swt2817.jpg
20467
दाणोली ः कथाकथन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसोबत भरत गावडे व इतर मान्यवर.
कथाकथन स्पर्धेत मेघना सावंत प्रथम
दाणोली येथील स्पर्धाः निरामय विकास केंद्राचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ः साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली व निरामय विकास केंद्र, कोलगाव यांच्यावतीने दाणोली येथे आयोजित कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा धवडकी क्र. २ ची विद्यार्थिनी मेघना सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मराठी भाषेचे संवर्धन व्हावे आणि विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण नऊ शाळांमधील २० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत यांचा शाल, श्रीफळ आणि संविधान प्रत देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. सावंत यांनी, मराठी आपली मातृभाषा असून तिचा आपल्याला अभिमान असायला हवा, असे सांगत सर्वत्र मराठीचे कार्यक्रम घेऊन भाषेचा गौरव करण्याचे आवाहन केले.
स्पर्धेचा निकाल असा : प्रथम मेघना सावंत (जिल्हा परिषद शाळा धवडकी क्र. २), द्वितीय स्वरा नाईक (जिल्हा परिषद शाळा केसरी), तृतीय विभागून सुरभी राऊळ (जिल्हा परिषद शाळा धवडकी) व जानवी सावंत (जिल्हा परिषद शाळा दाणोली) तसेच तन्वी सावंत (दाणोली) व अन्वी देसाई (शिरशिंगे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. एल. डी. सावंत, मुख्याध्यापक प्रकाश गावडे, परीक्षक नरेंद्र सावंत, गौरवी घाटे, रश्मी सावंत, संगीता सोनटक्के आणि गिरीधर चव्हाण उपस्थित होते. यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र, रोख रक्कम, भेटवस्तू व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल दीपा सुखी यांनी विशेष मेहनत घेतली.