wt1411.jpg
17731
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील शासकीय भरतीत स्थानिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
परजिल्ह्यातील उमेदवारांचीच ''भरती''त वर्णी
स्थानिकांचा आरोप ः जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ ः जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित तरुणांना डावलून परजिल्ह्यातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर वर्णी लागत असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील नागरिकांनी आणि सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केले आहे की, जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत झालेल्या तलाठी आणि महसूल सहाय्यक भरतीत १८८ उमेदवारांपैकी केवळ २८ उमेदवार स्थानिक आहेत तर उर्वरित १५६ उमेदवार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील पात्र तरुणांना मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत असून जिल्हा ''युवक विरहित'' होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा बँकेच्या धर्तीवर सर्व शासकीय भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांसाठी ७० टक्के पदे आरक्षित ठेवावीत, खासगी कंपन्यांमार्फत होणारी भरती संशयास्पद असून ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश यांच्या समितीमार्फत राबवावी, नियुक्त झालेल्या उमेदवारांकडून किमान १५ वर्षे आंतरजिल्हा बदली मागणार नाही, असा लेखी बाँड घेण्यात यावा, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा घेतल्यास उमेदवार आपापल्या जिल्ह्यात अर्ज करतील, ज्यामुळे बाहेरील गर्दी कमी होईल अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील तरुणांना मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रत्येक २-३ तालुक्यांत सरकारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करावीत. बाहेरील जिल्ह्यांतून आलेले उमेदवार काही वर्षांतच राजकीय वरदहस्ताने बदली करून आपल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे पदे पुन्हा रिक्त होतात आणि सरकारी कामाचा खोळंबा होतो. तसेच स्थानिक बोलीभाषा आणि भौगोलिक परिस्थितीची जाण नसल्याने शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात हे कर्मचारी उदासीन असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांनाही पाठवण्यात आली आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास जिल्ह्यातील तरुणांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना रमण वाईरकर, समीर लाड, आदिओम लाड, अमित तांबे, सुप्रिया परब, विनायक गावकर यांच्यासह अनेक नागरिक व युवक उपस्थित होते.
----------------