गोळप गटात अपक्ष विरुद्ध शिवसेना लढत
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; सहानुभूतीविरूद्ध विकासकामांना प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः गोळप जिल्हा परिषद गटात सुरुवातीला तिरंगी लढतीची शक्यता होती; मात्र ठाकरे गटाकडून उमेदवारी मागे घेतल्यामुळे या ठिकाणी अपक्ष उमेदवार विरुद्ध शिंदे शिवसेना अशी लढत रंगणार आहे. दोन्ही बाजूकडून प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
शिवसेना व भाजप यांची युती झाल्यापासून हा गट शिवसेनेच्या वाटेला आला होता. या गटावर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेने दिलेला उमेदवार बहुमताने निवडून येत होता. तगडा उमेदवार न मिळाल्यामुळे आणि विरोधी पक्षाचे कोणतेही वर्चस्व नसल्यामुळे सातत्याने हा गट शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे; मात्र २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे ठाकरे गट व शिंदेगट असे विभाजन झाले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला चांगल्याप्रकारे मताधिक्य मिळाले होते; मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेले नव्हते. त्यानंतर ठाकरे शिवसेनेतील अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यानी शिंदेगटात प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकदा शिंदेगटाचे प्राबल्य वाढले आहे; परंतु आजही ग्रामीण भागात ठाकरे शिवसेनेला सहानुभूती आहे. ती बने यांच्या पारड्यात पडेल का? यावर सर्वकाही अवलंबून आहे.
पावस गटात शिवसेनेकडून नंदकुमार मुरकर रिंगणात असून, त्यांच्यापुढे पाचवेळा निवडून आलेले उदय बने यांचे आव्हान आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे या गटात चुरशीची लढाई होईल, अशी अपेक्षा आहे. १९९८ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचा पराभव करून उदय बने यांनी सर्वांनाच धक्का दिलेला होता. शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत प्रचारात उतरलेले असून, अपक्ष उमेदवार बने यांची मदार स्थानिक जुन्या नेत्यांवरच राहील. या ठिकाणी ठाकरे शिवसेनेची मते कोणाला मिळणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे तसेच या गटात भाजपची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे चित्र आहे.
-----
कोट १
शिवसेनेचे प्राबल्य सुरुवातीपासून आहे. गेली अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. विकासाचे व्हिजन असल्यामुळेच या गटातील अनेक ग्रामपंचायती व कार्यकर्ते पाठीशी आहेत. त्याचा फायदा मिळेल.
- विलास वारिसे, उपतालुकाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)
-----
कोट २
गेली अनेक वर्ष या गटात सातत्याने शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे; परंतु मध्यंतरीच्या काळात अनेक पदाधिकारी समोरून अनेक प्रलोभने दाखवल्यामुळे आपली निष्ठा बाजूला ठेवून दुसरीकडे गेलेले आहेत. पक्षाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आजही ठाकरेंच्या पाठीशी आहेत. पक्षाच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून सर्वजण प्रयत्नशील आहेत.
- संकेत राडये, ठाकरे शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.