कालकरकोंडमध्ये
दंतचिकित्सा शिबिर
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालकरकोंड या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जायंट्स् ग्रुप ऑफ कुवारबाव सहेली यांच्यावतीने मोफत दंतचिकित्सा व मार्गदर्शन शिबिर झाले. ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियानांतर्गत झालेल्या या उपक्रमात डॉ. ऋषिकेश जोशी यांनी अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत दंततपासणी करून दातांची स्वच्छता कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले. मोबाईल नेटवर्क व दळणवळणांच्या सुविधांपासून दूर असलेल्या या शाळेत शहरातून डॉक्टर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या वेळी हळदीकुंकू कार्यक्रमही घेण्यात आला.
‘प्रेमजीभाई आसर’मध्ये
भाजीपाला लागवड
संगमेश्वर ः चिपळूण येथील प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात इकोक्लबच्या माध्यमातून शाळेच्या परसबागेत विद्यार्थ्यांनी उत्साहात पालेभाज्या व औषधी वनस्पतींची लागवड केली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शेती आणि निसर्गाची ओळख व्हावी, या उद्देशाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला चिपळूणचे उपविभागीय कृषी अधिकारी व पालक शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी भीमाशंकर कोळी व जयेश काळुखे यांनी प्रत्यक्ष लागवड कशी करावी, खतांचा वापर आणि रोपांची निगा कशी राखायची याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांना सविस्तर प्रात्यक्षिक दाखवले तसेच महाविस्तार ॲपबद्दल अधिक माहिती दिली. शाळेच्या परसबागेत विद्यार्थ्यांनी विविध भाज्यांची लागवड केली. या उपक्रमाचे महत्त्व शिक्षिका मानसी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
नवोपक्रम स्पर्धेत
आकुर्डे तृतीय
रत्नागिरी ः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा झाली. याचे बक्षीस वितरण स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात झाले. टिके कांबळेवाडी शाळेतील उपशिक्षक शीतलकुमार आकुर्डे यांनी एक पेपर यशासाठी हा नवोपक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे सुपूर्द केला होता. या नवोपक्रमास जिल्हास्तरीय तिसरा क्रमांक प्राप्त झाला. या नवोपक्रमाचे बक्षीस वितरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य नीता कांबळे, जिल्हा नोडल अधिकारी दीपा सावंत, विषय शिक्षिका मेघाली इंगळे, देवयानी पवार, गिरिजा होतेकर, शिर्के हायस्कूलचे लिंगायत यांच्या उपस्थितीत झाले.
साखरपा महामार्गावर
दिशादर्शक फलक
साखरपा : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर साखरपा गावानजीक दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. साखरपा गावात प्रवेश करताना दोन्ही बाजूने हे फलक बसवण्यात आले आहेत. या महामार्गाचे साखरपा गावाच्या आसपासचे ८० टक्के काम आता पूर्ण झाले आहे. कोंडगाव चौक परिसर वगळता आता किमान एका बाजूने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आंबाघाट उतरून साखरपा गावात येताना आणि दाभोळेकडून साखरपा गावात येताना अशा दोन्ही बाजूने दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.