डेरवण युथ गेम्सचा २७पासून बिगुल
१९ क्रीडाप्रकार; सात हजार खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : तालुक्यातील डेरवण श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट आयोजित आणि शिवजयंतीचे औचित्य साधून होणाऱ्या ‘बाराव्या डेरवण युथ गेम्स’चे बिगुल वाजले आहे. यावर्षी २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२६ या कालावधीत हा भव्य क्रीडा महोत्सव संपन्न होणार असून, महाराष्ट्रातील ७ हजारांहून अधिक खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी येथे लागणार आहे. डेरवण येथील अत्याधुनिक क्रीडा संकुलात एकूण १९ क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात आले असून, सध्या तेथे जय्यत तयारी सुरू आहे.
भारतीय पारंपरिक खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा सुंदर संगम असणाऱ्या या महोत्सवात यंदा ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबलटेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ आणि कॅरमसारख्या खेळांचा थरार पाहायला मिळेल. देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब आणि योगा या वैयक्तिक खेळांसह फुटबॉल, व्हॉलीबॉल व बास्केटबॉल या सांघिक खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वॉल क्लाइम्बिंग’ या साहसी खेळासोबतच यावर्षी ‘स्केटिंग’ या नवीन खेळाची भर पडली आहे. या स्पर्धेत ८ ते १८ वर्षांखालील वयोगटातील खेळाडू सहभागी होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. विजेत्या खेळाडूंना १२०० पदके, ११५ आकर्षक करंडक आणि रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्यातील क्रीडाप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असून, २५ फेब्रुवारीपर्यंत खेळाडूंना नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी www.svjctsportsacademy.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.