प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी ः शहरातील जोशी पाळंद येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार (ता. ३१) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. केदार श्रीकृष्ण जोशी (वय ५०, रा. जोशी पाळंद, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. शनिवारी सकाळी घरात कोणीही नव्हते त्या वेळी जोशी यांनी पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा भाऊ घरी आला असता त्याला जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तातडीने याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------
शीळमधील दारूअड्ड्यावर कारवाई
रत्नागिरी ः शीळ येथील नदीकिनारी बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूधंद्यावर शहर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ३६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. शैलेश अनंत सावंत (वय ५२, रा. शीळ वाघजाईवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेडकॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा नोंद झाला.
----------