‘त्या’ वीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
भात उत्पादकांना तीन कोटी ६६ लाखांचे वाटप ; हेक्टरी आठ हजार रुपये मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः निसर्गाच्या लहरीपणाचा फटका ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यावर आता थेट नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. एकूण ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपयांचा निधी वाटपाला प्रशासनाने पूर्णत्व दिले आहे.
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यामुळे भात आणि नाचणीचे पीक जोमात होते; मात्र कापणीच्या ऐन हंगामातच अवकाळी पावसाने घात केला. अनेक ठिकाणी उभे पीक आडवे झाले तर काही ठिकाणी भाताला मोड फुटले यामुळे शेतकरीराजा पूर्णपणे खचला होता. या संकटाची दखल घेत कृषी विभागाने तातडीने ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या नऊ तालुक्यात पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान खेड, संगमेश्वर, चिपळूण, दापोली, लांजा तालुक्यात झाले होते तर सर्वात कमी नुकसान गुहागर, राजापूर, तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले होते.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, शासनाकडून मंजूर झालेला निधी टप्प्याटप्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यामुळे खरिपाचे पीक गेल्यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीचा प्रस्ताव कृषी विभागामार्फत शासनाकडे पाठवला होता. मंजूर झालेले ३ कोटी ६६ लाख ८२ हजार ८११ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
------
कोट
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची कार्यवाही सुरू आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांना वितरित केला गेला आहे. यंदा जिल्ह्यात पावसामुळे काहीअंशी भातशेतीचे नुकसान झाले होते.
- डॉ. शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी