व्यक्तीविशेष---लोगो
26O21317
संस्कृत अन् संस्कृतीही
जपणारी माऊली
गुहागरमध्ये एका घरी जायचे होते. तेथील एका गृहस्थाला विचारले, ‘अमुक घरी जाण्याची खूण काय?’ तो म्हणाला, ‘रिक्षावाल्याला सांगा पाटणकर मॅडमच्या घरी जायचे आहे.’ हा सुखावणारा धक्का होता. हा किस्सा साधारण १५ वर्षांपूर्वीचा असेल. २६ जानेवारीला नुकताच त्यांच्या घरी गेलो, तो मॅडमचे निधन झाल्यानंतर. त्या दिवशी मुद्दाम रिक्षावाल्याला विचारले. उत्तर पुन्हा तेच - ‘पाटणकर मॅडमचे घर’. किमान ३० वर्षे ही ओळख संस्कृत विषय शिकविणाऱ्या शिक्षिकेला मिळते, यात गुहागरची संस्कृती दिसते आणि मॅडमनी मिळवलेले स्थान. २० जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्यांना आदरांजली वाहताना केलेले हे स्मरण...!
- शिरीष दामले, रत्नागिरी
-------
तळमळीची शिक्षिका, पुस्तकप्रेमी, सामाजिक कार्यकर्ती आणि सुगृहिणी असे अनेक पैलू मेधा मुकुंद पाटणकर मॅडमच्या व्यक्तिमत्त्वाचे भाग होते; पण त्यात मिरवणे अजिबात नव्हते. ‘संस्कृत शिक्षिका’ ही मॅडमची सुमारे ३५ वर्षांतील ओळख, परंतु त्यांचे शिकविण्याचे मूळ विषय मराठी आणि हिंदी होते, हे खूप कमी जणांना माहिती आहे. शाळेतील जोशी सर (शास्त्रीबुवा) आणि रेखा देशपांडे या दोघांमुळे त्या संस्कृत शिकल्या. त्यानंतर संस्कृत विषय घेऊन त्यांनी बी.एड. केले. पुढे संस्कृत शिक्षिका म्हणूनच त्यांची ओळख बनली. जिद्द, चिकाटी अन् संस्कृतची आवड असल्याशिवाय हे शक्य नाही. निवृत्तीनंतरही पाच वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत संस्कृत शिकवले. सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत शिकविताना इंग्रजी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम तोच असला तरी, मॅडमची शिकविण्याची पद्धत विद्यार्थ्यागणिक बदलायची. याच वृत्तीमुळे त्या विद्यार्थीप्रिय होत्या. काही वर्षे आधी त्यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय संस्थाचालकांनी अमान्य केला, ही त्यांच्यातील शिक्षकाला दिलेली दाद होती.
त्यांच्याकडे शाळाबाह्य संस्कृत पुस्तकांचे संकलन होते. याशिवायही त्या नेहमी नवीन पुस्तके विकत घेत. पाहुण्यांबरोबर घरी आलेल्या मुलांच्या हातावर भेट म्हणून त्या पुस्तके ठेवत. विविध शाळांमधील ग्रंथालयांनाही त्यांनी अनेक पुस्तके दिली आहेत. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्या शैक्षणिक मदत करत, यात नवल वाटत नाही; पण अनेक नवोदित शिक्षकांसाठीही पाटणकर मॅडम म्हणजे मन मोकळे करण्याचे हक्काचे स्थान होते. शाळेतील नोकरी संपल्यानंतरही अनेक शिक्षक-शिक्षिका त्यांना भेटायला घरी येत असत. त्यांच्यासाठी त्या जणू ‘समुपदेशिका’ होत्या.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘भाऊबीज निधी’ संकलनाचे काम त्या मनापासून करत. दिवाळीच्या सुटीत निधी जमा करण्यासाठी त्या फिरत असत. त्या निधी न्यायला आल्या नाहीत तर देणगीदारांचे फोन येत. निवृत्तीनंतर त्यांनी या कामाचा आवाका आणखी वाढवला. पुण्यात मुलाकडे गेल्या तरी तिथेही अनेकांकडून निधी संकलित करत. गुहागर तालुक्यातील काही शिक्षकांनाही त्यांनी या कामात सहभागी करून घेतले होते. कोणताही गाजावाजा न करता सहजपणे काम कसे करावे, याचा त्या वस्तुपाठ होत्या.
मॅडमचे वडील माधव काटदरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करायचे. पती नाना पाटणकर हेदेखील संघ कार्यकर्ते असल्याने घरात कायमच संघ प्रचारक आणि कार्यकर्त्यांचा राबता असे. नोकरी सांभाळूनही त्यांनी अनेक प्रचारकांना वेळी-अवेळी जेऊ-खाऊ घातले. आणीबाणीच्या काळात वसंतराव केळकर त्यांच्या घरी दीड महिना नाव बदलून राहिले होते. आज संघप्रेमींना चांगले दिवस आले आहेत, पण तो काळ संघविरोधाचा होता, त्यावरून मॅडमचा कणखरपणा लक्षात येतो. त्यांची दोन्ही मुले संघाचे काम करू लागली. पतीकडे जनकल्याण समितीचे काम आले आणि सोबतच शिवथरघळसाठीही ते काम करू लागले. परिणामी, घरातील कार्यकर्त्यांचा राबता वाढला. मॅडम या सर्वांचे स्वागत आईच्या मायेने करत. तालुका प्रचारकांसाठी तर मॅडम म्हणजे ‘आईच’ होत्या. वेळ पडल्यास त्यांनी प्रचारकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली. नाना पाटणकर आणि त्यांच्या मुलांच्या समाजसेवेमागे आणि संघकार्यामागे मॅडमचा भरभक्कम आधार होता.
कॅन्सर बळावल्यावर ‘केमोच्या उपचारांतून रोजचे मरण नको, त्यापेक्षा जे होणार आहे ते मी आनंदाने स्वीकारणार,’ ही भूमिका त्यांनी घेतली. हे सोपे नाही. मृत्यूला कणखरपणे सामोरे जाणे हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. हिंदुत्वाचे गोडवे गायले तरी मृत्यूचे स्वागत करणे भल्याभल्यांना साध्य होत नाही; मॅडमांना ते साध्य झाले. संस्कृत अन् संस्कृती जपणारी माऊली या ओळखीसह ‘पाटणकर मॅडमचे घर’ मनात घर करून राहिले. ती ओळख एका शिक्षिकेची कधीही न पुसणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.