rat१५p४३.jpg-
२६O१८०४८
समीर टाकळे
समीर टाकळे यांचा ठाकरेसेनेला रामराम
चिपळूणचा आधारस्तंभ अशी ओळख; कुटुंबीय पक्षापासून दूर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : चिपळूण तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपशहरप्रमुख, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक व शहरातील नेते समीर टाकळे यांनी पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यापुढे शिवसेना (उबाठा) पक्षाशी आपला कोणताही संबंध राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चिपळूण शहर व तालुक्यात शिवसेना उभी करण्यामागे टाकळे कुटुंबाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख बंधू टाकळे हे याच कुटुंबातील होते. शिवसेनेच्या फुटीनंतरही टाकळे कुटुंबाने पक्षाची साथ सोडली नव्हती, उलट पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांनी काम सुरू ठेवले होते; मात्र आता या कुटुंबातील एकामागोमाग एक सदस्य पक्षापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. समीर टाकळे हे चिपळूण शहरातील शिवसेनेचे आधारस्तंभ मानले जात होते. उपशहरप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे दमदार काम केले. स्वतःच्या खर्चाने शहरात शिवसेनेचे कार्यालय उभे करून ते सुरू ठेवण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. या वेळी त्यांच्यावर टीकाही झाली; मात्र ते मागे हटले नाहीत. शहरप्रमुखपदासाठी ते प्रबळ दावेदार असतानाही वारंवार डावलले गेले तरीही नाराजी न दर्शवता त्यांनी पक्षाचे काम सुरू ठेवले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कन्या, युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनीही पदासह पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता स्वतः समीर टाकळे यांनी शहरप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीतही यापुढे पक्षाचे कोणतेही काम करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
.