कट्टा येथे बुधवारी
''उडान'' महोत्सव
मालवण, ता. १ : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. ४ फेब्रुवारी) जिल्हास्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन केले आहे. सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये पथनाट्य व पोवाडा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग व सर्जनशील लेखन यांचे सादरीकरण होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कट्टा महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी आणि विभाग समन्वयक प्रा. वैशाली पालव यांनी केले आहे.
........................
देवगड येथे १४ ला
कथाकथन स्पर्धा
देवगड, ता. १ ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने विजयालक्ष्मी आत्माराम राऊत यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणार्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. ही स्पर्धा आता १४ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे.
ही स्पर्धा शनिवारी (ता.७) घेण्यात येणार होती; मात्र या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक असल्यामुळे आता ही स्पर्धा १४ ला सकाळी १० वाजता ग्रंथालयात होईल. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल प्रशांत बांदकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष गुरुदेव परुळेकर यांनी केले आहे.
.........................
कर्ले महाविद्यालयाचे
राज्यस्तर स्पर्धेत यश
देवगड, ता. १ ः शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाने करियर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २०२५-२६ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम, तर मुंबई विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. उत्कृष्ट प्राचार्य म्हणून प्रा. समीर तारी, उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक प्रा. अक्षता मोंडकर यांना प्रथम क्रमांक, तसेच महाविद्यालयाच्या करिअर संसदेला उत्कृष्ट करिअर संसद म्हणून प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. यशस्वीतांना संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, रघुनाथ चव्हाण, डॉ. राजेंद्र चव्हाण, विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, दिनेश साटम, शमशुद्दीन आत्तार, उदयसिंग रावराणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
.........................
भंडारी महाविद्यालयात
स्मार्ट बोर्डचे उद्घाटन
मालवण, ता. १ ः येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या
बॅचमधील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेले स्मार्ट बोर्ड बारावी कला-वाणिज्य व
अकरावी कला-वाणिज्य या दोन वर्गांमध्ये लावण्यात आले. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते हे दोन्ही स्मार्ट बोर्ड संस्थेकडे सुपूर्द
करण्यात आले. संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांच्या हस्ते बारावीच्या वर्गातील स्मार्ट बोर्डचे तर अकाउंटन्सी
विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक लवू परब (मुंबई) यांच्या हस्ते अकरावी कला-वाणिज्य वर्गातील स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी लोकल कमिटी सेक्रेटरी दशरथ कवटकर, प्राचार्य तिवले, प्रा. पवन बांदेकर, सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित
होते.
.....................
कर्मचाऱ्यांसाठी
टपाली मतदान
कुडाळ, ता. १ ः येथील तहसील कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी टपाली मतदान केंद्रावर टपाली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकतेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून जे कर्मचारी कर्तव्यावर जाणार आहेत, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजपासून कर्मचाऱ्यांनी मतदान करण्यास सुरुवातही केली आहे. मंडळ अधिकारी के. आर. सामंत यांनी मतदान केले.
.....................
तारकर्लीत लायन्सतर्फे
मोफत नेत्र चिकित्सा
मालवण, ता. १ ः मालवण लायन्स क्लब, डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व मोतिबिंदू शस्त्रक्रिया सेंटर, मालवण आणि माघी गणेश उत्सव मंडळ, तारकर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुष मंदिर, तारकर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर झाले. यावेळी दहा गरीब व गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. या शिबिरासाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाचे डॉ. अनिरुद्ध तेली, मालवण सेंटर इन्चार्ज वेदा माणगावकर, कर्मचारी वैभव माणगावकर, मधुरा चव्हाण यांचे सहकार्य लाभले. गरजू रुग्णांना लायन्स क्लब सदस्य महेश अंधारी व गणेश प्रभूलीकर यांच्या सहकार्यातून चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी क्लब अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सदस्य महेश अंधारी, गणेश प्रभूलीकर, राजा शंकरदास, नंदिनी गावकर, जयश्री हडकर तसेच माघी गणेशोत्सव मंडळ, तारकर्लीचे सदस्य किशोर कुबल, सतीश टिकम, धोंडी कांदळगावकर, कुणाल, बापर्डेकर, निवृत्ती कोळंबकर उपस्थित होते.
........................
चौके स्मशानभूमी
परिसराची स्वच्छता
मसुरे, ता. १ ः चौके सम्यकनगर स्मशानभूमी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्रमदानाने स्वच्छता मोहीम नुकतीच राबविण्यात आली. गेली कित्येक वर्षे या स्मशानभूमीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली नव्हती. त्यामुळे काटेरी झुडपे आणि अनावश्यक झाडे वाढलेली होती. त्यामुळे संपूर्ण स्मशानभूमी झाडांनी वेढलेली होती. अंत्यविधीवेळी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. याची दखल सम्यकनगर येथील तरुणांनी घेऊन ही स्वच्छता मोहीम राबविली. याबाबत गावातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.