वर्षांपूर्वी आमदार आणि विद्यमान पालकमंत्री राणे यांनी नगरपंचायतीला अप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा भेट दिला होता, हा पुतळ आता कोठे आहे? असा प्रश्नही श्री.पारकर यांनी उपस्थित केला. संदेश पारकर यांचा आपुलकीचा स्वभाव लोकांना आवडतो. ३० वर्षांत त्यांच्या स्वभावात कधीच बदल झाला नाही. सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत त्यांनी वाटचाल केली आणि हाच स्वभाव त्यांना कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीत विजयापर्यंत घेऊन गेला, असेही पारकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.