घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा कायम
राजापूर तालुक्यातील स्थिती; सौरपॅनेलसह वाढीव अनुदान रखडले
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्यांसमोर आता चिंतेचे ढग जमा झाले आहेत. घरकुल बांधकामासाठी वाढीव अनुदान आणि सौरपॅनेलसाठी आर्थिक मदतीची घोषणा शासनाने केली असली, तरीही प्रत्यक्षात हे अनुदान लाभार्थ्यांच्या पदरात पडलेले नाही. त्यामुळे राजापूर तालुक्यातील २ हजार ५१० लाभार्थी या अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, त्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीला ‘ब्रेक’ लागला आहे.
प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचे घर असावे, यासाठी शासन घरकुल योजना राबवत आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते; मात्र, बांधकामाच्या साहित्यातील वाढती महागाई पाहता हे अनुदान अत्यंत तोकडे पडत होते. ही गरज ओळखून शासनाने अनुदानात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामध्ये घरकुल बांधकामासाठी अतिरिक्त ३५ हजार रुपये आणि वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी सौरऊर्जा पॅनेलसाठी १५ हजार रुपये असे मिळून एकूण ५० हजार रुपयांचे वाढीव अनुदान घोषित करण्यात आले. यामुळे घरकुलाची एकूण रक्कम १ लाख ७० हजार रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय ‘मनरेगा’ योजनेतून मिळणारे २८ हजार रुपयेही लाभार्थ्यांना मिळणार आहेत.
शासनाच्या या आश्वासक निर्णयामुळे राजापूर तालुक्यातील सुमारे २ हजार ५१० लाभार्थ्यांनी उत्साहाने घरांच्या बांधकामाला सुरुवातही केली. काहींची घरे पूर्ण होत आली असून, काहींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे; मात्र, घोषणेला बराच काळ उलटूनही वाढीव अनुदानाची रक्कम आणि सौरपॅनेलचा निधी अद्याप मिळालेला नाही. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडूनही कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये हे अनुदान मिळणार की नाही? अशी धास्ती निर्माण झाली आहे.
----
चौकट
राजापुरातील घरकुल स्थिती (२०२४ ते २०२६) ः
* एकूण मंजूर घरकुले : २५१०
* पूर्ण झालेली घरकुले : २२३
* पहिला हप्ता मिळालेले लाभार्थी : २३०५
* दुसरा हप्ता मिळालेले लाभार्थी : ९९३
* तिसरा हप्ता मिळालेले लाभार्थी : ५३२
------
कोट
घरकुल बांधकामासाठी वाढीव अनुदानसह सौरपॅनेल बसवण्यासाठी अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली आहे; मात्र, त्या घोषणेप्रमाणे प्रत्यक्षात अद्यापही अनुदान मिळालेले नाही. ते लवकरात लवकर मिळावे, ही अपेक्षा.
- आशिष शिंदे, लाभार्थी