rat2p22.jpg-
21547
खेड ः शहरात असलेले दुर्लक्षित गरम पाण्याचे कुंड.
-rat2p23.jpg, rat2p24.jpg-
21548
खेड ः शहरातील बौद्धकालीन लेणी.
-----------
प्राचीन बौद्ध लेणी अनास्थेमुळे धोक्यात
खेडमधील वारशाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष; गरम पाण्याच्या कुंडाचीही दुर्दशा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : खेड शहरातील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बौद्धकालीन लेणी आणि त्याच परिसरातील गरम पाण्याच्या प्राचीन कुंडांचा हा ऐतिहासिक वारसा प्रशासकीय अनास्थेमुळे सुशोभीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत. अडीच हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास सांगणारा हा ठेवा योग्य संवर्धनाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटन विकासाचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रश्न अनुत्तरित राहिल्याने इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
शहरातील या बौद्धकालीन लेणी प्राचीन वास्तूकलेचे दर्शन घडवणाऱ्या आणि बौद्धधम्माच्या प्रसाराच्या महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत. गेल्या काही दशकांपासून त्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू आहे. लेण्यांच्या संरक्षक भिंती, कोरीव खांब आणि दालनांचे मूळ स्वरूप आता ढासळू लागले आहे. तालुका बौद्ध समाजाच्या अखत्यारित असलेल्या या लेण्यांची लोकवर्गणीतून काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली असली, तरी पुरातत्त्व विभागाने या जागतिक दर्जाच्या ठेव्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.
विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वी थायलंडमधील बौद्ध भिक्षूंच्या एका प्रतिनिधी मंडळाने या लेण्यांना भेट देऊन येथील ऐतिहासिक महत्त्वाचे कौतुक केले होते. थायलंडमध्ये अशी स्थळे केवळ स्मारक नसून, प्रबोधनाची केंद्रे म्हणून विकसित केली जातात, असे सांगत त्यांनी लेण्यांच्या विदारक अवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आमच्या देशात अशी वास्तू असती तर ती जागतिक पर्यटनस्थळ ठरली असती; मात्र येथील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. हा अनमोल वारसा जपण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरत आहे.
चौकट १
खेडमधील लेणी दुर्लक्षित
राज्यात अजिंठा-वेरूळ, कार्ले-बेडसेसारख्या अनेक बौद्धकालीन लेण्या संवर्धित आहेत आणि जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहेत; मात्र खेडसारख्या विकसनशील तालुक्यात असा अमूल्य ऐतिहासिक ठेवा असतानाही गेल्या अनेक वर्षांत प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. एका प्रमुख लेणीची अवस्था दयनीय असून, दगडी पृष्ठभाग झिजत चालला आहे. यामुळे लेण्यांचे पुनरूज्जीवन करावे, अशी मागणी होत आहे.
------
चौकट २
गरम पाण्याचे कुंड ‘अस्तित्व विस्मृतीत’
लेण्यांपासून काही अंतरावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्राचीन गरम पाण्याचे कुंडही आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. १०-१५ वर्षांपूर्वी नगरपालिकेने येथे काही बांधकाम केले होते; परंतु ते आज पूर्णतः नष्ट झाले आहे. कुंडात माती साचत आहे, पाणीस्रोत बुजत आहे. हा परिसर पूर्ण ओसाड झाला आहे. शहरातील सध्याच्या तरुणपिढीला खेडमध्ये गरम पाण्याचे कुंड आहे हेच माहिती नाही. याउलट, मुंबई-पुण्याहून येणारे पर्यटक गरम पाण्याच्या कुंडासाठी दापोली तालुक्यातील उन्हवरे येथे जातात. खेडमध्ये पर्यटनस्थळ असतानाही कोणताही बोर्ड, फलक, मार्गदर्शन, माहितीपर सुविधा नसल्याने पर्यटक पूर्णतः अनभिज्ञ आहेत.
--------
कोट
बौद्ध लेणी आणि गरम पाण्याचे कुंड हे दोन्ही ठिकाणे विकसित झाली तर खेड शहर पर्यटन नकाशावर मोठ्या दिमाखात उदयास येऊ शकते. स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होईल. शहराची ऐतिहासिक ओळख देश-विदेशात पोहोचेल. बौद्ध धम्माचे अभ्यासक, इतिहासकार आणि पर्यटक येथे आकर्षित होतील; परंतु सततच्या दुर्लक्षामुळे हे मौल्यवान ठिकाण दुर्लक्षित आहे.
- संजय विचारे, सामाजिक कार्यकर्ते, खेड
------
कोट
या लेण्यांचे आणि गरम पाण्याच्या कुंडांचे ‘पुनरूज्जीवन करा आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे गरजेचे आहे. लेण्यांचे शास्त्रोक्त पुनरुज्जीवन करणे अपेक्षित आहे.
-ॲड. अभिजित गांधी, खेड
------
कोट
ठेव्याचे संरक्षण झाले तर खेडचा इतिहास उजळेलच शिवाय शहराच्या विकासाला मोठा हातभार लागेल. याची जाणीव ठेवून पालिकेने या ठिकाणी त्या गरम पाण्याच्या कुंडाचे सुशोभीकरण केले होते. त्या ठिकाणी विद्युत दिवेदेखील बसवण्यात आले होते; परंतु काही समाजकंटकांनी ते विद्युत दिवे तोडून टाकले. ते निर्जनस्थळ असल्यामुळे काही समाजकंटक दारूच्या बाटल्या किंवा इतर पार्ट्या करून घाण करत असतात; परंतु या संदर्भात पालिकेच्यावतीने त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून, या समाजकंटकांवर कारवाई करण्यात येईल.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, खेड
---------
चौकट
दृष्टिक्षेपात
याकडे लक्ष देणे आवश्यक
* पुरातत्त्व विभागाने तातडीने पाहणी आणि हस्तक्षेप
* गरम पाण्याच्या कुंडाचे पुनरूज्जीवन आणि स्वच्छता
* पर्यटनविषयक सुविधा, मार्गदर्शक फलक, सुरक्षा व्यवस्था
* राज्य पर्यटन विभागाच्या माध्यमातून ठोस प्रकल्प
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.